मुंबई विद्यापीठाची माहिती

मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठाकडे स्वतःची अशी इमारत नव्हती. विद्यापीठाचे कार्यालय १८७४ पर्यंत टाऊन हॉलमध्ये होते. - लेखक संभाजी भोसले

मुंबई विद्यापीठाची माहिती

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

पेशवाईच्या इतिश्रीनंतर इंग्रजांनी महाराष्ट्रात शालेय शिक्षण पद्धतीचा प्रसार खेडोपाडी केला. मुंबईचा गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन निवृत्त झाल्यानंतर त्याने केलेल्या शैक्षणिक कार्याचे यथोचित स्मारक व्हावे या उद्देशाने बॉम्बे नेटिव्ह सोसायटीतर्फे २२ ऑगस्ट १८२७ रोजी एक सभा घेऊन एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशनची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी मुंबईत विद्यापीठ असावे असा विचार मांडला गेला. परंतु प्रत्यक्षात विद्यापीठाची स्थापना होण्यास तीस वर्षे लागली.

१८५७ मध्ये कलकत्ता (कोलकाता), मद्रास (चेन्नई) व मुंबई येथे प्रेसिडेन्सी विद्यापीठे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठाकडे स्वतःची अशी इमारत नव्हती. विद्यापीठाचे कार्यालय १८७४ पर्यंत टाऊन हॉलमध्ये होते. सरकारने विद्यापीठाच्या इमारतीकरिता सध्याचे हायकोर्ट असलेली जागा देण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील अनेक मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत २९ डिसेंबर १८६८ मध्ये या जागेत कोनशिला समारंभ पार पडला. या प्रसंगी एका तांब्याच्या पेटीत विद्यापीठाची १८६८-६९ सालची दिनदर्शिका, मुंबईतील तत्कालीन सफर ऐतिहासिक चलनी नाणी व मुंबईतील अनेक प्रतिष्ठितांची नामावली ठेवण्यात येऊन तो पेटी कोनशिलेत ठेवण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या इमारतीचा आराखडा इंग्लंडमधील तत्कालीन प्रसिद्ध वास्तुरचनाकार सर गिल्बर्ट स्कॉट यांनी तयार केलेला आहे. इंग्लंडमध्ये त्यांनी या अद्वितीय इमारतीचा आराखडा बनवला. सिनेट (कान्व्होकेशन) हॉलच्या इमारतीकरिता सर कावसजी जहांगीर यांनी १८६४ मध्ये एक लाखाची देणगी दिली. सरकारने यामध्ये दोन लाखांची भर टाकली. परंतु सर स्कॉट यांनी या इमारतीचा अंदाजी खर्च सहा लक्ष काढल्यामुळे विद्यापीठाच्या कार्यकारिणीने सरकारकडे अनुदान वाढविण्याची मागणी केली. परंतु सरकारने अनुदान वाढविण्यास नकार दिल्यामुळे, इमारतीच्या बांधकामास दिरंगाई झाली. शेवटी सरकारी वास्तुरचनाकारांनी विद्यापीठाच्या इमारतीच्या आराखड्यात अनेक फेरबदल केले. मूळ आराखड्यातील कोरीव काम, शिल्पे व स्तंभांची संख्या याला बऱ्याच अंशी फाटा देण्यात आला.

उत्तरेस हायकोर्ट आणि दक्षिणेस सेक्रेटरीएटची इमारत यांमध्ये विद्यापीठाचे संकुल उभे आहे. १८६९ मध्ये सिनेट हॉल व ग्रंथालयाच्या इमारतींच्या बांधकामास सुरवात झाली. सिनेट हॉलची इमारत पंधराव्या फ्रेंच गॉथिक शैलीतील असून या इमारतीचा दर्शनी भाग चर्चसदृश आहे. या इमारतीचे पोर्च व प्रवेशद्वार प्रमाणबद्ध व सौंदर्यपूर्ण असून इमारतीचा दक्षिणेकडील भाग घुमटाकार आहे. उत्तरेकडे दोन मनोऱ्यांमध्ये गोलाकार जिने आहेत. या जिन्यांच्या बाहेरील बाजूस कडेने अखंड दगडांचे दुहेरी खांब आहेत. मुख्य सिनेट हॉलची लांबी एकशेआठ फूट व रुंदी चव्वेचाळीस फूट आहे. बासष्ट फूट उंचीच्या या हॉलच्या मुख्य खिडकीला लागून भव्य कमान आहे. तसेच तिन्ही बाजूंच्या भिंतीत ओतीव लोखंडी नक्षीदार कठड्यांची गॅलरी आहे. या इमारतीच्या पोर्चवर कठडे असलेली गच्ची असून या हॉलमधील भव्य खिडक्यांमुळे चर्चचा आभास निर्माण होतो. या हॉलमधील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पूर्वेकडील भिंतीत असणारी वीस फूट व्यासाची स्टेनग्लासची भव्य खिडकी आहे. या खिडकीच्या काचांवर बारा राशींची चित्रे चित्रित केलेली आहेत. या खिडकीची रचना पाकळ्यांप्रमाणे आहे. हॉलच्या सभोवताली भिंतीतील स्टेनग्लासच्या खिडक्यांवर मुंबई, स्कॉटलंड, इंग्लंडमधील पारंपरिक शस्त्रास्त्रांची चित्रे काढलेली आहेत. या इमारतीचे छप्पर उत्तम प्रतीच्या कौलांचे आहे. या छपराच्या चारही कोपऱ्यांत लहान मनोरे आहेत. ही इमारत स्थानिक कुर्ला दगडात बांधलेली असून, अंतर्भागातील कमानी, शिल्पे व मुख्य कोरीव काम पोरबंदर दगडात केलेले आहे. येथील स्तंभाकरिता निळ्या बेसॉल्ट दगडांचा वापर केलेला आहे. या इमारतीला एकूण बांधकामखर्च तीन लक्ष ऐंशी हजार रुपये आला. या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर १८७८ मध्ये सर कावसजी जहांगीर यांचा पुतळा बसविण्यात आला. विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा व राजाबाई टॉवरचा आराखडाही सर स्कॉट यांनी तयार केलेला आहे. ऑगस्ट १८६९ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध कॉटनकिंग शेठ प्रेमचंद रायचंद यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या इमारतीकरिता, दोन लाखांची देणगी दिली. १८६९ मध्ये ग्रंथालयाच्या इमारतीच्या बांधकामास सुरवात झाली. जवळजवळ दहा वर्षे हे बांधकाम चालू होते. या इटालियन गॉथिक शैलीतील इमारतीचे बांधकाम रॉयल इंजिनियर्सचे अभियंते लेफ्ट. कर्नल फुलर व त्यांचे सहाय्यक मुकुंद रामचंद्र यांनी केलेले आहे. ग्रंथालयाच्या इमारतीचा दर्शनी भाग समुद्राच्या दिशेने असून पोर्च राजाबाई टॉवरच्या दिशेने पश्चिमेकडील प्रवेशद्वारापर्यंत आहे.

ग्रंथालयाच्या मुख्य हॉलच्या दोन्ही बाजूंस मोठी दालने आहेत. मुख्य हॉलमधे एकमेकींना छेद जाणाऱ्या विलोभनीय खिडक्या आहेत. या खिडक्यांच्या लोखंडी चौकटी लंडन येथून आयात केलेल्या आहेत. या हॉलची तक्तपोशी लाकडाची असून इमारतीचे छत शिखराप्रमाणे आहे. संपूर्ण इमारतीतील शिल्पे, नक्षी पोरबंदरी दगडात कोरलेली आहे. ग्रंथालयाच्या इमारतीस दोन लाख ऐंशी हजार रुपये खर्च आला.

सुरवातीला मुलींना मुंबई विद्यापीठाची परीक्षा देता येत नसे. १८८८ मध्ये मुलींना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. बी. ए. व्या परीक्षेत पहिली महिला पुण्यातील डेक्कन कॉलेजची कॉर्नेलिया सोराबजी ही होती. या विद्यापीठाचे कुलगुरुपद प्रसिद्ध विद्वान डॉ. जॉन विल्सन, काशिनाथ त्रिंबक तेलंग (१८९२-९३). प्राच्यविद्या पंडित डॉ. रामकृष्ण भांडारकर (१८९३-९५) अशा अनेक महान व्यक्तींनी भूषविलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे २१ डिसेंबर १९०५ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते, परंतु राजद्रोहाच्या कारणास्तव त्यांना पदवी नाकारण्यात आली होती.. चोपन्न वर्षांनंतर विद्यापीठाने स्वा. सावरकरांना ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली.

महाराष्ट्रात शैक्षणिक युगाची सुरवात करून उच्च शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा सांगणारे मुंबई विद्यापीठ शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ आहे.

- (सफर ऐतिहासिक मुंबईची : लेखक संभाजी भोसले)