इंडोनेशिया व तेथील हिंदू संस्कृती

आशिया खंडातील एक द्विपप्राय देश म्हणून प्रसिद्ध असलेला इंडोनेशिया हा तब्बल १७००० बेटांचा समूह आहे व ही बेटे प्राचीन वारसा असलेली आहेत.  इंडोनेशिया हा तूर्तास मुस्लिमबहुल देश असला तरी येथील बाली या बेटावरील तब्बल ८६% लोक हे हिंदू आहेत.

इंडोनेशिया व तेथील हिंदू संस्कृती

जगात जे धर्म आहेत त्यामध्ये हिंदू धर्म हा अतिशय पुरातन धर्म मानला जातो व या धर्माचे पालन करणाऱ्यांची संख्या जगभरात एकूण १२० कोटीहून अधिक असून जगातील एकूण १६% लोक हिंदू धर्मीय आहेत.

प्राचीन काळी हिंदू धर्माची व्याप्ती सध्याच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक होती व हा धर्म विविध राष्ट्रांत पसरला होता. तूर्तास आपण धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील हिंदू धर्मियांची लोकसंख्या अधिक असलेले देश कोणते असा विचार केल्यास डोळ्यासमोर भारत व नेपाळ ही दोन राष्ट्रे येतात मात्र या दोन राष्ट्रांशिवाय सुद्धा अशी काही राष्ट्रे आहेत ज्यामध्ये हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या नागरिकांची संख्या विपुल आहे व जर हिंदूंची संख्या जास्त असलेल्या पहिल्या दहा देशांचा क्रम लावायचा झाल्यास त्यामध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका, अमेरिका, मलेशिया, इंग्लंड आणि म्यानमार या देशांचा समावेश होतो.

या राष्ट्रांमध्ये चौथ्या क्रमांकावर इंडोनेशिया या देशाचा समावेश होतो. आशिया खंडातील एक द्विपप्राय देश म्हणून प्रसिद्ध असलेला इंडोनेशिया हा तब्बल १७००० बेटांचा समूह आहे व ही बेटे प्राचीन वारसा असलेली आहेत.  इंडोनेशिया हा तूर्तास मुस्लिमबहुल देश असला तरी येथील बाली या बेटावरील तब्बल ८६% लोक हे हिंदू आहेत. प्राचीन काळी भारताचा विस्तार हा साध्याहुन कितीतरी पट अधिक होता व त्याकाळी या विभागाचा समावेश भारतात होत असे. भारतातील काही राजवंशानी आपल्या राज्याचा विस्तार समुद्राच्या सीमा ओलांडून आशिया खंडातील विविध प्रांतांत केला होता मात्र कालांतराने त्या ठिकाणी इतर धर्माचे प्राबल्य झाले तरी काही राष्ट्रे आजही आपली संस्कृती जपून आहेत व तेथील लोकांची नावे आणि तेथील स्थापत्य आणि संस्कृती यामध्ये आजही हिंदू धर्माची झलक दिसून येते.

बाली हा असा भाग आहे ज्या ठिकाणी गेल्या शेकडो वर्षात अनेक परचक्रे येऊनही तेथील लोकांनी आपली संस्कृतीचं काय तर आपला धर्मही सोडला नाही व आजही तेथील नागरिक अभिमानाने हिंदू धर्माचे पालन करतात.

इंडोनेशिया येथे जावा नावाचे एक द्वीप आहे व या बेटावरील नागरिकांनी फार पूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला असला तरी त्यांची नावे आजही हिंदू पद्धतीची असून त्यांच्या घरात हिंदू देवता पूजेत असतात असे त्या देशातील संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी प्रतिपादित केली आहे व याचे कारण त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की धर्म आणि संस्कृती यात फरक असतो तेव्हा आमचा धर्म जरी मुस्लिम असला तरी आमची जुनी संस्कृती हिंदू असल्याने आम्ही तिचे पूर्वापार पालन करतो व आमचे शासनही आम्हास साथ देते.

इंडोनेशिया बेटावर जो आठवडा आहे त्यातील वारांची नावे सुद्धा रवी, सोम, अंगिरा, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी अशी आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदूंचे अनेक जुने ग्रंथ या देशात आजही जपले गेले आहेत व रामायणाची एक अत्यंत जुनी प्रत प्रथम याच देशात आढळली होती.

इंडोनेशियातील लोकांच्या लग्नात हिंदू मंत्रांचा वापर करण्यात येतो असे एका संशोधकाने लिहिले होते व तो मंत्र म्हणजे ॐ केंदांग ब्रह्मांग सदाशिवाय नमः ।  शिवाय संगाय गणेशाय ॐ केंदांग गंगा सदाशिवाय नमः। शिव ॐ गंगा महातीर्थ।

वर्तमानकाळात इंडोनेशियातील फक्त बाली देशात हिंदू बहुसंख्य असण्याचे कारण असे सांगितले जाते की प्राचीन काळी इंडोनेशियावर राज्य करणाऱ्या राजास एका ज्योतिषाने असे सांगितले की चाळीस दिवसांनी या देशावर परचक्र येणार आहे त्यामुळे त्या राजाने आपल्या मुलास काही लोकांसह बाली द्वीपावर सुरक्षित पाठवले आणि कालांतराने परचक्रात पूर्ण देश दुसऱ्या धर्माच्या राजाच्या ताब्यात गेला तरी बाली हे बेट हिंदूबहूलच राहिले.

बाली बेटावरील प्रत्येक गावात हिंदू मंदिरे असून त्या बेटाचे एकूण सात उपविभाग आहेत आणि तेथील लोक शालिवाहन शकाचे पालन करतात. फार पूर्वी येथे वर्णव्यवस्था सुद्धा प्रचलित होती आणि तेथील राजा क्षत्रिय असे. ब्राह्मण सोडून इतर वर्ण मांसाहार करीत. आधुनिक युगात इतर ठिकाणी जेथे धर्म पालन करूनही संस्कृतीचे पालन करणे विसरले जाते त्याच काळात बाली सारख्या बेटात धर्मासोबत संस्कृतीही जपली जात आहे ही खरोखर अभिमानाची बाब आहे.