अक्षी - मराठीतल्या पहील्या शिलालेखाचे गावं
अलिबागहून चौल-रेवदंड्याच्या रस्त्याला लागलं की पाच कि.मी. अंतरावरच्या एका वळणावर आक्षी नावाचं एक टुमदार गावं लागतं. वळणावरचं असलेल्या एका अर्वाचिन स्तंभावरुन हे गावं आल्याची चाहूल लागते. आक्षी व नागावं ही जुळी भावंड, निसर्गरम्यताव व ऐतिहासिकता यांच्या बाबतीत या दोन्ही गावांत विलक्षण साम्य दिसून येते.
गेल्या काही वर्षांपुर्वी अक्षी हे गाव आपल्या निसर्गरम्यतेसाठी व स्वच्छ पांढर्या वाळूच्या समुद्रकिनार्यासाठी प्रसिद्ध होतं, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अक्षीची ओळख मराठीतल्या पहील्या शिलालेखाचे गावं म्हणुन समोर आली आहे.
अक्षी गावात शिरणार्या मुख्य रस्त्यास लागलं की काही अंतरावर सोमेश्वराचे प्राचिन शिवमंदीर आहे, याच परिसरात मराठीतला प्राचिन व पहीला शिलालेख पहावयास मिळतो. एका गधेगळीवर कोरलेला हा शिलालेख देवनागरी लिपीत असून संस्कृत-मराठी मिश्रीत आहे, संशोधनाअंती या शिलालेखाचा काळ १६ मे १०१२ असा ठरला याचा अर्थ २०१२ साली या शिलालेखास हजार वर्षे पुर्ण झाली. त्याकाळी संपुर्ण कोकण प्रांतावर शिलाहार नावाचे राजघराणे राज्य करीत होते, हे शिलाहार राष्ट्रकुट नामक साम्राज्याचे मांडलिक असून यांच्या तीन शाखा अस्तित्वात होत्या त्यांना उत्तर कोकण शाखा, दक्षीण कोकण शाखा व कोल्हापुर शाखा असे म्हटले जाते. अक्षीचा शिलालेख हा उत्तर कोकणच्या शिलाहार शाखेचा राजा केशिदेवराय याच्या काळातला हा शिलालेख असून केशिदेवाचा महाप्रधान भइर्जु सेणूई याने अक्षी गावातील नऊ कवली धान्य देवीसाठी दिले असल्याचे या शिलालेखात नमुद करण्यात आले आहे. या शिलालेखाबरोबरच या परिसरात आणखी एक यादवकालीन शिलालेख दिसून येतो सन १२९१ सालचा हा शिलालेख यादव नृपती रामचंद्रदेव यांच्या काळातला असून त्यांचे मांडलिक जाईदेव यांचा पुत्र ईश्वरदेव क्षत्रीय याने देवीस एक गद्याण दान दिले असे शिलालेखात नमुद करण्यात आले आहे. अर्थात या दोन्ही शिलालेखांमधले उल्लेख हे कालंबिका देवीचे आहेत हे लक्षात यायला वेळ लागत नाही.
अक्षी गावातील कालंबिका माता मंदीर व सोमेश्वर महादेव हे शिवमंदीर समस्त अक्षीकरांची आराध्य दैवते आहेत. कालंबिका मंदीराचा जिर्णोद्धार झाला असून देवीचे सर्व उत्सव ग्रामस्थ भाविक अतिशय उत्साहाने साजरे करत असतात. कालंबिका मंदीराच्याच आवारात काही काळांपुर्वी प्राचिन गजांतलक्ष्मीची मुर्ती आढळली, आता तिची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी कालंबिका मंदीराशेजारीच एक छोटेखानी मंदीर बांधून केली आहे. या शिवाय सोमेश्वर महादेव शिवमंदीरही अतिशय प्रेक्षणीय आहे या मंदीरातला प्रवेश धीरगंभीर व मंत्रमुग्ध वातावरणाचा अनुभव देतो. या मंदीरातील नंदीची मुर्ती भलीमोठी
असून एवढी मोठी मुर्ती आजुबाजुच्या परिसरामध्ये क्वचितच पहावयास मिळते.
अक्षी गावाचे नाव कसे पडले असावे हा अभ्यासाचा विषय आहे. अक्षी हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ नेत्र किंवा अक्ष असा होतो. प्रत्येक गावाच्या नावामागे एक अर्थ दडलेला असतो ज्यावरुन गावाच्या आद्य इतिहासाचा थोडाफार निष्कर्ष लावता येतो. अक्षी हे गाव साखरखाडीच्या जवळच असल्याने व येथून उत्तर व दक्षीणेकडिल खुप मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत असल्याने टेहळणीसाठी या प्रदेशाचा वापर पुर्वी मोठ्या प्रमाणात होत असावा आणि भौगोलिक दृष्ट्या अक्षी हे गाव अष्टागरांच्या मधोमध येत असल्याने अष्टागराची नेत्रे या अर्थी या गावास हे नाव मिळाले असल्याचा अंदाज लावू शकतो. अर्थात अक्षी हे गाव प्राचिन अष्टागरांपैकी एक असल्याने तसेच या गावातल्या दोन प्राचिन शिलालेखांमुळे हे गाव फार पुर्वीपासून राजकिय व सांस्कृतिकदृष्ट्या वैभवसंपन्न होते याची खात्री पटते. उत्तर आंग्रे काळात म्हणजे १७ फेब्रुवारी १७९७ मध्ये आंग्रे घराण्याच्या ग्वाल्हेर शाखेचे बाबुराव आंग्रे व रघुजी आंग्रे यांचे पुत्र जयसिंगराव आंग्रे यांच्यात अक्षी या गावात तुंबळ युद्ध झाले होते ज्यामध्ये बाबुरावांचा पराभव झाला मात्र कालांतराने बाबुरावांनी जयसिंगरावांचा पराभव करुन दुसर्या बाजिरावाकडून सरखेलपदाची वस्त्रे घेतली.
अक्षी गावात फेरफटका मारावा तो चालतच, नारळी पोफळीच्या बागांमधून गेलेल्या रस्त्यांवरुन चालत असताना फळा-फुलांच्या बागांतून आलेला सुगंध वेगळ्या विश्वात घेऊन जातो, येथील समुद्रकिनार्यावरील पांढरी वाळू व समोर विस्तीर्ण पसरलेल्या समुद्राचा निनाद वातावरणात गुढ ध्वनीलहरी निर्माण करीत असतात. अक्षी गावाची एक दिवसाची सफर सुद्धा वर्षभर पुरेल इतका उत्साह देऊन जाते. अलिबाग चौल रस्त्यावर अलिबागपासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या अक्षी गावास भेट देण्याकरीता आपले खाजगी वाहन, बस किंवा रिक्षांचा वापर करता येऊ शकतो, येथील स्तंभापासून साधारणतः १.५ कि.मी. अंतरावर अक्षीचा समुद्रकिनारा आहे जेथे थेट वाहने जाऊ शकतात. अक्षीच्या किनार्यावरुन आपल्याला अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचे दर्शन घडते याशिवाय अक्षी गावात राहण्याच्या व खाण्याच्या विपुल सोयी असल्याने हा बीच पर्यटकांसाठी अतिशय सोयीचा आहे. एका वेगळ्या विश्वाचा आनंद घ्यावयाचा असल्यास अक्षी या गावास एकदातरी भेट द्यायलाच हवी.