दत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस

दत्ताचा जन्मदिवस म्हणून प्रसिद्ध अशा दत्तजयंतीचा इतिहास सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. पौराणिक काळात अत्री नामक प्रसिद्ध महर्षी होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव अनुसया होते.

दत्तजयंती - श्री दत्तगुरूंचा जन्मदिवस

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

हिंदू धर्मात दत्त देवतेचे महत्व मोठे आहे कारण ही देवता साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या तीन सर्वोच्च देवता एकत्रित येऊन निर्माण झालेली देव आहे व त्यामुळे या देवतेच्या उपासनेने तीनही देवतांची उपासना केल्याचे फळ प्राप्त होते व गेल्या हजारो वर्षांपासून दत्तभक्तीची परंपरा संपूर्ण भारतात प्रचलित आहे.

दत्त हे मुख्य दैवत मानून दत्त भक्तीवर आधारित जो संप्रदाय निर्माण झाला त्यास दत्तसंप्रदाय म्हणून ओळखले जाते व या संप्रदायात अनेक गुरु व शिष्यांची परंपरा आजतागायत पाहावयास मिळत आहे. दत्तास आपण गुरु मानतो व जय श्री गुरुदेव दत्त हा दत्तमंत्र अनेक दत्तभक्तांच्या मुखी असतो.

दत्तदेवतेचा या भूतलावर अवतार ज्या दिवशी झाला तो दिवस दत्तजयंती या नावाने प्रसिद्ध आहे आणि हा दिवस मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दत्तजयंतीपासून पुढील काही दिवस हा उत्सव दत्तभक्तांकडून अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो व या काळात पूजा अर्चा, पारायणे, कीर्तने आदींची मेजवानी भाविकांना प्राप्त होते.

दत्ताचा जन्मदिवस म्हणून प्रसिद्ध अशा दत्तजयंतीचा इतिहास सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. पौराणिक काळात अत्री नामक प्रसिद्ध महर्षी होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव अनुसया होते. अनुसया अत्यंत पतिव्रता आणि धार्मिक स्वभावाची होती. अनुसयेच्या पतिधर्मपारायणाची कीर्ती त्रिलोकात पोहोचली असल्याने साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या तीन देवतांना अनुसयेची सत्वपरीक्षा घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी याकरिता एक विचित्र योजना तयार केली. 

एके दिवशी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव वृद्ध ब्राह्मणांचा वेष धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात पोहोचले व यावेळी अनुसया एकटीच आश्रमात होती. तिघांनी यावेळी अनसूयेकडे विवस्त्र होऊन आम्हास अन्नदान द्यावे अशी विक्षिप्त मागणी केली व या मागणीने इतरांस कायम मदत करण्यास तत्पर अशी अनुसया खूप दुःखी झाली. 

कठोर पातिव्रत्याचे आचरण करणाऱ्या अनुसयेकडे एक दिव्य शक्ती सुद्धा होती जी तिच्या सत्वशीलतेमुळे तिला प्राप्त झाली होती त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तिच्या सत्वाचे रक्षण होऊन भिक्षादान देणे सुद्धा शक्य होणार होते.

त्रिमूर्तींच्या मागणीनुसार अनुसया आतील खोलीत अन्न आणण्यास गेली आणि त्रिमूर्तींच्या इच्छेनुसार बाहेर पडण्याअगोदरच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचेही रूपांतर लहान बालकांत झाले व माता आणि बालक यांचे नाते हे सर्वात पवित्र मानले जात असल्याने अनुसयेचे सत्व नष्ट झाले नाही. 

अनुसयेची सत्वशीलता पाहून तीनही देव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी आपले मूळ रूप धारण करून आम्ही तिघेही तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्मास येऊ असा आशीर्वाद तिला दिला आणि तिघेही अंतर्धान पावले. कालांतराने साक्षात त्रिमूर्तींना नऊ महिन्यांचा गर्भवास भोगावा लागला आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेस अनुसयेच्या पोटी ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांचाही अंश असलेला दिव्य बालक जन्मास आला व या पुत्राचे नाव अत्री ऋषी आणि अनुसयेने दत्त असे ठेवले.

दत्त अवतार हा त्रेतायुगात झाल्याचे वर्णित झाले आणि दत्ताची कीर्ती प्राचीन काली सुद्धा एवढी दिगंत होती की अनेकांनी दत्तात्रेयांना आपले गुरु मानले व दत्तगुरूंच्या प्रसिद्ध शिष्यांमध्ये सहस्त्रार्जुन उर्फ कार्तिवीर्य, प्रल्हाद, यदु आणि अलर्क यांची नावे घेतली जातात. दत्तगुरु हे ब्रह्मविद्येचे कारक असून त्यांची आराधना केल्यास ही विद्या प्राप्त होते असे मानले जाते.