भुतांचे १४ प्रकार
भुताखेतांच्या गोष्टी या लहानपणापासून आपल्या सवयीच्या भाग झाल्या आहेत. भुते ही असतात अथवा नसतात या प्रश्नापलिकडे अनेक रसांपैकी एक जो मनुष्याच्या गरजेचा भयरस आहे त्याचा अनुभव घेण्यास भुतांच्या गोष्टी वाचणे अथवा ऐकणे हा अनेकांच्या आवडीचा विषय झाला आहे.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
यामुळेच तर आजही सर्व भाषांमध्ये भुतांवरील चित्रपट, मालिका व पुस्तके प्रकाशित होत आहेत व चालतही आहेत. लोककथांमधून भुतांच्या विवीध प्रकारांबद्द्ल आपण ऐकत असतो असेच काही प्रकार आपण या लेखात जाणुन घेऊ.
- भूत किंवा पिशाच्च:- साधारण स्थितीताल लोक जसे असतात, त्याप्रमाणे या वर्गातील सर्व साधारण समाजाला भूत किंवा पिशाच हे नांव आहे. ती शक्तीनें, अधिकाराने व कर्तबगारीने कमी असतात. ती स्वतंत्र नसतात. त्यांचे पाय उफराटे असतात. ती काही तरी शुष्क पदार्थाची इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी माणसांना पछाडतात, आजारी करतात, व यांना तिखट, शिळी भाकरी, अंडी, इत्यादि पदार्थ दिले म्हणजे सोडून जातात.
- समंधः- हे भुतांतील अधिक शक्तिमान वर्गातील असतात. त्यांची स्वरूपें दांडगी, भयंकर व काळी असतात. ते बहुशः दांडग्या झाडावर, मोठया वाड्यांतील ओसाड भागांत वगैरे असतात, व त्यांची इच्छा फार मोठी असते. ते पुरलेल्या पैशावर अथवा धनावर सुद्धा राहतात.
- ब्रह्मसमंधः- हे रात्री दिवसा केव्हां वाटेल तेव्हां अगदी मनुष्यासारखे रूप धरून मोठ्या विस्तीर्ण वाड्यांतील एखाद्या बाजूच्या भागांत, किंवा पुष्कळ दिवस ओस पडलेल्या वाड्यात, किंवा जुनाट पिंपळाचे पारावर, अथवा विस्तीर्ण वडावर बसून स्नानसंध्या करतात, व ह्मणणे झणतात. ते फारसे कोणाच्या वाटेस जात नाहीत.
- मुंजाः- हा ब्रह्मचारी मुलाच्या स्वरूपाचा लंगोटी धालणारा व सदा पिंपळावर राहणारा भूतवर्गातील आहे.
- पितरः- ही भुताची लहान व ठेंगणी जात असून ते सदोदित जमावाने फिरत असतात. ते बहुतांशः आपल्यांतील कोणाच्या तरी हितासाठी थोडासा त्रास देतात, तरी कल्याणही करितात.
- ईर किंवा वीरः- हीं भुते फार शूर असतात. ती शिपायाच्या वेषानें ढाल तलवार इत्यादी घेऊन फिरतात.
- धीरः- ही फार शक्तीची भुतें असून या भूतवर्गातील सत्ताधारी अधिकार्यांचे ते सेवक असतात.
- बेताळः- हा विरांचा अधिकारी व भुतांवरील सेनापती आहे असे मानतात. याला सर्वांनी रोज हजेरी द्यावी लागते.
- हडळः- हा भुतांमधील खतरनाक प्रकार आहे. ही फार दुष्ट असते. ही माणसांना चांगली चांगली रूपे दाखवून फसविते, व मुलांना पछाडते.
- येड मकडताई:- हा भूतांतील पुष्कळ मुले असणारा प्रकार आहे. ही बहुशः खेड्यापाड्यांत व लोकांच्या परड्यांत आपली मुलेबाळे घेऊन असते, आणि आपल्या चिल्यापिल्यांस भाकरी तुकडा मिळावा म्हणून त्या घरच्या किंवा शेजार्या पाजार्यांच्या मुलांस पछाडून आजारी करून आपल्या मुलाबाळांच्या इच्छा तृप्त करून घेते.
- डाकिणीः- या भयंकर निर्दय असतात.
- शाकिणीः- याही भूतांतीलच जरा श्रेष्ठ वर्गातील आहेत.
- जखीण किंवा जाखीणः- ही बहुशः वृद्ध स्त्रीच्या रूपाने फिरते. हिचे केस शुभ्र रुपेरी व विसकटलेले असतात. हिची गांठ पडली, तर ही भल्या माणसास कल्याणकारक साधन देते.
- आसराः- ही पाण्यात राहणारी, पाण्यातून खाली पाताळांत जाणारी भूत वर्गातील स्त्रीजात आहे. या नेहमी सुस्वरूप स्त्रियांच्या रूपाने असतात.
या १४ वर्गाखरीज आणखीही काही वर्गाची पिशाच्चे आहेत. ही सर्व रात्रीची फिरतात. ही निर्मनुष्यस्थळी भर दोन प्रहरी, तिन्हीसांजा, मध्यरात्री, अंधारांत, नाना त-हेच्या रूपाने दिसतात. ही पशुपक्ष्यांचीही रूपें धरतात. एकट्या दुकट्या माणसास पकडतात, भय दाखवितात, नाना तर्हेच्या चेष्टांनी भेडसावतात, ओरडतात, जाळ, दिवट्या दाखवितात, व अमावास्या पौर्णिमांना ती फार फिरतात. माणसांना पछाडून त्यांच्या शरीरांत शिरतात, रात्री उरावर येऊन बसतात, आणि अंगांत येऊन छळतात. त्यांची सांवली पडत नाही. ती वायुरूप असतात. सर्व भुते किंवा पिशाचे मेलेल्या माणसांचीच झालेली असतात.