भरती व ओहोटी म्हणजे काय?

गुरुत्वाकर्षणाच्या याच नियमाच्या आधारे न्यूटनने हे सुद्धा सिद्ध केले की पृथ्वीवरील समुद्रास भरती व ओहोटी येण्याचे कारण म्हणजे सूर्य व चंद्र यांचे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण हे आहे.

भरती व ओहोटी म्हणजे काय?
भरती व ओहोटी

भूगोलाचा अभ्यास करताना ज्या समुद्राने आपली पृथ्वी ७१ टक्के म्हणजे दोन तृतीयांश व्यापली आहे त्या समुद्राचा अभ्यास करणेही क्रमप्राप्त असते. समुद्र शास्त्राचा अभ्यास करताना सर्वात मुख्य प्रक्रिया असते ती म्हणजे समुद्रास येणारी भरती व ओहोटी. एका नियमित वेळी समुद्राचे पाणी चढणे म्हणजे भरती व एका नियमित वेळी समुद्राचे पाणी उतरणे म्हणजे ओहोटी असा ढोबळ समज आहे मात्र भरती व ओहोटीची ही प्रक्रिया नक्की काय असते व ती कशी होते याविषयी जाणून घेऊ.

मानवाच्या निर्मितीपासून तो समुद्रातील भरती व ओहोटीची प्रक्रिया पाहत आला आहे.ज्या काळी समुद्रमार्गे प्रवास सुरु झाला त्यावेळी आपली जहाजे व होड्या कोणत्या वेळी किनाऱ्याहून समुद्रात न्यावी व कोणत्यावेळी समुद्रातून किनाऱ्याकडे आणावी यासाठी भरती व ओहोटीवरच अवलंबून असावे लागत असे.  अर्थातच या प्रक्रियेबद्दल मानवाच्या मनात प्रचंड कुतूहल असावे व त्या अनुषंगाने त्यांनी ही प्रक्रिया काय असते हे समजण्याचा ही प्रयत्न केला असावा. हळहळू चंद्राचा आणि भरती व ओहोटी प्रक्रियेचा काहीतरी संबंध असावा या निष्कर्षापर्यंत सर्व पोहोचले कारण चंद्र जस जसा उशिरा माथ्यावर येतो तसतशी भरती व ओहोटीची वेळही बदलत असते हे मानवाच्या लक्षात आले होते.

सतराव्या शतकात शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन याने भरती व ओहोटीचा चंद्राशी असलेला संबंध नक्की कसा हे शोधून काढले व या मागील कुतूहल संपले. समुद्राचे पाणी २४ तास आणि ५४ मिनिटे या वेळात दोन वेळा वर चढते आणि दोन वेळा खाली उतरते. पाणी वर चढण्याची प्रक्रिया सुमारे सहा तास सुरु असते आणि पाणी पूर्णपणे वर चढले की १२ मिनिटे ते स्थिर राहते. स्थिर राहण्याच्या या स्थितीस 'समा' असे म्हणतात. यानंतर सहा तासापर्यंत हे पाणी उतरण्याची प्रक्रिया सुरु असते. पाणी पूर्ण उतरले की ते सुद्धा १२ मिनिटे स्थिर राहते व या स्थितीस 'निखार' असे म्हणतात.

यानंतर पाणी पुन्हा वर चढू लागते. समुद्राचे पाणी चढण्या उतरण्याची ही प्रक्रिया निरंतर सुरु असते. भारतीय महिना हा चंद्राच्या कलेनुसार असतो व त्यास चंद्रमास असे म्हणतात व प्रत्येक चंद्रमासात समुद्रास दोन वेळा मोठी व दोन वेळा लहान भरती येते. मोठ्या भरतीस उधाण म्हणतात व लहान भरतीस भांग असे म्हणतात. ही उधाणाची भरती पौर्णिमा व अमावास्येच्या सुमारास येते आणि शुक्लष्टमी व कृष्णाष्टमीच्या सुमारास भांगाची भरती येते. 

आता ही भरती व ओहोटी नेमकी येते कशी यावर विचार करू. पृथ्वीमध्ये एक आकर्षण शक्ती आहे ज्यामुळे निराधार झालेले पदार्थ तिच्याकडे आकर्षिले जातात हा सिद्धांत न्यूटन पूर्वीच भूगोल शास्त्रज्ञांनी मांडला होता मात्र न्यूटनने हे सिद्ध केले की फक्त पृथ्वीतच आकर्षण शक्ती नसून सूर्य, चंद्र, सूर्यमालेतील इतर ग्रह व त्यांचे उपग्रह यांच्यातही असली पाहिजे व या आकर्षण शक्तीस न्यूटनने गुरुत्वाकर्षण शक्ती असे नाव दिले.

गुरुत्वाकर्षणाच्या याच नियमाच्या आधारे न्यूटनने हे सुद्धा सिद्ध केले की पृथ्वीवरील समुद्रास भरती व ओहोटी येण्याचे कारण म्हणजे सूर्य व चंद्र यांचे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण हे आहे.चंद्र व सूर्याच्या आकर्षण शक्तीमुळे भरती व ओहोटी कशी होते हे जाणून घेऊ. पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळे तिचा प्रत्येक भाग चोवीस तास आणि चोपन्न मिनिटांनी चंद्रासमोर येतो आणि त्या भागावर चंद्राचे पूर्ण आकर्षण पडते मात्र पृथ्वीवरील जमीन घन असल्याने तिच्या पृष्ठ भागावर चंद्राचे आकर्षण तेवढे लागू न होता समुद्रातील पाण्याच्या अणूंमध्ये स्नेहकर्षण कमी असल्याने ते पाणी चंद्राकडे ओढले जाते. पृथ्वीवरील जमीन घन असल्याने तिच्या पृष्ठभागावर पडणारे चंद्राचे आकर्षण गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या भूमध्यस्थानी पडणाऱ्या चंद्राच्या आकर्षणाइतकेच असते. 

अशाप्रकारे पृथ्वीवर समोरासमोरील दोन्ही ठिकाणी एकाच वेळी भरती येते. हळूहळू भरती आलेले ठिकाण चंद्रापासून दूर जाऊ लागले म्हणजे ओहोटी सुरु होते. याच प्रकारे पृथ्वीच्या दोन बाजूना जेव्हा समा असतो त्याचवेळी दोन बाजूना निखार तयार होतो. 

चंद्राच्या आकर्षणामुळे जशी भरती व ओहोटी येते त्याचप्रमाणे सूर्याच्या आकर्षणाने सुद्धा भरती व ओहोटी येत असते मात्र चंद्राच्या आकर्षणामुळे येणारी भरती व ओहोटी सूर्याच्या आकर्षणामुळे येणाऱ्या भरती व ओहोटीहून मोठी असते व याचे कारण म्हणजे चंद्र हा लहान असला तरी पृथ्वीपासून खूप जवळ आहे व सूर्य हा मोठा असला तरी पृथ्वीपासून दूर असल्याने त्याच्या आकर्षणाचा परिणाम पृथ्वीवर चंद्राहून कमी पडतो.

पौर्णिमा व अमावास्येस मोठी भरती येण्याचे कारण म्हणजे यावेळी सूर्य आणि चंद्र पृथ्वीपासून सरळ रेषेत असतात त्यामुळे सूर्य आणि चंद्र या दोघांचे आकर्षण एकत्र होऊन ते पृथ्वीवर पडते आणि मोठी भरती येते. शुक्ल पक्षाच्या व कृष्ण पक्षाच्या अष्टमीस सूर्य आणि चंद्र यांच्या आकर्षणाच्या कक्षा एकमेकांशी काटकोन करतात त्यामुळे विरुद्ध प्रक्रिया होऊन भरती कमी येते.

भूमध्यापेक्षा समुद्राचे पाणी चंद्रापासून अधिक जवळ असते म्हणून पृथ्वीच्या मध्याच्या जमिनीपेक्षा पाण्याचा पृष्ठभाग चंद्राकडे जास्त ओढला जाऊन भरती येते याच वेळी पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूच्या जमीनीचा भागही चंद्राच्या आकर्षणाने ओढला जातो मात्र त्यावरील पाणी भूमध्यापेक्षा चंद्रापासून दूर असल्याने तेवढे ओढले जात नाही मात्र त्या ठिकाणीही थोडी भरती येते.

पृथ्वीवरील विषुवृत्ताकडील प्रदेशांमध्ये खूप मोठी भरती व ओहोटी पाहावयास मिळते कारण या ठिकाणी चंद्र आणि पृथ्वी यांच्या कक्षा समांतर असतात आणि पृथ्वीच्या ध्रुवाकडील जे प्रदेश आहेत तेथे भरती व ओहोटी नसल्यातच जमा असते याशिवाय भूमध्यसमुद्रातही भरती व ओहोटी फारशी नसते कारण हा समुद्र जमिनीने पूर्ण वेष्टित आहे.

भरती व ओहोटीचा आणखी एक उपयोग म्हणजे त्यामुळे समुद्राचे पाणी स्थिर न राहता त्यास गती उत्पन्न होऊन त्याची नेहमी हालचाल होते त्यामुळे ते पाणी खराब न होता ते शुद्ध राहते. भरती व ओहोटीमुळे जो प्रवाह निर्माण होतो त्यामुळे नदीच्या पाण्यासोबत वाहून आलेला गाळ आणि रेती दूर जाऊन समुद्राच्या तळास जाते.a