कलियुग - चार युगांतील अखेरचे युग

कलियुगाची सुरुवात नक्की कुठल्या वर्षी झाली याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. अनेक जण कलियुगाचा प्रारंभ इसवी सन पूर्व ३१०२ मानतात.

कलियुग - चार युगांतील अखेरचे युग
कलियुग

भारतीय कालमापन पद्धतीतील एक विशाल काळ म्हणजे युग व अशी एकूण चार युगे अस्तित्वात असून त्यांची नावे अनुक्रमे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग अशी आहेत. 

सध्याचा काळ हा कलियुग म्हणून ओळखला जातो व सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग ही युगे कलियुगापूर्वी होऊन गेली आहेत. या लेखात आपण ज्या युगात सध्या आहोत त्या कलियुगाविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

कलियुगाची सुरुवात ज्यावेळी महाभारताचे युद्ध अंतिम टप्प्यात असताना झाली म्हणून कलियुगास भारत युद्ध सवंत असेही नाव आहे. महाभारत युद्धात पांडवांना विजय प्राप्त झाला आणि युधिष्ठिराचा विजय झाला त्यामुळे या युगास युधिष्ठिर संवत अशीही ओळख आहे.

कलियुगाची सुरुवात नक्की कुठल्या वर्षी झाली याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. अनेक जण कलियुगाचा प्रारंभ इसवी सन पूर्व ३१०२ मानतात. कलियुगाचा काळ हा चैत्रादी आणि मेषादि अशा दोन प्रकारातील मानला जातो.

महाभारताच्या युद्धानंतर अदमासे एक्कावन्न वर्षांनी श्रीकृष्णाचे निर्वाण झाले आणि कलियुगाची सुरुवात झाली असे पुराणांत नमूद आहे. महाभारताचे युद्ध नक्की केव्हा झाले याविषयी एक महत्वाचा संदर्भ मानला जाणाऱ्या ऐहोले शिलालेखात असा उल्लेख आहे की ३७३५ इतका कली काल मागे पडला असता आणि शालिवाहन शकाची ५५६ वर्षे होऊन गेली असता हा शिलालेख निर्माण करण्यात आला यावरून शालिवाहन शकापूर्वी ३१७९ वर्षांपूर्वी महाभारताचे युद्ध झाले असल्याचा निष्कर्ष निघतो अर्थात याच काळापासून कलियुग सुरु झाले असाही निष्कर्ष निघतो.

राजस्थानातील जैसलमेर येथील एका शिलालेखात सुद्धा महाभारत युद्धाचा काळ ऐहोले येथील शिलालेखाएवढाच दिला गेला असल्याने या निष्कर्षास पुष्टी मिळते.

भागवत पुराणात लिहिले गेले आहे की सप्तर्षी ज्यावेळी मघा नक्षत्रात प्रवेश करते झाले त्यावेळी कलियुगास प्रारंभ झाला. कलियुगाची एकूण ४,३२,००० वर्षे मानली गेली असून त्यातील संध्या आणि संध्यांश काळ १२०० वर्षांचा आहे.

इतर युगांप्रमाणे कलियुगाचा जो स्वभाव सांगितला गेला आहे त्यानुसार कलियुगात धर्माचा फक्त एकच पाय शिल्लक राहतो आणि अधर्म चतुष्पाद अर्थात बलवान होतो. तमोगुण हा कलियुगाचा मुख्य गुण असून दान हे मुख्य कर्म आहे. या युगात मनुष्याचे आयुष्यमान कमी होते आणि लोभ आणि मोहात वाढ होते.

कलियुगाच्या अंती कल्की अवताराची योजना असून या अवतारानंतर कलियुग संपून कृतयुगास प्रारंभ होईल असा धर्मशास्त्रात उल्लेख आहे.