संत एकनाथ महाराज

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर आणि इतर चार असे एकूण सात प्रसिद्ध ग्रंथांचे लिखाण केले जे आजही घरोघरी वाचले जातात.

संत एकनाथ महाराज

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाराष्ट्राला प्राचीन काळापासून जी संतपरंपरा लाभली आहे त्यामधील एक संतश्रेष्ठ म्हणजे संत एकनाथ. संत एकनाथ यांचा जन्म हा १५४८ साली महाराष्ट्रातील पैठण मध्ये झाला. ते जन्माने देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण असून त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. एकनाथ लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि आजी या दोघांनी एकनाथांचे पालनपोषण केले.

एकनाथ लहान असतानाच त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी त्यांना लेखन वाचन आणि हिशोबाचे शिक्षण दिले. एकनाथांची मुंज झाल्यावर त्यांनी वेदांचा अभ्यास केला. बालवयातच वेदाध्ययन, पूजाअर्चा, पुराणकथा श्रवण यांची आवड एकनाथांना लागली आणि त्यांचे चित्त साधुवृत्तीकडे वळू लागले.

त्याकाळी देवगिरी येथील यादव वंशांचा अस्त होऊन तेथे बादशाही अमल सुरु झाला होता. त्यावेळी देवगिरीच्या बादशहाचे प्रधान म्हणून जनार्दनपंत हे काम पाहत होते. जनार्दनपंत हे ब्रह्मज्ञानी आहेत असा लौकिक त्याकाळी संपूर्ण राज्यात होता. त्यामुळे परमार्थसाधनेची ओढ लहानपणीच लागलेल्या एकनाथांनी आपल्या आजी आजोबांना न सांगता देवगिरीस जाऊन जनार्दनपंतांची भेट घेतली.

जनार्दनपंतांनी सुद्धा एकनाथांना शिष्य म्हणून स्वीकारून त्यांना ब्रह्मविद्या शिकवली आणि सोबतच जनार्दनपंतांच्या हाताखाली त्यांनी कारकुनी व शिपाईगिरी इत्यादी कामे सुद्धा केली. जनार्दनपंतांच्या येथे बारा वर्षे राहून त्यांचा अनुग्रह प्राप्त केल्यावर एकनाथांनी तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा करून ते त्यांच्या गावी म्हणजे पैठण येथे परत आले. आपला नातू परत आलेला पाहून आजी व आजोबांना अत्यंत आनंद झाला. पुढे जनार्दनपंतांनी आज्ञा केल्याने एकनाथांनी गिरिजाबाई यांच्याशी विवाह केला व गृहस्थाश्रम स्वीकारून ते आजी आजोबांची सेवा करीत पैठण येथेच राहिले. आपल्या नातवाचा सुरु असलेला सुखी संसार पाहून कालांतराने आजी व आजोबांनी समाधानाने या जगाचा निरोप घेतला.

एकनाथांच्या पत्नी गिरिजाबाई या सुद्धा सुशील व सात्विक असून दोघांना हरिपंडित नावाचा पुत्र व दोन कन्यारत्ने प्राप्त झाली. एकनाथ हे संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार असल्याने जनतेस पुराण कथन करून व कीर्तन करून ते आपला चरितार्थ चालवत असत. संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ही त्या काळापर्यंत गुप्त होती व सामान्य लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. एकनाथांनी ज्ञानेश्वरीचा शोध घेऊन ती प्रसिद्ध केली. ज्ञानेश्वरीचा अर्थ एकनाथांनी आपल्या कीर्तनातून लोकांना सांगण्यास सुरुवात केली त्यामुळे ज्ञानेश्वरी घराघरांतून पठण केली जाऊ लागली.

स्वतः एकनाथांनीही मराठी भाषेत ओवीबद्ध ग्रंथांची रचना केली व पुढे हे ग्रंथ खूप प्रसिद्ध झाले. त्याकाळी सर्व सामान्यांना समजतील अशा मराठी भाषेत ग्रंथ लिहिणे म्हणजे अपराधच मानला जात असे मात्र लोकनिंदेची पर्वा न करता संत एकनाथांनी सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचावे म्हणून प्रस्थापितांचा छळ सोसून अत्यंत सहनशीलपणा दाखवून आपले ग्रंथ मराठी भाषेत प्रकाशित केले. एकनाथांनी मराठीच नव्हे तर हिंदी भाषेत सुद्धा काही रचना प्रसिद्ध केल्या होत्या.

एकनाथ हे फक्त एक संत, कीर्तनकार व कवीच नसून ते एक समाजसुधारक सुद्धा होते. त्याकाळी स्पृश्य अस्पृश्यता ही फार पाळली जात असे मात्र एकनाथांनी या प्रथेचा विरोध करून कर्मठ लोकांचा रोष पत्करून घेतला होता.

एकनाथ भगवतगीता संस्कृत भाषेतून प्राकृत भाषेत लिहून त्याचा प्रचार करतात म्हणून कर्मठ पंडितांनी त्यांच्यावर खटला लावून दंड करण्यासाठी त्यांना काशीस बोलावून घेतले मात्र एकनाथांचे तेज पाहून काशीतील पंडितही भारावून गेले. पुढे वादविवादात एकनाथांनी काशीतील पंडितांना एकच प्रश्न विचारला की मी प्राकृत भाषांमध्ये ग्रंथ का लिहू नये याचे कारण सांगा? या प्रश्नावर काशीतील पंडितांना योग्य उत्तर देता न आल्याने एकनाथांच्या या खटल्यात विजय झाला.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर आणि इतर चार असे एकूण सात प्रसिद्ध ग्रंथांचे लिखाण केले जे आजही घरोघरी वाचले जातात. बोले तैसा चाले या गुणाचे पालन करून आणि संसारात राहूनही परमार्थ कसा करता येतो याचा आदर्श संत एकनाथ महाराजांनी समाजास घालून दिला. इसवी सन १५९९ मध्ये अर्थात शके १५३१ फाल्गुन वद्य षष्टीस एकनाथ महाराजांनी पैठण येथे समाधी घेतली. एकनाथांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो दिवस नाथषष्टी या नावाने ओळखला जातो व या दिवशी भाविक गोदावरी नदीकिनारी असलेल्या एकनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यास हजारोंच्या संख्येने पैठण येथे भेट देतात.