देव मामलेदार आणि सटाणा

काही गावे ही तिथे होऊन गेलेल्या सत्पुरुषांमुळे कायमची लक्षात राहतात. सटाणा हे नाव घेतले की साहजिकच देव मामलेदारांचे नाव समोर येते. मोगलाईत मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांची कथा आपल्याला माहिती आहेच.

देव मामलेदार आणि सटाणा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

दुष्काळ पडला म्हणून दामाजीपंतांनी सरकारी कोठीतील धान्य गोरगरिबांना वाटले होते. मग पुढे पंढरीच्या विठ्ठलाने त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा केले. अशी ती कथा. ‘काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ’ हे गदिमांनी रचलेले प्रसिद्ध गीत याच प्रसंगावर आधारित आहे.

श्री यशवंत महादेव भोसेकर हे गृहस्थ सन १८६९ साली सटाणा इथे मामलेदार म्हणून नोकरीला आले. सन १८७०-७१ मध्ये नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यात भीषण दुष्काळ पडला. त्यावेळी या मामलेदारांनी नागरिकांच्या मदतीसाठी सरकारी पूर्वपरवानगी शिवाय तातडीने जवळजवळ सव्वा लाख रुपये दुष्काळग्रस्त नागरिकांना वाटले आणि त्यांचे जीव वाचवले. सत्प्रवृत्तीच्या या मामलेदारांना नागरिकांनी देवत्व बहाल केले आणि ते त्यानंतर ‘देव मामलेदार’ म्हणूनच ओळखले जाऊ लागले. देव मामलेदार किंवा यशवंत महाराजांचे पुढे सटाणा इथे मंदिर बांधलेले आहे.

त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या करमभोसे या गावी वडील महादेव व आई सौ. हरीबाई यांच्या पोटी १३ ऑगस्ट १८१५ रोजी झाला. सरकारी नोकरीत राहून त्यांनी आपला परोपकाराचा पिंड जपला आणि रंजल्या गांजल्यांची सेवा केली. अतिशय निरपेक्ष वृत्तीने ह्या माणसाने लोकांच्या मनात स्थान मिळवले. आजचा दिवस त्यांची जयंती म्हणून सटाणा इथे साजरा केला जातो.

देव मामलेदार यांचे निर्वाण नाशिक क्षेत्री झाले. त्याप्रसंगी नाशिक इथले कवी नारायण वामन टिळक यांनी त्यांच्यावर रूपकात्मक काव्य रचलेले आहे.

“देह तालुका यशवंताने मामलती केली, स्वर्गींचे सूर ऐकुनी कीर्ति पिटिती हो टाळी ||”

अशा स्वरुपात देव मामलेदारांचे गुणगान कवीने केलेले आहे. देव मामलेदार यांच्या पुण्यादिनी म्हणजे मार्गशीर्ष वद्य एकादशीला सटाणा इथे मोठी यात्रा भरते. त्यादिवशी पहाटे ४ वाजता महाराजांची पूजा त्यावेळच्या तहसीलदाराकडून केली जाते.

एक सरकारी अधिकारी आपल्या परोपकारी वृत्तीमुळे नागरिकांच्या मनात देव बनून राहतो आणि त्याची आठवण आज वर्षानुवर्षे तिथली प्रजा आपल्या मनात साठवून आहे हे किती मोठे भाग्याचे लक्षण. देव मामलेदारांमुळे अर्थातच सटाणा या गावाला पण मोठेपण प्राप्त झालेले आहे यात नवल नाही.