चांदी - एक चमकदार आणि मूल्यवान धातू

चांदी चमकदार पांढऱ्या रंगाची असून ती मूळ रूपात अशुद्ध असते कारण चांदी गंधकाकडे आकर्षित होत असल्याने जमिनीतील गंधकाशी चांदी संयोग पावते.

चांदी - एक चमकदार आणि मूल्यवान धातू
चांदी

पृथ्वीवर आढळणाऱ्या धातूंमध्ये सोन्याच्या खालोखाल ज्याचे मूल्य आहे असा धातू म्हणजे चांदी. चांदीस रौप्य अथवा रूपे या नावाने सुद्धा ओळखले जाते. इंग्रजीत चंदीस Silver असे नाव आहे.


सोन्याप्रमाणेच या धातूचा वापर दागिने आणि शोभनीय वस्तूंसाठी अधिक प्रमाणात केला जातो. देशाच्या अर्थव्यवस्थेत सोन्यासहित चांदीस सुद्धा मोठे महत्व आहे. कुठल्याही गोष्टीस पंचवीस वर्षे पूर्ण झाली की त्यास रौप्य महोत्सव म्हटले जाते आणि क्रीडा क्षेत्रात रौप्य पदकाचा सुद्धा समावेश असतो.

चांदी हा धातू अमेरिका खंडातील युनाइटेड स्टेट्स, मेक्सिको, पेरू आदी देशांत मोठ्या प्रमाणात आढळतो. भारतात प्रामुख्याने कर्नाटक आणि राजस्थानच्या काही भागात चांदीचे पाषाण आढळतात.

चांदी चमकदार पांढऱ्या रंगाची असून ती मूळ रूपात अशुद्ध असते कारण चांदी गंधकाकडे आकर्षित होत असल्याने जमिनीतील गंधकाशी चांदी संयोग पावते. गंधकाशिवाय चांदी क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन आदी पदार्थांसोबत सुद्धा संयोग पावते.

पूर्वी शुद्ध चांदी मिळवण्यासाठी गंधकासोबत संयोग झालेली चांदी पाण्यात घालून कुटला जात असे आणि त्यात मीठ मिसळून ते मिश्रण दोन दिवस तसेच ठेवले जात असे आणि नंतर त्यात पारा घालून ते मिश्रण पूर्णपणे मिसळले जात असे आणि नंतर ते मिश्रण पाण्याने धुतले जात असे म्हणजे त्यातील हलक्या प्रतीची माती वेगळी होऊन पारा आणि चांदी शिल्लक राहत असे. यानंतर उरलेल्या चांदी आणि पाराच्या मिश्रणास उष्णता दिली की पाऱ्याची वाफ होऊन शुद्ध चांदी मिळत असे. 

शिसे धातू सोबत संयोग पावलेली चांदी वेगळी करण्यासाठी चांदी मिश्रित शिसे एका भांड्यात घेऊन त्याचा रस केला जात असे आणि तो रस थंड झाल्यावर त्याचे स्फटिक तयार होत आणि हे स्फटिक फक्त शिसे या धातूचे बनत. हे स्फटिक काढून घेतले की उरलेला रस फक्त चांदीचा असे.

पूर्वी चांदीचा वापर नाणी तयार करण्यासाठी सुद्धा होत असे. प्राचीन काळापासून भारत स्वतंत्र होईपर्यंत अनेक नाणी ही चांदी या धातूपासूनच तयार केली जात असत. चांदीचा वापर मुलामा देण्यासाठी किंवा भांडी तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. छायाचित्रण कला जेव्हा अस्तित्वात आली त्यावेळी चांदीचा वापर छायाचित्रे काढण्यासाठी सुद्धा केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.

शुद्ध सोन्याच्या वस्तू झिजण्याची भीती असते त्यामुळे सोन्यात अल्प प्रमाणात चांदी मिसळली असता सोने झिजत नाही. सोन्याचे मूल्य हे ग्राम मध्ये असते तर चांदीचे किलोमध्ये असते. आजच्या युगातही कुणाचा लाभ झाला तर त्याची चांदी झाली असे म्हणायची प्रथा आहे त्यावरून चांदीचे महत्व आपल्याकडे किती आहे याची कल्पना येऊ शकेल.