जगदीशचंद्र बसू - सजीव निर्जीवांमधील अद्वैत शोधणारा भारतीय शास्त्रज्ञ
पॅरिस मध्ये भौतिकशास्त्र तज्ज्ञांची एक परिषद भरलेली होती त्यात एक भारतीय शास्त्रज्ञ व्याख्यान देण्यासाठी उभा होता. समोर एक प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञ (फिजिअाॅलाॅजीस्ट) बसलेले होते. ते या भारतीय शास्त्रज्ञाचे व्याख्यान ऐकून अस्वस्थ होत होते. त्यांच्या अस्वस्थतेचे कारण तसेच होते. त्या भारतीय शास्त्रज्ञाची मतं जर मान्य केली तर त्यांना स्वतःला त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाला केराची टोपली दाखवावी लागणार होती! पण त्यांना त्या व्याख्यानात आपल्या चुका कदाचित उमगल्या असाव्यात. व्याख्यान संपले आणि ते भारतीय शास्त्रज्ञाला म्हणाले की," सुरवातीला मला तुमचे सर्वच मतं चुकीचे वाटत होते. पण भाषण पूर्ण ऐकल्यावर माझं मत बदललं".
पॅरिस मध्ये भौतिकशास्त्र तज्ज्ञांची एक परिषद भरलेली होती त्यात एक भारतीय शास्त्रज्ञ व्याख्यान देण्यासाठी उभा होता. समोर एक प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञ (फिजिअाॅलाॅजीस्ट) बसलेले होते. ते या भारतीय शास्त्रज्ञाचे व्याख्यान ऐकून अस्वस्थ होत होते. त्यांच्या अस्वस्थतेचे कारण तसेच होते. त्या भारतीय शास्त्रज्ञाची मतं जर मान्य केली तर त्यांना स्वतःला त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाला केराची टोपली दाखवावी लागणार होती! पण त्यांना त्या व्याख्यानात आपल्या चुका कदाचित उमगल्या असाव्यात. व्याख्यान संपले आणि ते भारतीय शास्त्रज्ञाला म्हणाले की," सुरवातीला मला तुमचे सर्वच मतं चुकीचे वाटत होते. पण भाषण पूर्ण ऐकल्यावर माझं मत बदललं". तर ते भारतीय शास्त्रज्ञ होते जगदीशचंद्र बसू व ते दिग्गज शरिरशास्त्रज्ञ होते डाॅ.वाॅलर.
जगदीशचंद्र बसूंचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी मैमनसिंग जवळ राणिखल (आताच्या ढाक्याजवळ) झाला. वडील भगवानचंद्र हे ब्रिटिशांच्या सेवेत डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. वडील गेल्यानंतर जगदीशचंद्र बसूंचे आर्थिकदृष्ट्या खूप हाल झाले. वडिलांनी घेतलेले सर्व कर्ज एक एक करत बसूंनी फेडले. १८७५ मध्ये मॅट्रिक पास होऊन त्यांनी कलकत्त्याच्या(अत्ताचे कोलकाता) सेंट झेवियर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. १८८५ साली कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी महाविद्यालयात त्यांची भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. इतर प्राध्यापकांपेक्षा(ब्रिटिश) त्यांना कमी वेतन दिले गेले होते. म्हणून त्यांनी ते वेतन न घेताच अध्यापन करत राहण्याचा निर्णय घेतला. या सत्याग्रहाला तीन वर्षानंतर यश आले. तीन वर्षाच्या वेतनाच्या फरकातून आलेल्या पैशातून शेवटी त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेले पितृकर्ज फेडले होते.
ब्रिटिश प्राध्यापकांनी पहिल्यापासूनच जगदीशचंद्रांवर एक डुख धरलेला होता. बसूंना सुरुवातीला प्रकाशचित्रणकला (फोटोग्राफी)व विद्युत चुंबकीय लहरी(इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज्) या क्षेत्रात संशोधन करण्यात रस होता. ब्रिटिश प्राध्यापकांना वाटत की हे संशोधन करणे वगैरे ते तुमचे (भारतीयांचे) काम नाही. मॅक्सवेलने गणिती पद्धतीने विद्युत चुंबकीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केले होते. प्रा.लाॅज यांनी काम केलेल्या विद्युत चुंबकीय लहरींची तरंगलांबी(वेव्हलेंग्थ) ही सेंटीमीटर मध्ये होती तर हर्ट्झ यांनी काम केलेल्या विद्युत् चुंबकीय लहरींची तरंगलांबी ही डेसीमीटर या एककात होती. म्हणजे तशा अर्थाने ही सर्व एकके मोठीच होती. बसूंनी मात्र त्याही पेक्षा कमी म्हणजे मिलिमीटर या एककातील तरंगलांबी वर काम केले होते. आज आपण बिनतारी संदेश यंत्रणेचा जनक म्हणून मार्कोनी चे नाव घेतो पण, त्याआधीही बिनतारी संदेशाचे जनकत्व जगदीशचंद्र बसुंकडे जाते. बसूंचे केंब्रिज मधील गुरु लॉर्ड रेले यांनी विद्युत चुंबकीय लहरी बाबतचे हे संशोधन लगेच रॉयल सोसायटी तर्फे प्रकाशित केले.
त्यानंतर बंसूंनी थोड्याच कालावधीत 'ऑन दी जनरल मॉलिक्युलर फेनाॅमिना प्रोड्यूस्ड बाय इलेक्ट्रिसिटी इन लिविंग अँड नाॅनलिविंग मॅटर' या नावाच्या निबंधात त्यांनी प्रतिपादन केली होती की विद्युत प्रारणांमुळे आयन ऑक्साईडचा (Fe2O3) प्रतिसाद कसा बदलतो हे प्रयोगाने दाखवून दिले. त्याचा आलेख व स्नायुंनी उत्तेजनेला दिलेली प्रतिसादाची आलेख खुप साधर्म्य दाखवतो. बसूंनी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधले ते म्हणजे जिवंत पेशी विष, रसायने,औषधांची कमी-अधिक मात्रा यांना जसा प्रतिसाद देतात तशाच प्रकारचा प्रतिसाद वनस्पतीही व धातूही देतात. म्हणजे भौतिक आणि जैविक घटना या एकाच प्रकारच्या आहेत हा निष्कर्ष यातून निघतो. ही गोष्ट पॅरिसमध्ये पदार्थवैज्ञानिकांच्या ज्या आंतरराष्ट्रीय परिषदेत घडली त्या परिषदेत भारतातून विवेकानंद ही उपस्थित होते. विवेकानंदांना हे सजीव निर्जीवातले हे अद्वैत निश्चित भावले असणार यात काही शंकाच नाही. विवेकानंदांना बसूं बाबत त्यांची शिष्या भगिनी निवेदिता कडून कळाले होते.भगिनी निवेदिता ना बसूंच्या संशोधनात रस असण्याचं एक कारण त्या स्वतः पदार्थ विज्ञानात पदवीधर होत्या हे असू शकते.
बसूंनी आपले हे संशोधन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलं होतं. त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं. उपकरणांची उपलब्धता नव्हती. असणार तरी कशी? त्यांनी संशोधनासाठी क्षेत्र नवीन निवडले होते. त्यांना गरजेची उपकरणे स्वतःची स्वतः तयार करावी लागत. सव्वाशे वर्षांपूर्वी विज्ञानातील वेगवेगळ्या शाखांमध्ये अलिखित विभाजन होते जणू. भौतिकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी जीवशास्त्रात काय चाललय हे पहायचे नाही की जीवशास्त्राच्या लोकांनी रसायनशास्त्रात! या वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये जे दुभाजक होते ते तोडण्याचा सफल प्रयत्न जगदीशचंद्रांनी केला होता.
एक प्रसिद्ध शरीररचना शास्त्रज्ञ डॉ.वाॅलर व जगदीशचंद्रांची भेट एका परिषदेच्या व्याख्याना निमित्त झाली. वाॅलर यांचे मत प्रारंभी बसूंच्या च्या विरोधात होते. परिषदेतील बसूंचे व्याख्यान ऐकल्यावर मात्र वाॅलर यांचे मत बदलले. बसूंच्या संशोधनामुळे वाॅलर यांचे संशोधन पूर्णपणे उलटे पालटे झालं होतं. सजीव व निर्जीव यांच्यामध्ये येतात त्या वनस्पती या औषधे, विद्युत, विष, पाणी, स्पर्श यांना प्रतिसाद (रिस्पॉन्स)कसा देतात हा प्रश्न बसूंना पडायला लागला. त्यादृष्टीने बसूंनी संशोधनाची हालचाल करायला सुरुवात केली. त्यांनी भाज्या,फळभाज्या यावर वरील गोष्टींचे प्रयोग केले. काही रसायनांमुळे त्या भाज्या उत्तेजित झाल्या तर विषामुळे त्या बधीर झाल्या. इंग्लंडमध्ये असताना एका प्रसिद्ध शरीररचना शास्त्रज्ञ मायकेल फाॅस्टर बसूंच्या प्रयोग शाळेत आले. बसूनी त्यांच्या हातात एक आलेख असलेला कागद दिला व म्हणाले की, "हा कसला आलेख आहे सांगाल का ?" फाॅस्टर म्हणाले, "कित्ती सोपं आहे,पन्नास वर्षे हेच पाहतोय मी, स्नायूंच्या प्रतिसादाचा आलेख आहे हा!" बसू मिश्किल हसत व त्यांच्याकडे पाहत म्हणाले की,"हा कथिलाने दिलेला प्रतिसाद आहे!" हे ऐकून फाॅस्टर खुर्चीतून उडालेच होते.
'द रिस्पॉन्स ऑफ इनऑर्ग्यानिक मॅटर टू मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल्स स्टिमुलस' या व्याख्यानात त्यांनी रसायन,भौतिक व जैविक विद्याशाखांमधील अंतर कमी करण्याचे काम त्यांनी केले.अगोदर प्रचलित असलेल्या सजीव निर्जीव यांच्या व्याख्या त्यांनी अक्षरशः मोडीत काढल्या. विषामुळे धातूवर होणारे गंभीर परिणाम आणि विषावर उतारा दिल्यामुळे विष कसं उतरतं हे ही दाखवलं. या व्याख्यानाच्या अखेरीस त्यांनी स्वतः तयार केलेलं एक उपकरण दाखवलं त्याला ते 'कृत्रिम डोळा' असे म्हणतात मानवी डोळ्यांना न दिसणारी काही अदृष्य किरण या उपकरणाच्या सहाय्याने दिसू शकतात. त्यांनी हे असं सांगितल्यावर तर सर्व सभागृहात आश्चर्याने थक्क झाले होते. पूर्वीचा सजीव-निर्जीव याच्या व्याख्या होती 'जे प्रतिसाद देतात ते सजीव व जे प्रतिसाद देत नाही ते निर्जीव'. या प्रचलित व्याख्या, त्यांनी एक कथिलाची तार घेतली व तिला पिळ.पिळ देणे ही सुद्धा एक उत्तेजनाच आहे. त्या उत्तेजनेमुळेच धातूच्या विद्युत प्रतिसाद बदललेला त्यांनी सर्वांना दाखवला. या प्रयोगानंतर ते म्हणाले,"एका असेंद्रिय पदार्थाने दिलेल्या प्रतिसादाचं व सजीवांनी दिलेल्या प्रतिसादाचं किती विलक्षण साम्य आहे पहा!" त्यानंतर बसूंनी दोन आलेख सर्वांना दाखवले ज्यात एक होता कथिलाला आलेला थकव्याचा व एक आलेख होता मानवी स्नायूंना आलेला थकव्याचा. दोन्ही आलेखात विलक्षण साम्य होते.
वर उल्लेखलेला कृत्रिम डोळ्यावर त्यांनी विद्युत चुंबकीय लहरींना प्रक्षेपित केले व त्याच्या प्रतिसादाचा आलेख दाखवला. त्याच विद्युत चुंबकीय लहरींना परत त्यांनी बेडकाच्या डोळ्यावर प्रक्षेपित केल्यावर दिलेला प्रतिसाद यामध्ये बरेच साम्य आढळले (शेजारील आकृती पहावी).सजीव पेशी विषारी रसायनांमुळे जशा मृतपाय होतात व त्यांचा विद्युत प्रतिसाद शून्यवत होतो. तसचं सोडियम कार्बोनेट किंवा कॉस्टिक पोटॅश मुळे कथिलाचेही तसंच होतं हे बसुंनी दाखवून दिले. म्हणजे समोर बसलेला प्रत्येक जण आपल्या डोळ्यांची एका 'निर्जीव' पदार्थाचा 'मृत्यू' अनुभवत होते. यानंतर बसूंनी एक मोठा धक्का दिला जर वेळेवर उतारा दिला तर सजीव पेशी जशी पूर्ववत होते अगदी तसंच त्यांनी धातूच्या बाबतही करून दाखवले. व्याख्यानातून समारोप करताना बसू म्हणतात की, "अशा वेळी अशी एखादी विभाजक रेषा कुठून काढणार की जिच्या अलीकडे भौतिक प्रक्रिया आहेत आणि पलीकडे जैविक? खरंतर अशा काही विभाजन रेषा अस्तित्वातच नाहीये".
मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की जगदीशचंद्र बसूंच्या प्रयोगांना कुणीच आव्हान दिले नाही का? तर तसं अजिबात नाही. वर डाॅ.वाॅलर यांचा उल्लेख आलेलाच आहे. सर जाॅन बर्डन सँडरसन हे शरीरशास्त्रातलं त्यावेळेसचं एक 'दादा' नाव होतं. बसूंच्या वनस्पतींच्या विद्युत् प्रतिसादाबद्दलच्या मांडणीला त्यांनी तीव्र आक्षेप घेत म्हणाले की,"माझी उभी हयात वनस्पतींचा प्रतिसाद मिळवण्यात गेली आहे. फक्त लाजाळूच तेवढा प्रतिसाद देते; त्यामुळे तुम्ही जे सांगत आहात ते सर्व अशक्य आहे. हा असा जोरदार हल्ला जेव्हा एका दादा शास्त्रज्ञाने केल्यावर कुणीही गर्भगळीत झाले असते.पण बसू मात्र त्याच्या 'दादापणाला' घाबरले नाही. न घाबरता उत्तर देण्यासाठी उभे राहत ते म्हणाले की, "तुमचा आक्षेप हा माझ्या प्रयोग सिद्ध गोष्टींवर नाहीये. प्रयोग सिद्ध गोष्टींवरआक्षेप हा प्रयोग सिद्ध पुराव्याने घ्यायचा असतो.जर तो 'अधिकाराच्या' आधारे घेतला जाणार असेल तर मी त्यापुढे नमणार नाही" बापरे! सँडरसन यांना असे उघड आव्हान? परंतु सँडरसन यांनी ना कोणता पुरावा दिला ना ते बसूंचे म्हणणे खोडून काढू शकले. उलट सँडरसन यांनी रॉयल सोसायटी मध्ये आपले वजन खर्च करून जगदीश बाबूंची निबंध छापून कसे येणार नाहीत यासाठी प्रयत्न केले. पुढे यथावकाश सँडरसन यांच्या दुराभिमानाचे ढग निवळले बसूंचे संशोधन, प्रयोग रॉयल सोसायटीने मान्य केले.
जगाला e = mc2 या आईन्ष्टाईनच्या समीकरणाने द्वैताकडून अद्वैताकडे नेणारा पहिला दणका दिला हे जरी खरं असलं तरी आईन्ष्टाईनच्याही आधी सजीव व निर्जीव यांच्यातले प्रयोग सिद्ध अद्वैत मांडणारे होते फक्त जगदीशचंद्र बसूच!
- अजिंक्य कुलकर्णी (लेखक रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत)