शिवाजी महाराजांच्या दीर्घकालीन वास्तव्याने पुनीत झालेली स्थळे 

महाराजांच्या बालपणापासून स्वराज्याची उभारणी करण्याचे आद्यप्रसंग ज्या ज्या ठिकाणी घडले ती ठिकाणेही राजधानीच्या दृष्टीने निश्चितच कमी महत्वाची नव्हती.

शिवाजी महाराजांच्या दीर्घकालीन वास्तव्याने पुनीत झालेली स्थळे 

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

इसवी सन १६३० ते इसवी सन १६८० म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णयुग. कारण हा काळ खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पुनरुत्थानाचा काळ होता. या काळास मिळालेले सर्वाधिक लोकप्रिय नाव म्हणजे शिवकाळ. फक्त ५० वर्षांचा हा काळ मात्र या काळाने भूतकाळात घडलेल्या इतिहासाचे पुनर्निर्माण केले व भविष्यकाळ उज्वल होण्यासाठी योगदान दिले. 

शिवकाळाचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या अवघ्या आयुष्यात प्रयत्नांची प्रचंड पराकाष्ठा करून जनतेचे स्वराज्य निर्माण केले व हे करत असताना एका स्थानी राहणे तर दूरच एका एका दिवसातही शेकडो मैलांचा प्रवास करून दुसऱ्या प्रांतात स्वराज्याचा ध्वज उभारण्यासाठी महाराज अहोरात्र धावपळ करत असत. मात्र हे करताना कौटुंबिक दृष्ट्या महाराजांचा परिवार एका ठिकाणी असणे महत्वाचे होते व मोहिमांच्या आखण्यांची सुरुवात ज्या सुरक्षित स्थळी करावयाची गरज असे व हे करताना राज्यकारभार जेथून करता येत होता अशा मध्यवर्ती ठिकाणांना राजधानीचे महत्व प्राप्त झाले. 

महाराजांचा राज्याभिषेक सन १६७४ साली किल्ले रायगडावर झाल्याने हा किल्ला महाराजांची अधीकृत राजधानी मानला जातो मात्र त्यापूर्वी महाराजांच्या बालपणापासून स्वराज्याची उभारणी करण्याचे आद्यप्रसंग ज्या ज्या ठिकाणी घडले ती ठिकाणेही राजधानीच्या तुलनेत निश्चितच कमी महत्वाची नव्हती. या लेखात आपण महाराजांच्या कार्यकाळातील अशाच महत्वाच्या स्थानांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 

शिवनेरी किल्ला (सन १६३० ते इसवी सन १६३६)

हा किल्ला म्हणजे साक्षात शिवसूर्याचें जन्मस्थान. स्वराज्यजननी जिजामातांच्या उदरी सन १६३० मध्ये महाराजांचा याच किल्ल्यावर जन्म झाला. या किल्ल्याची गडदेवता आई शिवाई हिच्या साक्षीने महाराजांचे नामकरण याच किल्ल्यावर करण्यात आले. या वेळी शाहजी महाराज मोगलांविरुद्ध युद्धाच्या धुमश्चक्रीत होते. महाराजांच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी शहाजी महाराजांनी लहानग्या शिवबाचे मुखदर्शन शिवनेरीवर घेतले. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या निवासाचा काळ हा इसवी सन १६३० ते इसवी सन १६३६ असा एकूण सात वर्षांचा मानला जातो.

कसबे खेडे बारे (सन १६३७ ते सन १६३९)

निजामशाही वाचवण्याचा यत्न प्रथम केल्यावर नाईलाजास्तव  शहाजी महाराजांनी मोगल व आदिलशाह या दोन सत्तांसोबत तह केला यावेळी शिवनेरीचा किल्ला हा शहाजी महाराजांच्या ताब्यातून गेला. पुढे शाहजी महाराजांना पुणे प्रांताची जहागिरी प्राप्त झाली. यापैकी कर्यात मावळचा पोट मोकासा शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या नावे केला तसेच मावळची काही जहागीर देखील त्यांच्या नावे केली या मध्ये खेडे बारे चा समावेश होता. पुढे कसब्याच्या शिवारात एक नवीन पेठ वसवण्यात आली व तिला पेठ शिवापूर असे नाव देण्यात आले. शिवरायांचे कसबे खेड येथे एकूण दोन वेळा राहणे झाले त्यापैकी पहिल्या वेळी सन १६३७ ते सन १६३९ अशी तीन वर्षे महाराज या ठिकाणी राहिले. 

बंगळूर (सन १६४० ते सन १६४१)

शिवाजी महाराज कसबे खेड येथे असताना शहाजी महाराजांना बंगळूरची जहागिरी मिळाली व यानंतर महाराजांचे बंगळूर येथे आगमन झाले. बंगळूर येथे शिवाजी महाराज एकूण एक वर्षे म्हणजे सन १६४० ते सन १६४१ या कालावधीमध्ये होते.

पुन्हा कसबे खेडे बारे (सन १६४२ ते सन १६४९)

बंगळूरहून शिवाजी महाराज सन १६४२ साली परत कसबे खेडे बारे येथे दाखल झाली. यावेळी शहाजी महाराजांनी आपली पुणे जहागीर शिवाजी महाराजांच्या नावे केली व हा काळ स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीचा काळ मानला जातो. सुरुवातीस महाराजांचे वास्तव्य कसबे खेडे बारे येथेच होते व तेथूनच ते जहागिरीचा कारभार सांभाळत होते. कसबे खेडे बारे मध्ये त्यांचे दुसरे वास्तव्य एकूण आठ वर्षे म्हणजे सन १६४२ ते सन १६४९ या कालावधीत होते. 

पुणे (सन १६४९ ते सन १६५५)

कसबे खेडे बारे हुन महाराजांचे पुणे जहागिरीचे मुख्य स्थान असलेल्या पुणे येथे इसवी सन १६४९ मध्ये आगमन झाले. यावेळी शहाजी महाराजांच्या ताब्यात जो हिरडस मावळाचा भाग होता त्याचे व्यवस्थापन शिवाजी महाराज करत असत. पुणे येथे महाराजांच्या व जिजाऊंच्या निवासासाठी लाल महालाची उभारणी करण्यात आली व येथूनच महाराज जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली कारभार चालवीत असत. महाराजांचे पुण्यातील वास्तव्याचा काळ सन १६४९ ते सन १६५५ असा म्हणजे एकूण ७ वर्षांचा आहे. 

पुरंदर (सन १६५६ ते १६५७)

सन १६५५ पासून महाराजांनी थेट आदिलशहास आव्हान देऊन स्वतंत्र हालचाली सुरु केल्या यावेळी एखादे दुर्गम स्थळ आपल्या निवासाचे ठिकाण बनवावे असा विचार करून महाराजांनी पुरंदर किल्ल्यास प्रयाण केले. याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. याशिवाय या किल्ल्यावर अनेक महत्वाचे कारखाने व इमारती उभारण्यात आल्याचे उल्लेखही मिळतात. किल्ले पुरंदरावरील महाराजांचे वास्तव्य एकूण दोन वर्षांचे म्हणजे सन १६५६ ते १६५७ या कालावधीतील होते. 

किल्ले राजगड (सन १६५८ ते सन सन १६७१)

महाराजांच्या दीर्घकालीन वास्तव्याने पुनीत असा हा किल्ला आहे. पुरंदरावरून महाराजांनी १६५८ साली आपले ठाणे राजगड येथे हलवले व स्वराज्याचे मध्यवर्ती ठिकाणी करून अनेक इमारतींची बांधणी या किल्ल्यावर केली. तोरणा किल्ला ताब्यात घेतल्यावर तेथे सापडलेल्या खजिन्याचा वापर महाराजांनी राजगड बांधण्यास केला व आपले भक्कम ठाणे येथे उभारले. या किल्ल्याने महाराजांच्या कार्यकाळातील अनेक महत्वाचे प्रसंग पाहिले. राजगडावरील महाराजांचे वास्तव्य सन १६५८ ते सन १६७१ इतके म्हणजे एकूण १४ वर्षांचे होते. 

किल्ले रायगड (सन १६७२ ते सन १६८०)

महाराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाल्यावर एका प्रशस्त व सुरक्षित राजधानीची गरज भासू लागली व या सर्वांचा विचार करून महाराजांनी १६७२ साली आपले ठाणे हलवले. रायगड किल्ल्याची भौगोलिक रचना व उंची त्याला अधिक दुर्गम बनवत असल्याने हा किल्ला एक अभिषिक्त राजधानी म्हणून योग्य आहे असे शिवाजी महाराजांना जाणवले. याच किल्ल्यावर १६७४ साली महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा झाला. जनतेचा राजा सिंहासनाधिष्टीत झालेला समस्त जगाने पाहिला. १६८० साली रायगड किल्ल्यावर महाराजांचे वयाच्या ५०व्या वर्षी देहावसान झाले. रायगड किल्ल्यावरील महाराजांचे वास्तव्य एकूण ९ वर्षांचे म्हणजे सन १६७२ ते सन १६८० असे होते.