जुनी नाणी साठविण्याचा छंद

जुनी नाणी साठविण्याचा छंद हा जुन्या नाण्यांइतकाच दुर्मिळ होत चालला आहे. पण तांदळातून जसे खडे निघावेत तसेच हा छंद जोपासणारे नाणी संग्राहक अजूनहि सापडतात.

जुनी नाणी साठविण्याचा छंद

नाणी जमवताना महत्त्वाचे असते ते नाण्याचे जतन, कारण त्यामुळे नाण्याची उपयुक्तता वाढते. नाणे जर उघड्या अवस्थेत काही काळ राहिले तर हवेचा त्यावर परिणाम होतो. यास ऑक्सीडेशन म्हणतातः क्षारयुक्त हवेच्या थराचा नाण्यावर वेगात परिणाम होतो. ही गोष्ट लवकर समजून येत नाही आणि नाण्याच्या विनाशास कारणीभूत ठरते तसेच परत हे दोष घालविणे अतिशय अवघड असते आणि अशा नाण्याची सफाई केल्यामुळे ते नाणे खराब होते. यासाठी प्रथमोपचार म्हणजे सर्व नाणी वातरहीत (हवाबंद) पेटीत ठेवणे. सध्या प्लॅस्टिकच्या नित्य वस्तू बाजारात येत आहेत आणि प्लॅस्टिक हे नाण्यांचे जतन करण्याच्या दृष्टीने आतिशय उत्तम आहे. अनेक वेगवेगळ्या आकाराच्या प्लास्टिक डब्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

या डब्यांत नाणी ठेवल्यानंतर ती डबी हवा बंद करता येते. ह्या डबीला दोन्ही बाजूंना प्लॅस्टिकचा पातळ थर असतो आणि त्याच्या पारदर्शकतेमुळे नाणी पाहणे सोपे होऊन जाते. अतिशय किंमती असणाया नाण्यांचे जतन ह्या डब्यांतून करणे सोयीस्कर बनते. ह्या डब्या ठेवावयास फारशी जागाहि लागत नाही.

दिवाकर बापट यांच्या 'वाजवून घ्या' या ग्रंथाच्या संदर्भा नुसार बाजारात लांबट आकाराच्या प्लास्टिकच्या किंवा लाकडाच्या चपट्या पेट्या मिळतात. ह्या डब्यांना सरकवण्याचा दरवाजा असतो. अशा पेटीत नाणी ठेवणे अतिशय उपयुक्त ठरते. पण पेट्या पापरताना संग्राहकाने त्यात हवा जाणार नाही याची सदैव काळजी घ्यावी..नाणी ठेवण्यासाठी खाचा असलेले चित्रसंग्रह बाजारात मिळतात त्यांचा उपयोग संग्राहकाने जरूर करावा. हे संग्रह दिसावसयास अतिशय सुंदर असल्यामुळे नाण्यांचे मोल वाढते. कागदी नोटही चित्रसंग्रहात सफाईने ठेवता येते.

नाणी जतन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जमा केलेल्या नाण्यांचे चोरांपासून रक्षण करणे कारण काही लोक ही आपली नाणी बघण्याच्या उद्देशाने हाताची सफाई करू शकतात आणि नाणी जमवण्यासाठी घेतलेली आपली अनेक वर्षांची मेहनत वाया जाऊ शकते. तुमच्या नाणे संग्रहाबद्दल अतिशय गुप्तता पाळणे फार महत्त्वाचे असते. यासाठी तुम्ही केलेला नाणे संग्रह कपाटांच्या ड्रॉवरमध्ये आणि झालेच तर बँकेच्या व्हॉल्टमध्ये ठेवणे अधिक चांगले. पोस्टाने नाणी पाठवायची असल्यास आपण नाण्यांचे संग्राहक आहोत असे कळवून देऊ नये. तर मित्रांनो लक्षात ठेवणार ना या गोष्टी? जर तुम्ही आचरणात आणाल तर तुमच्या नाण्यांचे आणि आमच्या या लेखाचेसुद्धा चिज होईल असे आम्ही मानू.