कमलाकर दांडेकर - यांनी कोवळ्या वयात देशासाठी हौतात्म्य स्विकारले
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या धगधगत्या अग्नीकुंडात असंख्यांनी आपल्या प्राणाहूती दिल्या मात्र सर्वांनाच आपल्या आहुतीचे योग्य श्रेय मिळाल्याची खंत आजही जाणवत आहे. अशाच उपेक्षित मानकर्यांपैकी कमलाकर दांडेकर हे एक, वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी देशासाठी आपले प्राण देणार्या या विरावर खरे तर चित्रपट निर्मिती व्हायला हवी मात्र ते सोडाच तर त्यंच्या कार्यावर साधा लेखही प्रकाशित होत नसल्याने यांनी केलेला त्याग वाया तर गेला नाही ना? असा प्रश्न पडतो.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
कमलाकर दांडेकर यांचा जन्म १५ जुन १९२४ रोजी महाड येथील तांबट आळीत विठ्ठल महादेव दांडेकर व काशिताई यांच्या पोटी झाला. पाच बहिणींमध्ये कमलाकर हा एकच भाऊ असल्याने हा बहिणींसहित सर्वांचाच अतिशय लाडका होता. लहानपणापासूनच बुद्धीने तलख असल्याने कमलाकराने डॉक्टर व्हावे अशि वडिलांची इच्छा होती. घरची परिस्थीतीही उत्तम असली तरी कमलाकर यांची राहणी अतिशय साधी पण स्वच्छ असायची. घरातून खाऊसाठी मिळालेल्या पैशाचा हिशेबही ते आपल्या डायरीत लिहून ठेवत. हे सर्व पैसे ते स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च करत. गारुड्यांना चार आणे दिल्याची नोंदही त्यांच्या दैनंदिनीमध्ये सापडते.
मेट्रीकच्या वर्गातील अतिशय हुशार असे विद्यार्थी कमलाकर हे स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेत होते. ते ज्या शाळेत शिकत त्या शाळेतून क्रांती नामक द्वैमासिक निघत असे. कमलाकर त्यातून लिखाण करत असत. शाळेतील गुरुजी मोहन मेहता यांना त्यांनी आपल्या गुरुस्थानी मानले होते. पुढे राष्ट्रीय सेवादलाच्या विचारांनी ते भारले गेले. त्यांच्या अभ्यासाच्या खोलीतील भिंतीही त्यांच्या विचारांनी रंगुन गेल्या. अखेर तो दिवस उजाडला व ९ सप्टेंबर १९४२ रोजी कुणासही न सांगता आपल्या आई वडिल व इतर कुटूंबासाठी एक पत्र सोडून ते छोडो भारत आंदोलनात सहभागी होण्यासाठी क्रांतिसुर्य नाना पुरोहीतांच्या नेतृत्वाखाली वाळण खोर्यात दाखल झाले.
छोडो भारत आंदोलनाचे उद्दिष्ट नोकरशाहीचे मनोधैर्य खच्ची करुन संपुर्ण शासन यंत्रणा खिळखिळी करुन इंग्रजांना राज्य करणे अशक्य करुन टाकणे होते. त्याचा एक भाग म्हणुन महाडास एक मोठे बंड उभारण्याचा समाजवादी गटाचा बेत होता. महाडला समांतर शासन योजना स्थापन करण्यासाठी नाना पुरोहितांनी या उपक्रमास साजेशी पुर्वतयारी १० ऑगस्ट १९४२ रोजीच सुरु केली होती. १९३८ पासून ही मंडळी शेतकरी आंदोलनाच्या अग्रणी होती. १९४२ साली नानांनी बिरवाडीस शेतकरी परिषद भरवल्यापासून या आंदोलनास बरीच गती मिळाली. या काळात बराचसा जमिनदार वर्ग हा ब्रिटीश धार्जिणा असल्याने शेतकर्यांच्या होणार्या पिळवणूकीबाबत समाजवाद्यांनी आवाज उठवून सरकारविरोधात जनमत तयार केले होते यासंदर्भात गुप्त प्रचार पत्रकांचिही मदत घेण्यात येत असे.
महाडच्या बंडाचे वारे आता वाहू लागले होते. पुण्यातील दहा जण खडकवासला व भोरच्या संस्थानी भागातून चालत चालत घाट उतरुन कोकणातल्या दुर्गम अशा वाळण खोर्यात दाखल झाले. नानांच्या गुप्त हलचाली चालू असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता मात्र एवढे मोठे आंदोलन आकार घेणार आहे यांची कल्पना कुणासही नव्हती. तथापी पोलिसांनी बिरवाडीवर छापा टाकला मात्र नाना हाती लागले नाहित. पुढे पुण्यात एक बैठक हाली तेथे मोर्च्यासाठी १० सप्टेंबर १९४२ हा दिवस ठरवला गेला. पुण्याहून राष्ट्र सेवा दलाचे निवडक कार्यकर्ते पाठवण्याचे ठरविण्यात आले. चार दिवस आधी बिरवाडी व शेलटोली गावांच्या मध्ये दुर्गम भागात एक छावणी उभारण्यात आली. या ठिकाणी कमलाकर दांडेकर व कार्यकर्ते वस्ती करत मात्र पोलिसांना सुगावा लागल्यावर ते तेथून भुमिगत झाले. पुढे वाळण खोर्यात हि छावणी उभारली गेलि. १ सप्टेंबरच्या काळोख्या रात्री सर्व आंदोलक खोर्यात जमा झाले व डोंगरी भागातून शेलटोलीस गेले. खैरट गावातून पुरोहितांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघुन पहाटे ४ ला नडगावला पोहोचला. नडगावजवळ एक सरकारी कारकुन, मंडल निरिक्षक, बेलिफ व शिपायांना पकडून खादीचा पोशाख चढवून व तिरंगा हाती देऊन मोर्चात सहभागी केले गेले.
समोर तिरंगा, हातात काठ्या अशी सेना शासन यंत्रणा ताब्यात घ्यायला निघाली होती व १८ वर्षिय कमलाकर मोर्चाच्या अग्रस्थानी होता. सेनेने प्रथम महाडचे डाकघर ताब्यात घेतले नंतर मिलीटरी भरती कार्यालयाची तोडफोड केली. इतक्यात ३९ लाठीधारी शिपायांनी सेनेवर लाठीमार सुरु केला मात्र सेनेने त्यांना प्रतिकार करुन पळवून लावले. येथून मोर्चा मंदिराजवळ आला मात्र येथे पोलिसांचा मोठा सशत्र जमाव होता या शिपायांनी माघार न घेतल्यास गोळीबार करु असा इशारा सेनेस दिला मात्र आंदोलनाचा पराभव होता कामा नये हा विचार करुन लहानगे कमलाकर पुढे आले व आपल्या शर्टाची बटने काढून 'मला मारुनच तुम्हाला पुढे जावे लागेल' असे उद्गार काढले. निर्दयी शिपायांनी पुढील विचार न करता गोळीबार सुरु केला व काही गोळ्या कमलाकरांच्या वर्मी लागल्या व ते धारातिर्थी कोसळले, त्यांच्यासोबत सहकारी टेकावले, अर्जुन भोई व वसंत बळवंत दाते हे सुद्धा म्रुत्यूमुखी पडले यामध्ये आंदोलनात सहभागी करुन घेतलेले फौजदारही ठार झाले.
या घटनेनंतर सेनेने ब्रिटीश नोकरदारांवर जोरदार हल्ला चढवून त्यांच्याकडून शस्त्रे हिसकावून घेतली व त्यांना पळवून लावले व पुढे मामलेदार कचेरी ताब्यात घेतली व ब्रिटीशांना शरणागती पत्करावयास लावली. महाडचे बंड अशा रितीने यशस्वी झाले. कमलाकरांची व सहकार्यांची प्राणाहूती सफल झाली. मात्र आपला लाडका कमलाकर गेल्याचा प्रचंड धक्का बसून त्यांचे आई व वडिल तसेच दोन काका दु:खवेगाने मृत्यू पावले व संपुर्ण महाड शहरावर शोककळा पसरली. कमलाकर देशाचे ऋण फेडून अमर झाले. त्यांच्या कार्याचा आदर म्हणुन त्यांचे स्मारक महाड शहरात उभारले गेले आहे जे भावी पिढ्यांना स्फुर्ती देत आजही उभे आहे.