जटायू - पक्ष्यांचा राजा

जटायूस रामायणात पक्ष्यांचा राजा म्हटले गेले आहे मात्र तो खरोखर एखादा पक्षी होता की मानव याची माहिती फारशी आढळत नाही, कदाचित तो एक गरुडवंशीय राजा असावा अशीही शक्यता असू शकते.

जटायू - पक्ष्यांचा राजा

रामायणात रावणाने सीतेचे हरण केले हे रामास सर्वप्रथम ज्याच्याकडून समजले तो म्हणजे जटायू. जटायू हा एकमेव दुवा होता ज्यामुळे रामायणाचा उत्तरार्ध घडण्यास कारण झाले व त्यामुळे जटायूचे चारित्र्य जाणून घेणे गरजेचे आहे.

जटायूस रामायणात पक्ष्यांचा राजा म्हटले गेले आहे मात्र तो खरोखर एखादा पक्षी होता की मानव याची माहिती फारशी आढळत नाही, कदाचित तो एक गरुडवंशीय राजा असावा अशीही शक्यता असू शकते.

विनता नामक एक पक्ष्यांचा राजा होता व त्यास अरुण नामक एक पुत्र होता. अरुण यास दोन पुत्र होते ज्यांची नावे अनुक्रमे संपाती आणि जटायू अशी होती. संपाती हा जटायूचा मोठा भाऊ होता.

रामाची व जटायूची भेट सर्वप्रथम राम वनवासास निघाला असताना झाली होती व यावेळी दोघांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारले होते आणि ओळख झाल्यावर तुझे वडील दशरथ हे माझे चांगले मित्र आहेत असे सुद्धा जटायूने रामास सांगितले होते.

रामास हे समजल्यावर त्याने जटायूस आम्ही पंचवटीकडे प्रस्थान करीत आहोत असे सांगितले आणि वडिलांप्रमाणे आमच्यावर तुझे लक्ष असू दे असेही सांगितले.

कालांतराने जेव्हा रावणाने पंचवटीतून भिक्षूरूपात सीतेचे हरण केले आणि तिला पुष्पक विमानातून लंकेस घेऊन जात असताना एका पर्वतावर जटायूने रावणास पहिले आणि यावेळी सीता रामाचा व लक्ष्मणाचा धावा करीत होती हे पाहून त्यास रावणाने सीतेचे हरण केले आहे हे समजले.

जटायूने वेगाने रावणास गाठून त्यास अडवले आणि हे कृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र रावणाने जटायूचे बिलकुल न ऐकल्याने नाईलाजास्तव जटायूने रावणास युद्धाचे आव्हान दिले व रावणानेही ते आव्हान स्वीकारले.

यानंतर जटायू आणि रावण यांचे तुंबळ युद्ध झाले मात्र दोघांमध्ये बराच वेळ युद्ध चालल्यावर रावणाने युक्तीने जटायूच्या पंखांवर वार करून त्यास जायबंदी केले आणि त्याच्या शरीरावर शस्त्राचा आघात करून त्यास जबर जखमी केले.

यानंतर बराच काळ जटायू त्या पर्वतावर मरणोन्मुख अवस्थेत पडून रामाची वाट पाहत होता. राम व लक्ष्मण सीतेचा शोध घेत त्या स्थळी आले आणि त्यांना जखमी जटायू दृष्टीस पडला. राम आणि लक्ष्मण त्वरित जटायूकडे गेले आणि त्याची विचारपूस केली यावेळी जटायूने त्याच्यासोबत घडलेली हकीकत रामास कथन केली आणि आपले प्राण सोडले.

राम व लक्ष्मणास जटायूच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःख झाले व पहिल्या भेटीत वडिलांप्रमाणे लक्ष ठेवण्याच्या दिलेल्या वाचनास जटायू जागून त्याने आपल्यासाठी प्राण खर्ची केले हे पाहून रामाने आणि लक्ष्मणाने जटायूवर पुत्रवत अंत्यसंस्कार केले व त्याचे पिंडदान आणि जलांजली आदी संपूर्ण विधी सुद्धा यथोचितपणे पार पाडले.

जटायूने सांगितल्याप्रमाणे त्या पर्वतापासून राम व लक्ष्मणाने नैऋत्य दिशा पकडून सीतेचा शोध घेण्यास सुरुवात केली. रावणाने सीतेचे हरण केले आहे हे जाणणारा जटायू हा प्रथम असल्याने रामायणात त्याचे महत्व मोठे आहे.