पोम्पेइ - २००० वर्षांपूर्वी पृथ्वीच्या उदरात गुप्त झालेले शहर

पॉम्पेई मधील सर्व नागरिक एके दिवशी आपली दिनाचार्य पार पडत असताना अचानक शहरात मोठा भूकंप झाला आणि बघताबघता अनेक घरे जमीनदोस्त झाली आणि अनेक नागरिक सुद्धा मृत्यू पावले.

पोम्पेइ  - २००० वर्षांपूर्वी पृथ्वीच्या उदरात गुप्त झालेले शहर
पोम्पेइ

असे म्हणतात की आपण सर्व ज्वालामुखीच्या पोटावर राहत आहोत व हे खरेच आहे कारण पृथ्वी ग्रहाच्या अंतर्भागात प्रचंड असा लाव्हारसाचा साठा असून तो कधी, कसा आणि कुठे भडकेल याचा काही नेम नसतो. लाव्हारसाच्या उद्रेकानेच भूकंप, त्सुनामी आदी आपत्ती पृथ्वीवरील जीवसृष्टीस अनुभवायास मिळतात व यापासून भूचर आणि जलचर यापैकी कुणीच सुरक्षित नाहीत.

मनुष्याचा उदय होण्यापूर्वी लाखो वर्षं आधी असाच एक प्रलय पृथ्वीवर आला आणि डायनोसॉर या पृथ्वीवरील आजतागायतच्या सर्वात मोठ्या प्राण्याचा संपूर्ण विनाश करून टाकला. पुढील काळात एवढा मोठा प्रलय आला नसला तरी मानवजातीच्या उद्यापासून ते आजतागायत आपण ज्वालामुखीच्या योगे होणारे अनेक प्रलय आपल्या डोळ्यांनी पाहत व अनुभवत आलो आहोत.

मनुष्य हा समूहाने राहणार प्राणी असून तो स्वतःच्या सुरक्षित जीवनासाठी जो समूह निर्माण करतो त्यास गाव असे म्हणतात व अशी अनेक गावे मिळून तालुका, जिल्हा, राज्य आणि देश निर्माण होत असतो. या समूहास मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित आपत्तींपासून कायम धोका असतो व काही धोके असे असतात की त्यामध्ये गावेच काय तर संपूर्ण संस्कृती सुद्धा नामशेष होते. हडप्पा मोहोंजोदारो या प्राचीन संस्कृती नैसर्गिक संकटांनी नामशेष केल्याचे आपण जाणतोच.

अशीच एक घटना आजपासून दोन हजार वर्षांपूर्वी घडली होती व या घटनेत एक वैभवसंपन्न शहर जमिनीच्या उदरात असे गडप झाले की त्याचा शोध नंतर खूप वर्षांनी लागला. हे शहर म्हणजे इटलीच्या नेपल्स शहराच्या शेजारी असलेले पॉम्पेई. पॉम्पेई हे शहर इटलीमध्ये बेसुबियास नामक पर्वताच्या पायथ्याशी वसलेले एक संपन्न शहर होते आणि या शहरातील लोक अत्यंत सुखी जीवन जगत होते. इटलीमधील एक आदर्श शहर म्हणून त्याची ख्याती होती. 

पॉम्पेई मधील सर्व नागरिक एके दिवशी आपली दिनाचार्य पार पडत असताना अचानक शहरात मोठा भूकंप झाला आणि बघताबघता अनेक घरे जमीनदोस्त झाली आणि अनेक नागरिक सुद्धा मृत्यू पावले. या प्रलयानंतर लोकांना असे जाणवले की हे गाव साक्षात ज्वालामुखीच्या उदरावर वसले असल्याने येथे पुन्हा एकदा नवीन वस्ती तयार करण्यात काहीच अर्थ नाही मात्र या ठिकाणी असलेल्या उत्तम नैसर्गिक संसाधनाच्या उपलब्धतेमुळे रोमन राज्याने याच ठिकाणी पुन्हा एकदा नवीन शहर विकसित करण्याचा विचार केला आणि त्यानुसार हे काम वेगाने सुरु झाले.

अशाप्रकारे येथील नागरिक पुन्हा एकदा या ठिकाणी स्थायिक होण्याचा विचार करीत असताना इसवी सनाच्या ७९ व्या वर्षी शहराच्या मागील बाजूस असलेल्या बेसुबियास पर्वतातून ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आणि हा ज्वालामुखी वेगाने शहराच्या दिशेने येऊ लागला. हा ज्वालामुखी पाहुन नागरिक बिथरले आणि मिळेल ते सामान आणि आप्तजन सोबत घेऊन पळायला लागले मात्र सर्वांचेच नशीब तेवढे चांगले नव्हते आणि पाहता पाहता हा ज्वालामुखी शहरावर कोसळला आणि हे शहर जमिनीत गडप झाले. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हारसाचा थर तब्बल वीस फूट उंच होता त्यामुळे हा संपूर्ण थर शहराच्या वर जमा झाल्याने हे शहरच दिसेनासे झाले. 

काळ सरला आणि त्या प्रांतातील लोक हेच विसरून गेले की येथे कधीकाळी एक शहर होते. मग नव्याने आलेली माणसे तेथे शेती करू लागली आणि कालांतराने त्यांना जमिनीखाली वस्तू सापडू लागल्या. सतत अशा वस्तू सापडत गेल्याने लोकांनी तज्ज्ञांना पाचारण केले आणि त्यानंतर या ठिकाणी उत्खनन सुरु झाले आणि पाहता पाहता जमिनीत गडप झालेले हे शहर पुन्हा एकदा नव्याने जगासमोर आले.

सध्या हे शहर एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले असून प्राचीन संस्कृती आणि स्थापत्य कसे होते हे आधुनिक युगातील लोकांना हे शहर पाहून अनुभवता येते आणि निसर्गाच्या आज्ञेत राहूनच जीवन व्यतीत करण्याची शिकवणही यानिमित्ताने प्राप्त होते.