बहिर्जी नाईक - स्वराज्याच्या हेरखात्याचे प्रमुख

शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे बहिरजी (बहिर्जी) नाईक. बहिरजी (बहिर्जी) नाईक यांच्याविषयी ठाऊक नाही असा माणूस विरळाच कारण कथा, कादंबऱ्या, ग्रंथ, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून बहिरजी (बहिर्जी) नाईक यांचे दर्शन आपल्यास होत असते.

बहिर्जी नाईक - स्वराज्याच्या हेरखात्याचे प्रमुख

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

छत्रपती शिवाजी महाराज एक जागतिक दर्जाचे शासक होते याविषयी भारतीय व विदेशी इतिहास अभ्यासकांचे एकमत आहे. एका उत्तम शासकाकडे जे विविध गुण असावे लागतात ते शिवाजी महाराजांकडे होते व या गुणांमधील एक गुण म्हणजे माणसांची पारख. महाराजांनी स्वराज्य कार्याच्या सुरुवातीपासून माणसांची पारख करून त्यांना त्यांच्या कला गुणांनुसार विविध जबाबदाऱ्या दिल्या व महाराजांनी जी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे ती यशस्वी करण्यासाठी या माणसांनी आपले सर्वस्व अपर्ण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राज्यव्यवस्था सुरळीत चालावी यासाठी विविध खाती निर्माण करून त्यांची जबाबदारी कर्तबगार व्यक्तींकडे दिली होती व या खात्यांपैकी एक महत्वाचे खाते म्हणजे हेर खाते. शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रंथांत हेरखात्याचे महत्व प्रतिपादित करण्यात आले असून शुक्रनीति या ग्रंथात "शतकोशभवा वार्ता हरेदेकदिनेन वै" अर्थात शंभर कोसांवर घडलेली बातमी एका दिवसात समजण्याची योजना राजाने करावयास हवी या शब्दात गुप्तहेर खात्याचे महत्व समजावून सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तहेर खात्याचे महत्व सुरुवातीपासूनच माहित असल्याने त्यांनी गुप्तहेरांचे एक जाळे निर्माण केले होते व या खात्यातील लोक राज्यातील व परराज्यातील घडामोडी गुप्तपणे जाणून त्या महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत. शिवचरित्रात शिवाजी महाराजांच्या हेरखात्याचे अनेक दाखले आढळतात. सभासद बखरीत शिवाजी महाराजांच्या हेरखात्याच्या कार्यस्वरूपाची पुढीलप्रमाणे माहिती आहे.

पुढे जितकी शहरे मोगलाईत होती ते जागा चार पाच माणसे वेषधारी करून पाळतीस ठेविली. पाळती घेऊन दोघे खबर घ्यावयास यावे. दोघांनी तेथे हुशार राहावे. मग लष्कर पाठवून हवेलीया, शहरे मारावी ही तजवीज केली.

शिवकाळात विश्वासराव नानाजी दिघे, आबाजी विश्वनाथ प्रभू, सुंदरजी प्रभू इत्यादी व्यक्तींनी प्रसंगानुरूप गुप्तहेर म्हणून कार्य केले होते मात्र पूर्णवेळ गुप्तहेर म्हणून ज्यांनी कार्य केले ते म्हणजे बहिरजी (बहिर्जी) नाईक. बहिरजी (बहिर्जी) नाईक यांच्याविषयी ठाऊक नाही असा माणूस विरळाच कारण कथा, कादंबऱ्या, ग्रंथ, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांतून बहिरजी (बहिर्जी) नाईक यांचे दर्शन आपल्यास होत असते. गुप्तहेर खात्याविषयी सर्वांच्या मनात एक कुतूहल असते व त्यामुळे शिवकालीन गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणून कार्य केलेल्या बहिरजी (बहिर्जी) नाईक यांच्या चरित्राविषयी जाणून घेण्यास प्रत्येक जण उत्सुक असतो.

खरं तर गुप्तहेर या नावातच प्रचंड गुप्तता असल्याने स्वराज्यातील प्रमुख गुप्तहेर असलेल्या बहिरजी (बहिर्जी) नाईकांचे पूर्ववृत सुद्धा गुप्तच आहे त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत मात्र या लेखात बहिरजी (बहिर्जी) नाईकांबद्दल ऐतिहासिक साधनांत अल्पशी का होईना जी माहिती आहे तिच्या आधारे त्यांचे चरित्र जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

सभासद बखर ही शिवचरित्रावरील सर्वात आद्य बखर मानली जाते व या बखरीमध्ये बहिरजी यांचे आडनाव हे जाधव असून नाईक ही त्यांना मिळालेल्या पदाचे नाव होते असा उल्लेख येतो. बहिरजी नाईक यांचा जन्म व कुटुंब याबद्दल ऐतिहासिक साधनांत फारशी माहिती मिळत नाही. बहिरजी नाईक यांचा उल्लेख ऐतिहासिक साधनांत बहिरजी जासूद अथवा जासूदांचा नाईक असा येतो. 

सभासद बखर बहिरजी यांचे 'मोठा शहाणा, हुशार व चौकस' या शब्दांत कौतुक करते यावरून बहिरजी नाईक हे किती कर्तबगार होते याची खात्री पटते.

बहिरजी नाईक शिवाजी महाराजांकडे केव्हा आले असावे हा एक मोठा प्रश्न मात्र सभासद बखरीत या प्रशाचेही उत्तर आहे की अफजलखान वधानंतर बहिरजी नाईक शिवाजी महाराजांकडे आले. कारण अफजलखानावरील मोहिमेच्या वेळी गुप्तहेर म्हणून विश्वासराव नानाजी दिघे यांनी काम केले होते तसेच बहिरजी नाईक यांना गुप्तहेर प्रमुख म्हणून नेमल्याचा उल्लेख अफजलखान वधाच्या प्रसंगानंतर येतो. यासंदर्भात सभासद बखरीत पुढील माहिती आहे.

सरनोबताजवळ बहिरजी जाधव नाईक, मोठा शहाणा, जासूदांचा नाईक केला. तो बहुत हुशार चौकस करून ठेविला.

शिवकाळात नऊ पाईक अर्थात नऊ शिपाई ज्यांच्या अंतर्गत असत त्यांस नाईक हे पद होते. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्यात अत्यंत गुप्तता पाळली जात असल्याने या खात्यात भरमसाठ भरती न करता संख्येने कमी मात्र अत्यंत विश्वासू लोकांचीच नेमणूक केली जात असे. गुप्तहेरास केवळ वेषांतराचीच कला अवगत असून उपयोगाचे नव्हते तर ज्या ठिकाणी तो कामगिरीस जात आहे त्या ठिकाणची भाषा व संस्कृती यांचे ज्ञान सुद्धा असणे आवश्यक असायचे.

गुप्तहेर म्हणून बहिरजी नाईक यांनी केलेले अत्यंत प्रसिद्ध कार्य म्हणजे सुरत या मोगल साम्राज्यातील शहरात गुप्त वेषाने वावरून तेथील इंत्यभूत माहिती काढली. सुरत हे त्याकाळातील एक संपन्न असे व्यापारी शहर असून पुरंदरच्या तहामुळे झालेली स्वराज्याची आर्थिक हानी भरून काढण्याकरिता सुरत शहरावर मोहीम काढणे अत्यंत गरजेचे होते.

बहिरजी नाईक यांच्या सुरतेतील कामगिरीची माहिती ऐतिहासिक साधनांत पुढीलप्रमाणे आढळते.

इतक्यात सुरतेहून पाळती बहिरजी जासूद आला की, सुरत मारल्याने अगणित द्रव्य सापडेल असे सांगितले.

बहिरजी यांनी महाराजांना ही माहिती दिल्यावर महाराजांनी स्वतःहून सुरत मोहिमेची सूत्रे हाती घेतली व ही मोहीम यशस्वी केली. बहिरजी नाईक यांनी सुरतेतील द्रव्याची खडानखडा माहिती दिली असल्याने या मोहिमेत प्रचंड प्रमाणात सोने, रूपे, मोती, पोवळे, माणिक, हिरे, पाचू, गोमेद, वडूर्य इत्यादी नवरत्नांचे साठे आणि मोहरा, पुतळ्या, इभ्राम्या, सतराम्या, अश्रफया, होन इत्यादी नाण्यांचे साठे सापडले.

सुरत मोहिमेनंतर बहिरजी नाईकांनी पार पडलेली दुसरी मोठी जबाबदारी म्हणजे शिवरायांचे निधन होण्यापूर्वीची अखेरची स्वारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जालना शहराची इत्यंभूत माहिती मिळवणे ही होय. जालना हे शहर त्याकाळी मोगल राज्यात असून एक संपन्न शहर म्हणून विख्यात होते. बहिरजी नाईक यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शिवाजी महाराजांनी स्वतःहून जालन्यास वेढा घातला आणि या मोहिमेतही त्यांना अगणित द्रव्य, सोने, रूपे, जड जवाहीर, कापड, घोडे, हत्ती, उंट इत्यादी प्राप्त झाले.

जालनापूर मोहीम यशस्वी झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी बहिरजी नाईक यांचे खूप कौतुक केले आणि त्यांस नावाजून बक्षिस दिले आणि तेथून महाराज पुरंदरकडे रवाना झाले. सभासद बखरीत या घटनेचा पुढीलप्रमाणे उल्लेख येतो. 

राजे बहिरजी नायकावर खुश झाले. त्याजकडे फाजील होते ते माफ करून आणखीही बक्षीस दिले. तेथून सावकाश लष्कर घेऊन राजे पुरंदरास आले.

तर ही आहे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांची अल्पशी माहिती. सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे गुप्तहेर या शब्दातच गुप्तता असल्याने बहिरजी नाईकांचे सखोल चरित्र आजही अज्ञात आहे मात्र त्यांचे प्रकाशात आलेले जे प्रसंग आहेत त्या प्रसंगात त्यांनी जी उत्तम कामगिरी केली त्यामुळे आजही ते सर्वांच्या आदरास पात्र आहेत.