कृष्णाच्या हातून असा झाला कंस वध

ज्यावेळी कंसाला देवकी प्रसूत झाल्याचे कळले तेव्हा त्या बालिकेस मारण्यासाठी तो बंदिगृहात गेला आणि बालिकेस हातात उचलून फेकावयास गेला असता ती बालिका अचानक त्याच्या हातून निसटली आणि आकाशांत अदृश्य झाली. 

कृष्णाच्या हातून असा झाला कंस वध
कंस वध

श्रीकृष्णचरित्रातील एक प्रसिद्ध खलपुरुष म्हणून कंस प्रसिद्ध आहे. कंस हा कृष्णाचा चुलत मामा असल्याने त्यास सर्वजण कंस मामा या नावानेही ओळखतात. यादव कुळातील सात्वत याचा पुत्र अंधक याच्या वंशात मथुरा येथे उग्रसेन नामक राजा झाला व त्यास एकूण नऊ पुत्र होते. कंस हा या सर्व पुत्रांतील ज्येष्ठ असून रामायणातील काल्नेमी या असुराचा पुनर्जन्म म्हणजे कंस  होता.

कंसास एकूण दोन बायका असून दोघीही मगध देशाचा राजा जरासंधच्या मुली होत्या व त्यांची नावे अस्ति आणि प्राप्ती अशी होती. कृष्णाची आई देवकी ही कंसाची चुलत बहीण असून  देवकीचे वडील देवक हे कंसाचे काका होते. सुरुवातीस कंसाची देवकीवर एक भाऊ म्हणून खूप माया होती कारण देवकीचे लग्न जेव्हा वसुदेवाशी झाले त्यावेळी कंसानेच हा विवाह समारंभ खूप थाटामाटात साजरा करून लग्नानंतर वधूवरांची ज्या रथावरून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते त्या रथाचे सारथ्य स्वीकारले होते.

विवाहाची मिरवणूक सुरु असताना अचानक एक आकाशवाणी झाली की ज्या देवकीच्या बालकांपैकी एक जण तुझा कर्दनकाळ ठरेल. ही आकाशवाणी ऐकून कंसाची वृत्ती अचानक बदलली आणि देवकीवरील माया नष्ट होऊन त्याच्यात क्रोध निर्माण झाला आणि रागाच्या भरात आपली तलवार उपसून तो देवकीवर चालून गेला. 

कंसाने देवकीवर वार करण्यासाठी तलवार उपसली तेव्हा तिचा पती वसुदेव मध्ये पडला आणि कंसाला म्हणाला की आज आमच्या लग्नात असे कृत्य तू करू नकोस. आकाशवाणीनुसार जर आमच्या अपत्याच्या हातून तुझा मृत्यू असेल तर यापुढे देवकीस अपत्य झाल्यावर त्वरित मी ते तुझ्याकडे सोपवेन तरी कृपया तू देवकीचा प्राण या क्षणी घेऊ नकोस. वासुदेवाची विनंती ऐकून कंस शांत झाला व यानंतर त्याने देवकीस मारावयाचा विचार तात्पुरता रद्द करून विवाह समारंभ पूर्ण केला. 

यानंतर काही काळ लोटला मात्र कंसाच्या कानात त्या आकाशवाणीतील उद्गार सतत घोळत होते आणि जरी वासुदेवाने त्याची अपत्ये आपल्याकडे सोपविण्याचे वचन दिले असले तरी प्रत्यक्षात पुत्रलोभापुढे वासुदेव व देवकी आपल्याला दिलेले वचन मोडतील असा संशय त्याच्या मनी उत्पन्न झाला त्यामुळे देवकीला आपल्याच राज्यात कैदेत ठेवणे योग्य आहे असा विचार त्याने केला. मात्र देवकीला कैद करून ठेवण्याचा इरादा आपला पिता उग्रसेन कितपत ऐकेल असा विचार मनात येऊन कंसाने उग्रसेनास नजरकैदेत ठेवून राज्याचा ताबा स्वतःकडे घेतला आणि एक दिवस वासुदेव आणि देवकीस खोटे कारण सांगून राज्यात बोलावून घेतले आणि दोघांनाही कैद करून तुरुंगात टाकले.

देवकी व वासुदेव कैदेत असताना प्रथम दोघांना एका पुत्ररत्नाचा लाभ झाला. वासुदेवाने वचन दिल्याप्रमाणे हे बालक कंसाच्या ताब्यात दिले. हे निरागस बालक पाहून कंसाच्या मनात आधी करुणा उत्पन्न झाली मात्र दुसऱ्याच क्षणी त्यास त्याच्या मृत्यूची आकाशवाणी आठवली आणि त्याने त्या बालकास मारून टाकले व अशाच प्रकारे कंसाने देवकी व वासुदेवाच्या पोटी जन्म घेतलेल्या आणखी पाच बालकांचा एक एक करून बळी घेतला.

देवकी सातव्यांदा गर्भवती राहिली त्यावेळी मात्र एक चमत्कार घडला आणि देवकीचा गर्भ हा देवकीच्या पोटातून स्थलांतरित होऊन नंद नामक राजाजवळ वासुदेवाची जी द्वितीय पत्नी रोहिणी होती तिच्या पोटी गेला आणि रोहिणी गर्भवती झाली.  पुढे देवकीस जेव्हा आठवा गर्भ राहिला त्यावेळी वासुदेवाने या बाबतीत अत्यंत सावधानता बाळगली आणि ज्यावेळी बालकाचा जन्म झाला त्यावेळी वासुदेवाने कैदेतून स्वतःची गुप्तपणे सुटका करवून त्या बालकास सुरक्षितपणे गोकुळातील नंद राजाकडे पोहोचवले आणि देवकीचा सातवा गर्भ जो वासुदेवाची दुसरी पत्नी रोहिणीस राहिला होता त्यापासून तिला जे कन्यारत्न झाले होते ते घेऊन वासुदेव मथुरेस परतला. 

ज्यावेळी कंसाला देवकी प्रसूत झाल्याचे कळले तेव्हा त्या बालिकेस मारण्यासाठी तो बंदिगृहात गेला आणि बालिकेस हातात उचलून फेकावयास गेला असता ती बालिका अचानक त्याच्या हातून निसटली आणि आकाशांत अदृश्य झाली. 

अशाप्रकारे देवकी व वासुदेव यांचा सातवा पुत्र बलराम आणि आठवा पुत्र गोकुळात नंदगृही नंद व त्याची पत्नी यशोदेकडे वाढू लागला व त्याचे नाव कृष्ण असे ठेवले गेले. कृष्ण व बलराम गोकुळात मोठे होत असताना एके दिवशी कंसास ही दोन्ही मुले देवकीची आहेत याची खबर लागली आणि तो चकित झाला मात्र काही करून या दोघांचा निकाल लावणे गरजेचे आहे हे समजून त्याने कृष्ण व बलराम यांना मारण्यासाठी आपल्या राज्यातून पुतना, अघासुर, केशी इत्यादींना पाठवले मात्र कृष्णाने एक एक करून तिघांचाही वध केला. 

यानंतर कंसाची पक्की खात्री झाली की कृष्ण हाच आपला कर्दनकाळ आहे. कंसाने मग धनुर्यागाच्या निमित्ताने कृष्ण व बलराम यांना मथुरेस घेऊन येण्यासाठी अक्रूर यास गोकुळास पाठवले. कृष्ण व बलरामास आपल्या चुलत काकाच्या मनात काय आहे याची पुरेपूर कल्पना आली होती मात्र आपल्या जन्मदात्या आई वडिलांना कैदेत ठेवून त्यांचा छळ केल्याबद्दल आणि आपल्या सहा भावंडांची हत्या केल्याची शिक्षा कंसाला करणे भाग होते म्हणून कृष्ण व बलराम अक्रूर सहित मथुरेस निघाले.

मथुरेत धनुर्यागाची मोठी स्पर्धा कंसाने मुद्दाम आयोजित केली होती आणि एका प्रशस्त मैदानात राज्यातील सर्व जनता उपस्थित होती यावेळी कृष्ण व बलरामाची मल्लविद्या पाहण्याची इच्छा कंसाने व्यक्त केली आणि त्याने कृष्णावर चाणूर आणि बलरामावर मुष्टिक हे शक्तिशाली मल्ल सोडले मात्र कृष्ण व बलराम हे उत्तम मल्लविद्या जाणणारे असल्याने दोघांनीही एक एक करून चाणूर व मुष्टिक दोघांचाही समाचार घेऊन त्यांना ठार केले.

यानंतर कृष्णाने कंसाच्या दिशेने मोर्चा वळवला व त्याच्याशी द्वंद्वयुद्ध करून त्याचा पराभव केला आणि अंतिमतः तलवारीने कंसाचा शिरच्छेद केला आणि याच वेळी बलरामानेही कंसाच्या आठ भावांचा वध केला आणि आपल्या आई वडील व भावंडांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला. अशाप्रकारे एका आकाशवाणी मुळे कंसाच्या हातून अनेक गुन्हे झाले व या गुन्ह्यांमुळेच पुढे कंसवध झाला. कंसाने जर सुरुवातीस दयाबुद्धी दाखवली असती तर कदाचित इतिहास वेगळा असू शकला असता.