शिराळशेट - औट घटकेचा लोकप्रिय राजा

औट घटकेचा शिराळशेट ही म्हण आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रचलित आहे. मात्र ही म्हण एका सत्य घटनेवर आधारित आहे हे आपणास ठाऊक आहे काय? तर ही घटना घडली आजपासून ६०० वर्षांपूर्वी म्हणजे सन १३९६ साली.

शिराळशेट - औट घटकेचा लोकप्रिय राजा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

औट घटकेचा शिराळशेट ही म्हण आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रचलित आहे. मात्र ही म्हण एका सत्य घटनेवर आधारित आहे हे आपणास ठाऊक आहे काय? तर ही घटना घडली आजपासून ६०० वर्षांपूर्वी म्हणजे सन १३९६ साली. त्या काळी महाराष्ट्रातून देवगिरीच्या यादव या मराठमोळ्या साम्राज्याचा अस्त झाला होता व बहामनी राजे राज्य करीत होते.  

आज जसे आपण कोरोना संकटास सामोरे जात आहोत तसेच त्यावेळी सर्व महाराष्ट्रीय दुर्गादेवीच्या दुष्काळास सामोरे जात होते. महाराष्ट्रात इ.स. १३९६-१४०७ अशा सलग बारा वर्षांमध्ये पडलेला दुष्काळ दुर्गादेवीचा दुष्काळ या नावाने ओळखला गेला. या दुष्काळात महाराष्ट्र, कर्नाटक या प्रदेशांत राहणारे लाखो लोक उपासमारीमुळे मेले, तर कित्येक जण स्थलांतरित झाले.

या महाभयंकर दुष्काळामुळे शासकीय यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली व राज्यकर्ते सुद्धा हतबल होऊन गेले. अशावेळी एक पेशाने वाणी असलेला पुरुष देवदूतासारखा लोकांच्या मदतीसाठी धावून आला. त्याचे नाव होते शिराळशेट. शिराळशेट एक व्यापारी होता या महाभयानक दुष्काळामुळे आपल्या प्रांतातील जनतेचे होणारे हाल त्यास पाहवले गेले नाहीत.

अशा परिस्थिती मध्ये लोकांचे फक्त सांत्वन करून भागणार नाही तर मैदानात उतरून लोकांना मदतीचा हात द्यायला हवा असा विचार त्याच्या मनात आला. त्याने लागलीच आपली खाजगी यंत्रणा पणास लावली आणि आपले हजारो बैल व माणसे या यंत्रणेत आणून महाराष्ट्र व कर्नाटक या भागात त्याने फिरत्या बैलांच्या साथीने प्रचंड प्रमाणात धान्याचा फुकट वाटप केला व दुष्काळाने हतबल झालेल्या लोकांचे प्राण वाचवले.

दुष्काळाचा सामना करण्यात तेव्हाचे शासन कमी पडल्याने एकट्या शिराळशेटने स्वतःची यंत्रणा उभारून एवढे कार्य केले ज्यामुळे संपूर्ण जनता त्याचे आभार मानू लागली व कौतुक करू लागली. बघता बघता ही बातमी राजाच्या कानावर गेली. त्यावेळी राजधानीचे शहर हे बिदर येथे होते. राजाने शिराळशेट यास बिदर येथे बोलावून घेतले.

कोण हा व्यक्ती ज्याने इतके मोठे कार्य विनामूल्य केले हे पाहण्याची राजास खूपच ओढ लागली होती. ज्या दिवशी शिराळशेट दरबारात पोहोचले त्यावेळी राजाने अत्यंत प्रसन्न होऊन त्यांचा खूप सन्मान केला आणि तुम्हाला जे हवे आहे ते मागा असे शिराळशेट यांस सांगितले. 

शिराळशेट यांना जहागिरीचा व पैशाचा केव्हाही मोह नव्हता. जे काही कमावले ते विनामूल्य लोकांना दान करून त्याने एक आदर्श निर्माण केलाच होता त्यामुळे त्याने इनाम अथवा जहागिरी न मागता एक वेगळीच मागणी राजाकडे केली.

साडेतीन घटका खावंदांनी आपला अधिकार मला द्यावा

राजा हे ऐकून चकित झाला, त्याला कळेनासे झाले की शिराळशेट यांना काय म्हणायचे आहे. त्याला असे वाटले की कदाचित शिराळशेट यांना साडे तीन घटका माझ्या सिंहासनावर बसायचे असेल. यालाही राजाची हरकत नव्हती कारण शिराळशेटने दुष्काळात केलेले कार्य हे एका राजासारखेच होते. 

राजा सिंहासनावरून उठला व शिराळशेटला म्हणाला की या आणि माझ्या सिंहासनावर बसा, आपला तेव्हडा मान आहे.

यावर शिराळशेट म्हणाले, या तक्तास पाय लावणे मला योग्य वाटणार नाही, फक्त साडे तीन घटका आपले शिक्के माझ्या स्वाधीन असावेत आणि या काळात मी जे काही निर्णय घेईन ते आपणास मान्य असायला हवेत. 

बादशाहने शिराळशेटची मागणी त्वरित मान्य केली व आपले शिक्के शिराळशेटच्या स्वाधीन केले.

अशा रीतीने शिराळशेट साडे तीन घटकेचे राजे झाले. मात्र या औट घटकांमध्येही शिराळशेट यांनी असे निर्णय घेतले ज्यांनी आदर्श निर्माण केला. सुरुवातीस त्यांनी खालसा केलेल्या धर्मासंबंधी देणग्या व इनामे मोकळी केली व आणखी अनेक देवस्थानांना देणग्या दिल्या. अजूनही अनेक लोकहिताचे निर्णय शिराळशेट यांनी आपल्या साडे तीन घटकांत घेतले. वेळ पूर्ण होताच त्यांनी सर्व शिक्के बादशाहच्या हाती स्वाधीन केले व समोर हात जोडून उभे राहिले.

बादशाह हे सर्व निर्णय पाहून आश्चर्यचकित झाला. शिराळशेटने एवढे समाजपयोगी निर्णय घेतले मात्र स्वतःच्या फायद्याचा एकही निर्णय कसा घेतला नाही. बादशाहने मग शिराळशेट कडे हट्ट धरला की तुम्हाला काही नको असले तरी मी तुम्हाला जे देईन ते तुम्ही घ्यायलाच हवे. अशा रीतीने बादशाहने शिराळशेट याना नव्हे तर त्यांच्या मुलांना सरदारकी दिली कारण शिराळशेट स्वतः काही स्वीकारणार नाहीत हे त्यास ठाऊक होते. 

शिराळशेट यांच्या वंशजांपैकी नामशेट यांचा उल्लेख पुढे सापडतो. माणदेशातील एक राजकीय बंड मोडण्याच्या कामासाठी ते आले असल्याचा उल्लेख मिळतो. माणदेशातील वरकुटे गावाजवळ त्याचा तळ पडला होता यावरून त्या गावाचे नावही नामशेटचे वरकुटे असे पडले आहे. 

श्रावण महिन्यात अद्यापही शिराळशेट यांच्या नावे उत्सव केला जातो. शिराळशेट यांनी ६०० वर्षांपूर्वी केलेल्या कार्याचा आदर्श आजही घेण्यासारखा आहे. संकटे ही वेगवेगळ्या स्वरूपात येतच असतात मात्र या संकटांत सामान्य जनतेसाठी धावून येणारे योद्धे विरळच असतात. अशा अनेक ज्ञात अज्ञात शिराळशेटना मराठी बझ तर्फे सलाम.