किल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख

रायगड किल्ल्यावर सद्यस्थितीस एकूण तीन लेख आहेत व यापैकी दोन शिवकालीन लेख हे सुस्थितीत असून तिसरा शिवपूर्वकालीन लेख आहे तो आता काळाच्या ओघात लोखंडाची झीज झाल्याने नष्ट झाला आहे.

किल्ले रायगडावरील एक अज्ञात शिलालेख

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर किल्ल्याच्या वैभवात भर घालणारे एकूण तीन ऐतिहासिक लेख विद्यमान आहेत. पहिला लेख म्हणजे जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर कोरलेला सेवेचे ठायी तत्पर, हिरोजी इंदुलकर हा मराठी शिलालेख, दुसरा लेख म्हणजे जगदीश्वर मंदिराच्या नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूस डावीकडे कोरलेला प्रासादो जगदीश्वरो हा संस्कृत शिलालेख आणि तिसरा व फारसा प्रसिद्ध नसलेला लेख म्हणजे रायगड किल्ल्यावरील लोहस्तंभावर कोरला गेलेला एक यादवकालीन लेख ज्याचे वाचन गो.नि. दांडेकरांनी केले होते. या तीन लेखांमधील पहिले दोन शिलालेख हे शिवकालीन असून तिसरा स्तंभलेख हा शिवपूर्वकालीन आहे.  

रायगड किल्ल्याचा इतिहास हा यादवकाळापासून आढळतो, काही काळ हा किल्ला विजयनगर राज्याच्या अखत्यारीत असल्याचे उल्लेखही आढळतात. विजयनगर नंतर बहामनी, निजामशाही आणि आदिलशाही सत्तांच्या अखत्यारीत रायगड किल्ला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणल्यावर थोड्याच काळात या किल्ल्यास स्वराज्याच्या राजधानीचा मान प्राप्त झाला आणि किल्ल्याचे महत्व सर्वोच्च स्तरावर प्रस्थापित झाले.

रायगड किल्ल्यावर अशा असंख्य वास्तू व वस्तू आजही आहेत ज्या आजही प्रकाशझोतात यायच्या आहेत व गेल्या काही वर्षांत रायगड किल्ल्यावर  पुरातत्व खाते आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून जे संवर्धन व उत्खनन सुरु आहे त्यातून नवीन नवीन माहिती प्रकाशझोतात येत आहे. रायगडावरील अनेक ज्ञात अज्ञात ऐतिहासिक वास्तू व वस्तू प्रकाशझोतात याव्यात आणि त्यांचे संवर्धन व्हावे अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे आणि किल्ल्यावरील अशाच एका अप्रकाशित गोष्टीबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

रायगड किल्ल्यावर सद्यस्थितीस एकूण तीन लेख आहेत व यापैकी दोन शिवकालीन लेख हे सुस्थितीत असून तिसरा शिवपूर्वकालीन लेख आहे तो आता काळाच्या ओघात लोखंडाची झीज झाल्याने नष्ट झाला आहे तरी त्या लेखाचे पूर्वी वाचन करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र या तीन लेखनव्यतिरिक्त रायगड किल्ल्यावर आणखी एक लेख आहे जो सध्या तेथे पाहावयास मिळत नसला तरी फार पूर्वी म्हणजे अदमासे ९० वर्षांपूर्वी रायगडास भेट देणाऱ्या गोविंदराव फडके यांना आढळला होता.

गोविंदराव यांनी १९३० सालापूर्वी रायगड किल्ल्यास भेट दिली होती आणि त्यांनी यावेळी किल्ल्याचे जे चौफेर दर्शन घेतले होते त्यावेळी त्यांना एक शिलालेख दिसून आला होता. हा लेख संस्कृत भाषेतील होता की मराठी याचा उल्लेख त्यांनी केला नसला तरी त्याचे वाचन त्यांनी करण्याचा प्रयत्नही केला होता.

हा अज्ञात शिलालेख रायगड किल्ल्यावरील प्रसिद्ध जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणात मंदिराच्या पूर्व दिशेस कोरण्यात आला होता व काळाच्या ओघात त्यावरील अक्षरे नष्ट होण्याच्या मार्गावर होती. 

या शिलालेखात पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील दिवाकर नामक एका सावकाराचा उल्लेख असून जगदीश्वर मंदिरासंबंधी उभारणीविषयी हा लेख होता आणि त्या लेखाचा काळ १६७३ असा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक १६७४ साली संपन्न झाला त्यामुळे या लेखाचा काळ हा राज्याभिषेकापूर्वी एक वर्षे असा निघतो.

गोविंदराव यांनी या अस्पष्ट अशा लेखाचे वाचन केले व त्यांनी त्याकाळी या लेखाची माहिती इतिहास संशोधकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली होती मात्र पुढील काळात या शिलालेखावर काय संशोधन झाले याची काहीच माहिती मिळत नाही.

जगदीश्वर मंदिरातील या अज्ञात शिलालेखाचा शोध घेण्यासाठी व जर तो लेख आढळल्यास त्याची माहिती व्यवस्थापनाला देण्याच्या हेतूने आम्ही गेल्या महिन्यात भेट दिली मात्र आम्हास तो शिलालेख दिसून आला नाही. ९० वर्षांपूर्वीच हा लेख अतिशय अस्पष्ट झाल्याचे गोविंदराव यांनी सांगितले होते त्यामुळे सद्यस्थितीस तर या लेखावरील अक्षरे पूर्णपणे दिसेनाशी झाली असण्याची शक्यता आहे तरी या लेखाच्या माध्यमातून आमची पुरातत्व खाते आणि रायगड विकास प्राधिकरण यांस विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा या लेखाचा शोध घेण्याची मोहीम राबवून रायगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा हा पुरावा प्रकाशझोतात आणावा.