सोने - सर्वात मौल्यवान धातू

प्राचीन काळापासून भारतात व जगभरात सोन्याचा वापर हा दागदागिने आणि शोभनीय वस्तूंसाठी केला जातो.

सोने - सर्वात मौल्यवान धातू
सोने

पृथ्वीवर आढळणाऱ्या अनेक धातूंमध्ये सोने हे सर्वात मौल्यवान आहे. धातूचे मूल्य हे त्याचे तेज आणि दुर्मिळता यांच्या आधारावर ठरत असते व सोने हे इतर धातूंच्या तुलनेत तेजस्वी आणि दुर्मिळ असल्याने साहजिकच त्याचे मूल्य अधिक आहे. प्राचीन काळापासून भारतात व जगभरात सोन्याचा वापर हा दागदागिने आणि शोभनीय वस्तूंसाठी केला जातो याशिवाय त्यास कधीही मूल्य मिळत असल्याने त्याची साठवणूकही मोठ्या प्रमाणात केली जाते.

प्राचीनकाळी वेद आणि इतर पुराण ग्रंथांत सुद्धा सोन्याचा उल्लेख आढळतो. सोने हे बहुतांशी जगभरात अनेक ठिकाणी आढळते मात्र त्याचे साठे कमी प्रमाणात असतात. सोने हे प्रामुख्याने खाणकाम करून किंवा नद्यांच्या वाळूमधून काढले जाते. सोने ज्या पाषाणात आढळते त्यास गारेचा दगड म्हणतात. या दगडात सोन्याच्या शिरा आढळल्या की तो दगड फोडून त्याची वाळू केली जाते आणि ती वाळू पाण्याने धुतली जाते. हे केल्याने सोन्याचे कण आणि रेती जडत्वामुळे तळाशी येते आणि नंतर त्या तळातील रेतीत पारा मिसळून ते मिश्रण ढवळले जाते.

पारा रेतीत मिसळल्यामुळे रेतीत असलेले सोने हे पाऱ्याशी संयोग पावते आणि मग सोन्याचा संयोग असलेला पारा पुन्हा वेगळा करून त्यास तापवले की त्या पाऱ्याची वाफ होऊन फक्त सोने शिल्लक राहते.

नद्यांच्या पात्रातून जेव्हा सोने काढले जाते त्यावेळी एका भांड्यात ती रेती आणि पाणी घालून जोराने ढवळतात. सोन्याचे कण जड असल्याने ते वारंवार रेती पाण्याने ढवळली गेल्याने खाली बसतात. असे अनेकदा केल्याने रेती पूर्णपणे नाहीशी होऊन निव्वळ सोने भांड्यात शिल्लक राहते. 

सोन्याचा रंग हा पिवळा असतो व हा धातू अतिशय चमकदार असतो. सोने हा धातू शिशासारखाच मऊ असतो. सोन्याचा वर्ख एवढा पातळ होऊ शकतो की असे दोन लाख वर्ख एकत्र केले तर फक्त एक इंच जाडीचे सोने मिळेल. सोन्याची तार सुद्धा अतिशय पातळ केली जाऊ शकते. अर्धा गुंज सोन्यापासून ३६४ फूट लांब तार तयार होते.

अस्सल सोन्यावर हवेचा आणि पाण्याचा परिणाम होत नाही. साधारण ऍसिड सुद्धा सोन्याचे नुकसान करू शकत नाही मात्र ते वितळवायचे असल्यास नायट्रिक आणि हायड्रॉलिक या दोन ऍसिडचे मिश्रण एकत्र करावे लागते. 

निव्वळ सोने लवकर झिजण्याची शक्यता असल्याने त्यामध्ये थोड्या प्रमाणात रूपे अथवा तांबे मिसळल्यास त्यापासून बनवलेली वस्तू अधिक टिकते.

भारतात प्रामुख्याने दक्षिणेत सोन्याच्या खाणी विपुल आहेत मात्र त्यांची सोने काढण्याची क्षमता मर्यादित आहे. जगभरात ज्या ठिकाणी सर्वाधिक सोने आढळते ते देश म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया. या दोन देशांत प्रामुख्याने नद्यांमधून सोने काढले जाते कारण या ठिकाणी प्राचीन काळापासून वाहणाऱ्या नद्या असल्याने त्या नद्यांच्या प्रवाहातून सुवर्ण मिश्रित माती वाहत येऊन सोन्याच्या मातीने युक्त असा मोठा प्रदेश निर्माण झाला आहे.