समर्थ रामदास स्वामी यांची शिवथरघळ

पुणे भोरकडून येणारा वरंध घाट या सह्याद्री पर्वतावरील घाटाच्या कोकणाकडील पायथ्याशी जावळी खोऱ्यातील समर्थ रामदासांच्या दासबोध ग्रंथाचा जिथे जन्म झाला ती शिवथरघळ आहे.

समर्थ रामदास स्वामी यांची शिवथरघळ
शिवथरघळ

शिवकालापासून महाराष्ट्राच्या इतिहासात रायगड जिल्ह्याला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व लाभले. महाड जवळील पाल्याची बौद्ध लेणी, सव येथील ऊन पाण्याचे झरे, किल्ले रायगड व रायगडच्या सरहद्दीवरील प्रतापगड आणि तानाजी मालुसरे यांचे उंबरठ (उमरठ) हे गाव.

पुणे भोरकडून येणारा वरंध घाट या सह्याद्री पर्वतावरील घाटाच्या कोकणाकडील पायथ्याशी जावळी खोऱ्यातील समर्थ रामदासांच्या दासबोध ग्रंथाचा जिथे जन्म झाला ती शिवथरघळ अशा विविध ऐतिहासिक स्थानांची जाणीव करून देत असलेला महाडचा हा परिसर. शिवबाचे पोवाडे आणि घोड्यांच्या टापांचा आवाज ज्या ठिकाणी शोभावा असा हा घाटमाथ्याच्या पायथ्याच्या कोकण परिसरातील निसर्गरम्य परिसर.

सह्याद्रीच्या सान्निध्यात अजूनही इतिहासाचे फुलोरे घेऊन जगत आहे. महाड-भोर रस्त्यावर शिवसमर्थ भेटीसाठी प्रसिद्ध असलेले आणि हल्ली औद्योगिक स्थान झालेले बिरवाडी हे गाव टाकल्यावर एस.टी. बोटीच्या हेलकाव्याप्रमाणे चढउताराची वळणे घेत कच्च्या मातीच्या रस्त्यावरून शिवथरकडे सरकत होती. उंचावरून पाहणाऱ्याला ही एस.टी. बस म्हणजे एखादा लाल गोळा झाडीतून सरकत येत आहे असे भासविणारे हे चित्र. दिवस पावसाळ्याचे असल्याने निसर्गाचीही कमतरता नव्हती, अनेक ठिकाणी लावणीची कामे सुरू असल्याने एक वेगळे सौंदर्य या भागात दिसले. वेगळे यासाठीच की, रायगड जिल्ह्यात आता डोक्यावरील इरल्या कमी होऊन त्याऐवजी प्लॅस्टीक डोक्यावर आल्याने इरल्यांच्या सौंदर्यातील मजा गेली. कारण जमिनी गेल्या. पायात गम बूट आले त्यामुळे पावसाच्या धुवाँधार वृष्टीकडे पहात गारीच्या दगडावर लोखंडी छिन्नी मारून त्याआधारे पेटवलेला कापूस आपट्याच्या पानाच्या विडीवर ठेवून दम मारता मारता इरलीतून आकाशाकडे डोकावून 'आज पान्याने लय दिशा धरलीया' असे बोलणारे शेतकरी औद्योगिकीकरणामुळे नाहीसे झालेत. या पार्श्वभूमीवर शिवथर खोऱ्यातील हिरव्यागार खलाटीतील पावसाळी वातावरण निश्चित आल्हाददायक होते. लाल मातीची झाडीत लपलेली घरे आणि त्या घरांच्या बैठकीही इतिहासाची आठवण करून देत होत्या. कारण येथे गवळ्यांच्या हातात अ‍ॅल्युमिनियमची किटली नव्हती, होती ती कळशी. सारे समृद्ध वातावरण त्यामुळे येथूनची गरीबीही श्रीमंतासारखी भासत होती.

शिवथरघळकडे मी प्रथमच जात होतो. आणि समर्थ, दासबोध हे शब्द जरी कित्येक वर्षे ऐकत असलो तरी दासबोधाची जन्मभूमी घळ म्हणजे नक्की काय? हा प्रश्न मनात डोकावत होता. परंतु प्रत्यक्षात तेथूनची परिस्थिती पाहिल्यावर व मनोहर गांगलांसारखे पद्मभूषणाच्या ध्यासाने, अभ्यासाने झपाटलेले एक तरुण व्यक्तिमत्त्व तेथे भेटल्यावर त्यांच्याच भाषेतील घळीचे वर्णन आपणास मनोरंजक वाटेल. मनोहर गांगल म्हणतात, घळ म्हणजे नैसर्गिक  गुहा, जमिनीच्या दोन थरातील मऊ माती, पाण्याचा झोत व वारा याने झिजून अशा घळी तयार होतात साधू, संन्याशी मुख्यत्वे करून नाथपंथी योगी अशा घळींचा अनेकवेळा उपयोग करून घेतात. समर्थांच्या जीवनात घळीचे महत्त्व फार मोठे आहे. या घळी समर्थांच्या निसर्गरम्य एकांताची साक्ष देत आहेत. घळीचे महत्त्व म्हणजे तेथे दिवसा गारवा व रात्री उब असते. काही ठिकाणी चिखल मातीच्या भिंती घालूण पोटविभाग बनविले होते. तसेच पूर्वी घोंगडी, व्याघ्र जीन, धुनीचा याचा उपयोग केला जाई. समर्थांच्या बहुतेक घळीस रामघळी म्हणतात. पूर्वी लोकांस कंदमुळे, रानफळे व वनऔषधी याची थोडीफार तोंडओळख असे. जंगल व एकांत यास घाबरण्याचे कारण नाही. आज शेतकरी सुद्धा नैसर्गिक घळींचा उपयोग गुरे ठेवणे, राहणे यासाठी करतात. निसर्ग चक्रात सावकाशपणे काही घळी निर्माण होत असतात. तर काही मोडत असतात, हा एवढा एकांत कशासाठी? असे म्हणून गांगल म्हणतात, एकांतात चांगल्या योजना आखता येतात. आत्मपरीक्षण करून आपल्या चुका लक्षात येतात. कित्येक प्रश्न अचानक सुटतात. ग्रंथरचना व सुरक्षित राजकारण करता येते. समाधी सुख अनुभवता येते. अनेकप्रकारे सेवा व उपदेश करून लोक आपले दुर्गुण सोडत नसत. परकीय सत्तेखाली आपसात भांडत त्यामुळे कधी कधी सर्व उपाधींना कंटाळून समर्थ अचानक तडक वनाकडे धाव घेत. त्यांची काव्य याची साक्ष देतात. स्वतंत्र भारतात जन्मलेले कित्येक तरुण पदवीधर आजही दासबोध, विवेकानंद, जे. कृष्णमूर्ती वगैरेच्या विचारांचा कळकळीने अभ्यास व प्रयोग करीत आहेत. या घळींचा ध्यानप्रेमी, सेवाप्रेमी व निसर्गप्रमी अशा तीन विभागामध्ये जीर्णोद्धार झाल्यास अनेक तरुण त्याचा योग्य तो उपयोग करून घेतील. समर्थांवर श्रद्धा ठेवून ऐतिहासिक घटना आठवून लोक जीवन बघत विशाल मनाने रम्य निसर्गाचा आस्वाद घेत. या घळींचा शोध घेणे हा एक रोमांचकारक प्रवास आहे असे श्री. गांगल म्हणाले. श्री. मनोहर गांगल हे स्वतः आर्किटेक्ट आहेत, हे लक्षात घेतल्यावर या औद्योगिकीकरणाच्या काळात लोकांना इमारतीचे किंवा कारखान्याचे प्लॅन देण्याचा हजारो रुपयांचा व्यवसाय सोडून व मुंबईतील आपली चार आकडी पगाराची नोकरी सोडन शिवथर परिसरात सतत बारा वर्षे पदभ्रमण करून या परिसरातील त्यांनी जो ऐतिहासिक अभ्यास केला आहे तो कौतुकास्पद असाच आहे. सतत बारा वर्षे त्यांनी हा ध्यास का घेतला? हा प्रश्न आपणास पडेल, परंतु या परिसराचा अभ्यास करीत असताना होतकरू तरुणांना मार्गदर्शक ठरतील असे नकाशेही गांगल यांनी तयार केले आहेत. यापैकी शिवथर परिसर पदभ्रमण मार्गदर्शक नकाशा, शिवसमर्थ भेटीचा गुप्त डोंगरी मार्ग, रामदास स्वामींची निसर्गरम्य घळी, समर्थांची स्फूर्तीस्थाने अशी त्यांची प्रकाशने अल्प किंमतीत शिवथरघळीत उपलब्ध आहेत. सध्या ते महाड, श्रीवर्धन परिसर भ्रमण हे पुस्तक लिहित आहेत. मनोहर गांगल यांचे सध्या वास्तव्य श्रीवर्धन परिसरात आहे, ऐतिहासिक श्रीवर्धनवर हे पुस्तक लिहित आहेत. श्री. मनोहर गांगल यांनी आपल्या शिवथरघळ परिसर पदयात्रा मार्गदर्शक नकाशा घळ आणि काही गावांच्या पदयात्रेचे अंतर दिले आहे. त्यापैकी शिवथरघळ माझेरी साडेतीन मैल, चढ एक हजार फूट, शिवथरघळ महाड अठरा मैल, शिवथरघळ रामदास पठार पाच मैल, चढ एक हजार फूट, याच शिवथरघळपासून साडेतीन किलो मीटर अंतरावर असलेल्या माझेरी गावापासून महाड पंधरा मैल, भोर तीस मैल, वरंध तीन मैल असे अंतर आहे. तर घळीपासून पदयात्रा करून पानशेत येथे जाण्यास दीड दिवस लागतो. परंतु याच मार्गावर चार हजार पाचशे फुटाचा चढ आहे. तसेच तोरणा व राजगड या किल्ल्यांकडे जाण्यासही दीड दिवसाचाच वेळ जात असून या मार्गावर चार हजार पाचशे फुटाचा चढ आहे. उंबरठ, प्रतापगड येथे जाण्यासही अडीच दिवसाचा कालावधी लागतो. या मार्गात चार हजार फुटाचा चढ आहे. महाबळेश्वरला जाण्यासही एवढाच वेळ लागत असून चढ मात्र चार हजार पाचशे फुटाचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या नव्या पर्यटक धोरणानूसार पर्यटकांना आकर्षित करतील अशी ही वरील ठिकाणे असून भविष्यातील रस्ते याचा अभ्यास करीत असताना शासनाला मनोहर गांगलांच्या नकाशाच्या मार्गाने अनेक गावे व किल्ले जवळ आणता येतील.

शिवथरघळीत उपलब्ध असलेले 'अशीही शिवथरघळीची कथा' या सनील चिंचोळकर या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे सोळाशे बावन्नच्या पूर्वार्धात समर्थ शिवथरघळीत आले. थोडासा विचार केला तर आजचे रायगडमधील औद्योगिकीकरण लक्षात घेता आज या घळीभोवतालचे निसर्गरम्य वातावरण आजच्या कटकटीच्या जीवनातही आपणास प्रसन्न वाटते, परंतु १६५२ साली समर्थ या घळीत आले तेव्हा लेखक चिंचोळकरांच्या म्हणण्याप्रमाणे हिंस्त्र श्वापदे येथे फिरत असत आणि त्यांच्या घनदाट जंगलांच्या सान्निध्यात राहाणे हे एकट्या समर्थांनाच शक्य होते. याशिवाय १९६० साली या घळीत समर्थांच्या मूर्तीची स्थापना झाली तेव्हा येथे खुद्द घळ सोडली तर निवासाचे साधन नव्हते. घळ म्हणजे समारे १२५ फूट लांब व ७५ फूट रुंद असा परिसर. त्यावेळी पोतनीस नावाचे गृहस्थ पूजाअर्चा करण्यासाठी येथे राहिले, तेव्हा अनेकवेळा येथे हिंस्त्र श्वापदे येत. त्यासाठी पोतनीसांनी लोखंडी गजांचा पिंजरा स्वतःला राहण्यासाठी केला होता. त्यात त्यांचे वास्तव्य असे, असे चिंचोळकरानी नमूद केले आहे.

चिंचोळकर म्हणतात, दासबोधांची जन्मभूमी असून या घळीकडे पाहिले जाते, परंतु ती लिहिण्यासाठी माणसापासून दूर जावळी खोऱ्यात दडलेल्या घळीत समर्थ का आले? वाईपासून पोलादपूरपर्यंत भोरपासून संपूर्ण वरंध घाट जावळी खोऱ्यात मोडतो. परंतु समर्थांनी दासबोध लिहिण्याबरोबरच महाराजांना मदत करण्याच्या दृष्टीने जावळीच्या राजकारणात सक्रीय पण सावधपणे भाग घेण्याचे ठरविले होते. असे म्हणून चिंचोळकर लिहितात, जावळीचे राजे चंद्रराव मोरे यांच्या पूर्वजांची घळीच्या माथ्यावर अवघ्या दीड कोसावर आजही येथे वस्ती आहे. चंद्राजीराव मोऱ्यांच्या घराचे जोतेही आजही घळीच्या माथ्यावर पाहावयास मिळतात.

सध्या घळीत सहामण वजनाची भव्य मूर्ती असून कै. शंकरराव देवांच्या सहकार्याने या समर्थांच्या मूर्तीची स्थापना झाली आहे. समर्थांनी घळीत गणेशोत्सव साजरा केला होता, तेव्हा महाराज उपस्थित होते, याचाही उल्लेख आढळतो. हल्ली येथे सुंदरमठ सेवासमिती, सेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली घळीत या समितीने कामास सुरूवात केली असून येथे सुंदर मठात राहण्याची व्यवस्था आहे. श्री. मामासाहेब गांगल नावाचे एक सेवाभावी गृहस्थ ८२ सालापासून येथे काम पहात होते. त्यांच्या मागे त्यांचे पुत्र हे काम पहात आहेत. येथे कार्यकर्त्यांची भेट झाली. त्यावेळी घळीवरून पांढरा शभ्र पाण्याचा धबधबा ८ माहने सतत वाहात असतो. परंतु शासनकर्त्यांकडे पाणी आडवण्याची योजना नसल्यामुळे हे सारे पाणी वाहून फुकट जाते. वास्तविक शिवथरघळ खोऱ्यातील भौगोलिक स्थितीचा वापर करून येथे छोटे बंधारे बांधले तर या खोऱ्यातील गावांना १२ महिने पाण्यात लाभ होईल व त्यामुळे उन्हाळी भाजीपाला आदी पिके त्याना घेता येतील.

मी शिवथरघळ येथन आल्यानंतर साकव या संस्थेचे विश्वस्त श्री. अरुण शिवकर यांची भेट झाली, चर्चेत शिवथरचा भौगोलिक व ऐतिहासिक विषय सांगितला व उन्हाळ्यात पाण्याची बोंबाबोंब हा विषय निघताच त्यांनी सार्वजनिक संग व वॉटरशेड योजना, पुणे या संस्थेची एक योजना दाखविली. शिवथरघळ खोऱ्यात ही योजना राबविली तर हा भाग बाराही महिने वनश्रीने न्हाऊन निघेल. या योजनेचे ध्येय असे आहे की, प्रचंड प्रमाणावर झालेल्या जंगलतोडीमुळे बांधकामासाठी, शेती अवजारासाठी लाकूड मिळणे मुश्कील झाले आहे. त्याशिवाय जमिनीत मुरणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होऊन रब्बी पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. गुरांना मिळणारा चारा निकृष्ट दर्जाचा असल्याने गुरांची दूध देण्याची क्षमता ५ ते ७ लिटरवरून १ ते २ लिटरवर आली आहे. निसर्गावरील अत्याचाराचा परिणाम कमी झालेल्या पावसात व वेळेवर न होणाऱ्या पावसात तुटपुंज्या पाणी पुरवठ्यात सुक्या आणि ओल्या दुष्काळाच्या रुपाने आपण भोगतच आहोत. या सर्वांचा माणसावर झालेला परिणाम वाढत्या गरीबीत खेड्यातून शहराकडे पोट भरण्यासाठी जाणाऱ्या लोकांच्या लोंढ्यात आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जमीन विक्रीमध्ये दिसून येतो. या योजनेचे ध्येय काय? थोडक्यात या योजनेचे ध्येय असे, निसर्गाचे आपले जीवन सुखी व समृद्ध बनविण्यासाठी पुनरुजीवन करणे हे सर्व करण्यासाठी सर्वसाधारणपणे एखाद्या लहानशा नदीचे किंवा आढ्याचे खोरे ज्याचा विस्तार ५-६ खेड्यापेक्षा जास्त नसेल असा समूह निवडावा. ही सर्व खेडी एका खोऱ्यातील असल्यामुळे त्यांच्यात नैसर्गिकच दुवे असतात. शिवाय सर्व माणसे एकमेकांना नात्यानं किंवा ओळखीने जोडलेली असतात. अशा ठिकाणी सर्वांना फायदा करून देणारी योजना एकत्र राबविता येण्याची शक्यता जास्त असते. या समूहाला योजनेच्या शास्त्रीय परिभाषेत 'वॉटरशेड' असे म्हणतात. तर थोडक्यात 'वॉटरशेड' म्हणजे एका ओढ्याच्या किंवा अगदी लहानशा नदीच्या खोऱ्याने बांधलेला ४-६ खेड्यांचा समूह. (काम चालू करताना एका खेड्यात चालू करायचे का सर्व समूहात चालू करायचे हा निर्णय ज्याच्या त्याच्या कामाच्या पद्धतीवर व कुवतीवर अवलंबून ठेवावा.) वॉटरशेडची सर्वसाधारणपणे डोंगरमाथे, जिथून पाणी दोन्ही बाजूच्या उतारावर वाहून जाते तिथून वॉटरशेडची हद्द चालू होते, असे ठरवितात. डोंगराळ भागामध्येही ही हद्द ठरविणे सहज शक्य असते. पण सपाट खोऱ्यांमध्ये ही हद्द काही यंत्राच्या साह्याने ठरवता येते, येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की जसजसे खोरे सपाट होऊ लागते तसतसे खोऱ्यांचे आपले वैशिष्ट्य कमी होते व तेव्हा आपण किती खेडी परिवर्तनासाठी घेऊ शकतो यावर खेड्यांचा समूह ठरविणे जास्त चांगले. शिवथर परिसर जावळी खोऱ्यात अशा योजना राबविल्या तर शिवथर परिसर या औद्योगिकीकरणाच्या काळातही इतिहासातल्या घनदाट जावळी खोऱ्याची आठवण सातत्याने आपणास करून देईल. परंतु अशावेळी येथे या योजनेत खिळ घालणारे स्वराज्यशत्रू नसतील याचेही भान राखणे जरूरीचे आहे.

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press