बारभाई व त्यांचे कारस्थान
बारभाई कारस्थान हे बारा लोकांनी केल्याने त्यास बारभाई कारस्थान म्हणून ओळखले गेले मात्र सुरुवातीस या कारस्थानात फक्त चार मंडळी होती. बारभाई कारस्थान हे इतिहासातील एवढे गाजलेले कारस्थान आहे की आजतागायत त्या कारस्थानाचा अभ्यास करून वेगवेगळ्या स्तरावरील राजकीय घडामोडी देशभरात घडवल्या जातात.
मराठेशाहीच्या उत्तर काळातील एक प्रसिद्ध घटना म्हणून बारभाईंचे कारस्थान ओळखले जाते. ३० ऑगस्ट १७७३ साली नारायणराव पेशवे यांची पुण्याच्या शनिवारवाड्यात निर्घृण हत्या झाली व या हत्येच्या कटात त्यांचे काका रघुनाथराव उर्फ राघोबादादा व त्यांचे काही सहकारी असल्याचे निष्पन्न झाले. रघुनाथरावांना पेशवेपदावर बसण्याची महत्वाकांक्षा ही माधवराव पेशव्यांच्या काळापासूनच होती मात्र माधवराव हे कर्तबगार असल्याने रघुनाथरावांची इच्छा सिद्धीस जाऊ शकली नाही मात्र माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवेपदाची अदृश्य जबाबदारी नाना फडणवीस यांच्याकडे आली.
माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव पेशवेपदी बसले मात्र त्यांचा विश्वास नाना फडणवीसांपेक्षा बाबाजी बर्वे नामक गृहस्थांवर अधिक होता त्यामुळे ते नाना फडणवीसांना फारसे जुमानत नव्हते त्यामुळे नाना फडणवीस या काळात मुख्य राजकारणातून काहीसे बाजूला पडले व कालांतराने नारायणराव एकटे पडून रघुनाथराव आणि सहकाऱ्यांच्या कटास बळी पडले.
नारायणराव पेशवे यांच्यानंतर पदावर आपलाच हक्क असे रघुनाथरावांना वाटले मात्र हे पद मिळवण्यासाठी त्यांच्या हातून जाणते अजाणतेपणाने जे कृत्य झाले त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठे जनमत तयार झाले होते व काहीही झाले तरी रघुनाथरावांना पेशवेपद मिळवून द्यायचे नाही व या पदावर नानासाहेब पेशव्यांचा वंशच कायम ठेवायचा असा निर्धार नाना फडणवीस व यांच्यासहित असलेल्या अकरा मुसद्दी लोकांनी केला व त्यानंतर जे कारस्थान रचले गेले ते बारभाई कारस्थान या नावाने ओळखले गेले.
बारभाई कारस्थान हे बारा लोकांनी केल्याने त्यास बारभाई कारस्थान म्हणून ओळखले गेले मात्र सुरुवातीस या कारस्थानात फक्त चार मंडळी होती व ती म्हणजे नाना फडणवीस, सखाराम बापू, त्रिंबकराव पेठे आणि हरिपंत फडके. नारायणरावांच्या दशक्रिया विधीवेळी या चौघांनी त्याच ठिकाणी शपथ घेतली की, नानासाहेबांचाच वंश पेशवाईवर चालवायचा आणि त्या शिवाय कारभार चालू द्यायचा नाही.
कालांतराने या योजनेत अधिक लोकांची गरज असणे आवश्यक होते त्यामुळे नाना फडणवीस यांना सखाराम बापू, त्रिंबकराव पेठे आणि हरिपंत फडके यांसहित अप्पा बळवंत, कृष्णाजी थत्ते, अप्पाजी पुरंदरे, नारो अप्पाजी, खासगीवाले, विसाजी बिनीवाले, आनंदराव पानशे, बापूराव केशव असे साथीदार लाभले व हेच सर्वजण प्रख्यात बारभाई म्हणून ओळखले गेले.
बारभाई कारस्थानाचा मुख्य उद्देश हा पेशवेपदावर नानासाहेब पेशवे यांचा वंश चालवणे हा होता आणि नारायणराव पेशवे यांच्या मृत्यूवेळी त्यांची पत्नी गंगाबाई गरोदर होती त्यामुळे जर तिला पुत्र झाला तर त्याच्या नावाने कारभार करायचा व कन्या झाली तर गंगाबाईच्या नावे दत्तक घेऊन त्याच्या नावे कारभार चालवायचा असा होता.
निजामअल्ली विरुद्धच्या लढाईत रघुनाथराव गुंतलेले असताना बारभाईंनी गंगाबाईंना पुण्यातून पुरंदरावर पाठवले आणि पुण्याच्या कोतवालास अटक करून गंगाबाईंच्या नावाची द्वाही फिरवली आणि सांगितले की गंगाबाई मालकीण, नाना फडणवीस आणि सखाराम बापू कारभारी त्यामुळे त्यांच्या आज्ञेत सर्वानी राहावे. दादासाहेबांना गादीवरून बडतर्फ केले आहे तेव्हा त्यांचा हुकूम आता कुणी मानू नये.
ही बातमी जेव्हा रघुनाथरावांना समजली तेव्हा त्यांनी तेथील मोहीम अर्धवट सोडून पुण्याचा रस्ता धरला आणि इथून दादासाहेबांना रोखण्यासाठी हरिपंत फडके, त्रिंबकराव पेठे, साबाजी भोसले आणि निजामअल्ली आपापल्या फौजांसह वेगवेगळ्या मार्गाने निघाले होते. पंढरपूर येथे रघुनाथराव आणि त्रिंबकराव यांची गाठ पडून त्रिंबकरावांचा पराभव झाला मात्र पुढे सर्व विरोधक एकत्र आल्यामुळे दादासाहेबांनी शिंदे आणि होळकर यांची मदत घेण्यासाठी उत्तरेचा मार्ग पकडला.
अशाप्रकारे राज्यात धामधूम सुरु असताना येथे पुरंदरावर गंगाबाई यांना पुत्र झाला आणि त्याचे माधवराव नारायण उर्फ सवाई माधवराव असे ठेवण्यात आले आणि पुढे याच सवाई माधवरावांना पेशवेपदाची सूत्रे जन्म झाल्याझाल्या प्राप्त झाली आणि त्यांच्या नावाने पेशवाईची सूत्रे नाना फडणवीसांच्या हाती गेली.
बारभाई कारस्थान हे इतिहासातील एवढे गाजलेले कारस्थान आहे की आजतागायत त्या कारस्थानाचा अभ्यास करून वेगवेगळ्या स्तरावरील राजकीय घडामोडी देशभरात घडवल्या जातात.