महात्मा फुले व छत्रपती शिवरायांची समाधी - एक आद्य शिवकार्य

पुराव्यांच्या भाषेत बोलायचे झाले तर होय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची ब्रिटिश काळात झालेली दुरावस्था प्रथम लोकांसमोर आणली ती महात्मा फुले यांनीच.

महात्मा फुले व छत्रपती शिवरायांची समाधी - एक आद्य शिवकार्य

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आपल्याकडे महापुरुषांना सोयीनुसार जातीच्या राजकारणासाठी वापरुन मतांचे राजकरण करण्याची प्रथा गेली अनेक वर्षे सुरु आहे, माणसाने स्वजातीचा अभिमान जरुर बाळगावा मात्र परजातीचा द्वेष कदापि करु नये! थोर समाजसेवक महात्मा जोतिराव फुले यांची २८ नोव्हेंबर ला पुण्यतिथी होती त्यानिमित्ताने अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली मात्र महात्मा फुले आम्हाला खरचं कळले आहेत का याचा विचार आम्ही केला पाहीजे! 

"जोतिबा फुले यांचे मुळ कुटूंब सातारा जिल्ह्यातील खातगुण येथील, त्यांचे मुळचे आडनाव 'गोर्‍हे' होते मात्र पुण्यात आल्यावर त्यांच्या मळ्यातील फुलांचे पुडे पेशव्यांकडे जाई म्हणुन त्यांच्या कुटूंबास फुले असे नाव मिळाले. १८२७ ला जोतिबांचा पुण्यात जन्म झाला. लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने ते इंग्रजी शाळेत शिकू लागले. याच शाळेत असलेले सदाशिव बल्लाळ गोवंडे तसेच मोरो विठ्ठल वाळवेकर व सखाराम यशवंत परांजपे हे तीन ब्राह्मण विद्यार्थी त्यांचे सवंगडी तसेच सहकारी बनले. फुले यांचा पिंड देशभक्ताचा असल्याने ते वासुदेव बळवंत फडके यांचे गुरु लहुजीबुवा यांच्याकडे गोळीबार व दांडपट्टा सुद्धा शिकले. " या गोष्टी इंग्रज सरकारला पालथे घालण्याच्या उद्देशाने मी शिकलो व त्या कामी मला सुधारलेल्या भट विद्वानांपासून स्फुर्ती मिळाली होती' असे त्यांनी 'गुलामगिरी' या पुस्तकात प्रतिपादित केले आहे. १८४७ साली त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्त्रियांना सुशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आणि १८४८ साली पुण्याच्या ब्राह्मण वस्तीतल्या भिडेंच्या वाड्यात स्त्रियांची पहिली शाळा काढली. तसेच पहिली स्त्री शिक्षीका म्हणुन त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले रुजु झाल्या. मात्र या कार्यात त्यांना सर्वांचीच हेटाळणी व छळ सोसावा लागला. याच काळात त्यांनी 'मी कोणाच्याही घरी अन्नग्रहण करेन अशी प्रतिज्ञा केली'

लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर या केसरीच्या दोन संपादकांवर कोल्हापुर राजघराण्याच्या वंशजांवर इंग्रजांनी जो अन्याय केला त्याविरोधात आवाज उठवल्याबद्दल जो खटला भरला गेला त्यातून दोघांची सुटका करण्यासाठी लागणारी जामिनाची रक्कम महात्मा फुल्यांनी मिळवून दिल्याचा उल्लेख केसरीचे संपादक न. चि. केळकर त्यांच्या टिळक चरित्रात करतात, याशिवाय १८८३ सालच्या केसरी अंकात सदर सहकार्यावर एक लेख लिहीला गेला आहे. तुरुंगातून सुटल्यावर टिळकांचा सत्कार करण्यासाठी खुद्द फुले अग्रणी होते असेही लक्षात येते.

"या संदर्भात केळकर लिहितात की, टिळक आगरकर तुरुंगातून सुटून आले त्यावेळी त्यांच्या सत्कारात हे ब्राह्मणेतर पुढारी सहभागी होते व जोतीराव फुले यांनी कोल्हापूर प्रकरणात रामशेठ उरवणे यांच्याकडून टिळकांच्या जामिनकी बद्दल दहा हजार रुपयांची जबाबदारी घेतली."

तर महात्मा फुले यांनी ब्रिटिशांचे राज्य संपूर्ण भारतावर असताना स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस भेट देऊन अतिशय भग्नावस्थेत असलेल्या या समाधीविषयी प्रथम जनजागृती केली होती असे आपण ऐकले आहे.

लोकमान्य टिळक यांचे चरित्र या सन १९२३ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात ग्रंथलेखक न. चिं. केळकर यांनी महात्मा फुले यांच्या शिवसमाधीबद्दल केलेल्या जागृतीचा उल्लेख. (लोकमान्य टिळक यांचे चरित्र - खंड १ - भाग तिसरा - पृष्ठ ७१)

लोकमान्य टिळक यांचे चरित्र या सन १९२३ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात ग्रंथलेखक न. चिं. केळकर यांनी महात्मा फुले यांच्या शिवसमाधीबद्दल केलेल्या जागृतीचा उल्लेख. (लोकमान्य टिळक यांचे चरित्र - खंड १ - भाग तिसरा - पृष्ठ ७१)

पुराव्यांच्या भाषेत बोलायचे झाले तर होय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची ब्रिटिश काळात झालेली दुरावस्था प्रथम लोकांसमोर आणली ती महात्मा फुले यांनीच. सन १८६८ साली फुले यांनी शिवसमाधीस भेट व समाधीची ब्रिटिश काळात झालेली दुरावस्था आपल्या दीनबंधू या वर्तमान पत्रातून पहिल्यांदा लोकांसमोर आणली. शिवरायांच्या समाधीकडे ब्रिटिशकाळात झालेले अक्षम्य दुर्लक्ष फुले यांना खटकले व ही खंत त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहून मांडली.

याबद्दल खुद्द लोकमान्य टिळकांचे पट्टशिष्य व केसरीचे संपादक नृसिंह केळकर आपल्या लोकमान्य टिळकांचे चरित्र या पुस्तकात लिहितात की,

"रायगडावरील शिवाजी महाराजांच्या मोडकळीस आलेल्या समाधीची हकीकत दीनबंधू पात्रात प्रथम प्रकाशित झाली होती व पुण्यास चाफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक  संबंधाने जी सभा भरली होती त्याला जोतीराव हजर होते."

स्वतः टिळकांचे पट्टशिष्य व केसरी वृत्तपत्राचे संपादक न. चि. केळकर हे महात्मा फुले यांनी शिवसमाधीची दुरावस्था लोकांसमोर आणली असे लिहितात तेव्हा विरोधकांना आणखी पुराव्याची गरजच काय? लोकमान्य टिळक व महात्मा फुले हे दोघेही आम्हांस वंदनीयच आहेतकारण महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या समाधीची ब्रिटीश काळात झालेली अवस्था जनतेसमोर आणली तर टिळकांनी शिवसमाधीच्या जिर्णोद्धारासाठी प्रयत्न करुन फुले यांची इच्छा पुर्ण केली. मात्र या दोनही महापुरुषांवर जेव्हा पुरावे नसताना लोक टीका करतात तेव्हा पुराव्यानिशी सत्य मांडणे  हि काळाची गरज बनते.