शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा ज्यांच्या नेतृत्वाखाली उभारला गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र छत्रपती राजाराम महाराज.

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

राजाराम महाराजांचा जन्म १६७० साली राजगड किल्ल्यावर झाला. महाराणी येसूबाई या राजाराम महाराजांच्या माता. वयाच्या १० व्या वर्षीच राजाराम महाराज पितृछत्रास पारखे झाले पुढे माता सोयराबाई व ज्येष्ठ बंधू छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रछायेखाली त्यांचे बालपण गेले. संभाजी महाराजांचा राजाराम महाराजांवर खूप जीव होता मात्र शिवोत्तर काळात रायगडावर झालेले राजकारण दोघांमधील अल्पशा दुराव्यास कारण ठरले. 

शिवाजी महाराजांचे निधन झाले तेव्हा संभाजी महाराज पन्हाळा येथे होते. त्यांच्या अनुपस्थितीत अष्टप्रधान मंडळाने अजाण अशा राजाराम महाराजांचा मंचकारोहण समारंभ उरकून घेतला व संभाजी महाराजांना कैद करण्यास पन्हाळ्यास रवाना झाले मात्र राजाराम महाराजांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी संभाजी महाराजांची बाजू घेऊन सर्व मंत्र्यांना कैद केले व दोन महिन्यांनी संभाजी महाराजांचे रायगडास आगमन होऊन त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. 

१६८९ साली संभाजी महाराज संगमेश्वर येथे मोगलांच्या ताब्यात सापडले यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय दुःखद प्रसंग निर्माण झाला. संभाजी महाराजांचा मृत्यू हा स्वराज्याचे खूप मोठे नुकसान करणारा होता. मात्र यावेळी संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी धीरोदात्तपणा दाखवून राजाराम महाराजांची नजरकैदेतून सुटका केली व संभाजी पुत्र शाहू महाराज मोठे होईपर्यंत राजाराम महाराजांनी राज्यकारभार चालवावा असे ठरवून पुन्हा एकदा राजाराम महाराजांचे मंचकारोहण करून घेतले.  मात्र हे करीत असताना राजाराम महाराजांनी आपले आसन फक्त रायगड किल्ल्यावर स्थिर न ठेवता रायगडच्या आसमंतातील इतर कुठल्याही किल्ल्यात बदलत रहावे अशी प्रल्हादजी निराजी इत्यादी मंडळींच्या साहाय्याने योजना केली व स्वतः स्वराज्य रक्षणासाठी राजपुत्र शाहू सहित मोगलांच्या अटकेत गेल्या.

यानंतर राजाराम महाराजांनी निळोपंत पिंगळे यांना पंतप्रधान करून जिंजीच्या किल्ल्याकडे प्रयाण केले यावेळी त्यांच्या सोबत प्रल्हादजी निराजी, धनाजी जाधव ,संताजी घोरपडे, कान्होजी आंग्रे आदी २५ मंडळी होती. हा प्रवास महाराष्ट्राच्या इतिहासातील खूप धाडसी प्रवास म्हणावा लागेल कारण मोगल सैन्य चोहो बाजूनी पसरले असताना संन्याशाच्या वेशात राजाराम महाराजांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह जिंजी गाठली हा प्रवास म्हणजे शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रवासाची पुनरावृत्तीच होता. 

जिंजीस गेल्यावर राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे यांना मुख्य सेनापती म्हणून नेमले व प्रतिनिधीची एक जागा निर्माण करून त्या जागेची सूत्रे प्रल्हादजी निराजी यांच्याकडे दिली. यावेळी राजाराम महाराजांना राज्यपद देण्यात आले मात्र त्यांनी स्वतःहून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण स्वराज्याच्या गादीचे खरे मानकरी संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आहेत असे त्यांचे स्पष्ट मत होते. 

सन १६९५ सालचे राजाराज महाराजांचे एक पत्र आहे जे त्यांनी निळोपंत पिंगळे व प्रल्हादजी निराजी यांच्या करवे प्रभावळीच्या सरदेसाई यांना पाठवले आहे. दाभोळ येथील सरदेशमुखीच्या वतनासंदर्भात हे पत्र असले तरी या पत्रातील १-२ मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत ते म्हणजे.

१. संभाजी महाराजांचा मृत्यू १६८९ साली झाला व हे पत्र १६९५ साली राजारामांकरवी लिहीले गेले आहे. या पत्रामध्ये निळोपंत पिंगळे यांची जी मुद्रा आहे ती संभाजी महाराजांच्याच नावे आहे हा महत्त्वाचा एक मुद्दा. ज्यावरुन हे लक्षात येईल की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही राजाराज महाराज यांनी आपल्या थोरल्या बंधूंच्याच नावे कारभार केला होता व त्यार्थी मुद्राही जुन्याच वापरात ठेवल्या होत्या ती मुद्रा पुढीलप्रमाणे

'श्री शंभू सुमनोत्कंठ मोरेस्वरसुत निळकंठ'

२. दुसरे म्हणजे या पत्रातील वाक्य अतिशय बोलके आहे, या प्रांताची सरदेशमुखी परत एकदा सरदेसायांना देण्याचा विचार संभाजी महाराजांचा होता मात्र अचानक झालेल्या धामधुमी मुळे ते होता होता राहीले.

"परंतु तेच समई तांब्रांची धामधुम जाली वतनाचा कागद आपल्या हातास आला नाही, याउपर महाराजे (राजाराम) दिग्विजय करुन धर्मस्थापना केली."

यानंतर मोगलांनी जिंजीस वेढा दिला जो तब्बल ७ वर्षे चालू होता. जिंजीच्या वेढ्याचा कालावधी जसजसा वाढू लागला ते पाहता येथून दुसऱ्या सुरक्षित जागी जाणे गरजेचे वाटू लागले यानुसार राजाराम महाराजांनी जिंजीहून निसटून प्रथम वेल्लोर व नंतर विशाळगड गाठला. येथून त्यांनी सैन्य घेऊन मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा उभारला व वऱ्हाड खानदेशात स्वाऱ्या केल्या. जालना शहरावर स्वारी केलेली असताना झुल्फिकार खानाने प्रचंड सैन्य घेऊन राजाराम महाराजांवर हल्ला केला तेव्हा राजाराम महाराज या वेढ्यातून सहीसलामत निसटून सिंहगडावर पोहोचते झाले मात्र सिंहगडावर त्यांना नवज्वराची बाधा होऊन  इसवी सन १७०० मध्ये राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. 

राजाराम महाराजांच्या निधनानंतर वीरपत्नी ताराराणी यांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेऊन मोगल साम्राज्यावर प्रहार करणे सुरु केले व मराठ्यांशी लढून लढून बेजार झालेल्या औरंगजेबाचा महाराष्ट्रातच मृत्यू झाला आणि आधीच पोखरल्या गेलेल्या बलाढ्य मुघल साम्राज्याची धूळधाण उडाली.