कहाणी महाबळेश्वरच्या आर्थरसीटची

महाबळेश्वरला गेल्यावर अगदी आवर्जून बघितला जातो तो आर्थरसीट पॉईंट. याची समुद्रसपाटीपासूनची उंची १४७३ मीटर अर्थात ४४२१ फूट इतकी आहे. इथून दिसणारा देखावा केवळ नयनरम्य असतो. किल्ल्यांची माहिती असेल तर इथून खालच्या बाजूला दिसणारे चंद्रगड, मंगळगड हे किल्ले.

कहाणी महाबळेश्वरच्या आर्थरसीटची

पायथ्याशी असलेल्या ढवळे गावातून चंद्रगडाला वळसा घालून ढवळ्या घाटाने पाच तासांची दमछाक करणारी चढण चढून आले की आपण येतो ते आर्थरसीट पॉईंटच्या खाली. मुळात याचं नाव आहे मढीमहाल. मग मढीमहालाला कुठून पडले हे आर्थरसीट पॉईंट असे नाव ? त्याच्या पाठीशी एक करूण कहाणी आहे.

सर चार्लस मॅलेट हा १७९१ साली पुणे दरबारात रेसिडेंट होता. त्याचा मुलगा आर्थर मॅलेट. हा आर्थर मॅलेट मुंबईहून महाबळेश्वरला येण्यासाठी निघाला. त्याकाळी हा प्रवासमार्ग काहीसा विचित्र होता. मुंबईहून बाणकोट बंदरापर्यंत बोटीने प्रवास. मग तिथून पुढे सावित्री नदीच्या काठाने महाबळेश्वरकडे असा हा मार्ग होता. हा आर्थर मॅलेट त्यांची पत्नी आर.वाय. सोफिया, आणि जेमतेम ३२ दिवसांची मुलगी एलेन यांच्यासह मुंबईहून बाणकोटकडे निघाला खरा, परंतु त्याची बोट ऐन वादळात सापडली. या वादळात त्याच्या बोटीवरील तेरा खलाशी, मॅलेटची पत्नी आर. वाय. सोफिया आणि त्याची जेमतेम ३२ दिवसांची मुलगी एलेन हॅरीएट यांना जलसमाधी मिळाली. बाणकोटच्या हिंमतगडाच्या थोडेसे खालच्या अंगाला त्यांचे दफन केले गेले. तिथेच त्यांचे स्मरणस्थळ आहे. सुघड दगडी चौथरा, कळाशीदार स्तंभ, आणि त्यावर संगमरवरी शिलाफलक लावला आहे.

Here the mortal remain of RY Sophia Morcia aged 25 years and ELLEN HARRIET aged 32 days the beloved wife and Daughter of ARTHUR MALLET of the Bombay Civil Service. असे त्या फलकावर लिहिले गेले.

आर्थर मॅलेट पुढे महाबळेश्वरला पोहोचला. कामातून सवड काढून तो सावित्री नदीच्या उगमाशी एका कड्याच्या टोकाशी मढीमहालाशी अत्यंत दु:खित अंतःकरणानी टक लावून तासनतास पाहत बसे. ती जागाच आता आर्थर सीट म्हणून ओळखली जाते. या ठिकाणाहून किंचित खालच्या बाजूला भैरोबाचं ठाणं आहे. ढवळ्या घाटानी येणारा पदभ्रमण मार्ग इथून येतो. हे ठिकाण नितांतरमणीय आहे. ऐन घाटमाथ्यावरचा भन्नाट वारा इथे अनुभवता येतो. महाबळेश्वर भेटीत आर्थरसीट बघायला आल्यावर क्षणभर आर्थर मॅलेटची आठवण जरूर काढावी.