श्री केदारेश्वर मंदिर दांडेघर
पाचगणी-वाई-रस्त्यावर पाचगणीपासून ३ कि.मी. पुढे, उजव्या बाजूला दांडेघर गाव आहे. या गावामध्ये 13 व्या शतकाच्या सुमारास ८०० वर्षापूर्वी बांधलेलं केदारेश्वराचं मंदिर पाहण्यासारखं आहे.
पांचगणी-वाई रोडवरील दांडेघर येथील केदारेश्वर मंदिरात दर्शनाचा योग आला. श्री केदारेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी केदारेश्वराच्या चरणी नतमस्तक होवून सर्वांना सुखी समाधानी ठेवण्याचे मागणे त्याच्याकडे मागितले. केदारेश्वराचा आशिर्वाद पाठीशी कायम रहावा अशी मनोकामना केदारेश्वरा जवळ केली.
पाचगणी-वाई-रस्त्यावर पाचगणीपासून ३ कि.मी. पुढे, उजव्या बाजूला दांडेघर गाव आहे. या गावामध्ये 13 व्या शतकाच्या सुमारास ८०० वर्षापूर्वी बांधलेलं केदारेश्वराचं मंदिर पाहण्यासारखं आहे.
श्री केदारेश्वर मंदिर हे चारही बाजूने बंदिस्त आहे.बाहेरून बघितल्यास एखाद्या गढी सारखे वाटते.आत मंदिरात एकूण तीन प्रवेशद्वार आहेत. गावाच्या मध्यभागी पण जमिनीपेक्षा खाली बांधलेलं, हेमाडपंती मंदिर पाहताना काहीतरी वेगळं पाहिल्याचा आनंद मिळतो. रस्त्यावरून 15-20 पायऱ्या उतरल्यावर मंदिराचे आवार आहे. याच्या दर्शनी भागावर, वरच्या बाजूने पत्रे घालून, त्याखाली पूजेच्या साहित्याची काही दुकाने मांडलेली आहेत. मागच्या बाजूला, मंदिरापासून वेगळा, नंदीमंडप आहे. यामध्ये पितळी पत्र्याने मढविलेल्या नंदीची, मीटरभर उंचीची मूर्ती आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला, यात्रेकरूंना उतरण्यासाठी ओवया बांधलेल्या आहेत. मंदिराच्या बाजूने फिरताना काही ठिकाणी जमिनीवर मूर्ती कोरलेल्या आहेत. कालौघात नष्ट झालेल्या या मूर्तीचं आज फक्त अस्तित्व जाणवतं. मंदिरामागे एक कुंड आहे. त्यात मंदिरातून येणाऱ्या पाण्याची संततधार गोमुखातून पडते. या कुंडाच्या डाव्या-उजव्या बाजूला छोटेखानी एक-एक मंदिर आहे. त्यात काही वीरगळ शिल्पं ठेवलेली दिसतात.
केदारेश्वराचं मंदिर आवाराच्या मध्यभागी असून त्याला मोठा सभामंडप आहे. त्यातील खांबावर फारसे कोरीवकाम नाही. मंडपात डाव्या बाजूला शिवलिंगावर ठेवले जाणारे शाळुका आणि नाग यांचे, तांब्यांचे मुखवटे आहेत. हा मंडप आवारातील जमिनीपासून एक पायरी खाली आहे. गाभाराही मंडपापेक्षा थोडा खाली आहे. यामध्ये मोठं शिवलिंग असून त्यावरील शाळुका ओबड-धोबड आहे. त्यामधून सतत पाणी येत असतं. हेच पाणी, वाट काढून बाहेर कुंडामध्ये सोडलेलं आहे. या मंदिरात केदारेश्वर देव, माता पार्वती, गणपती, कडेश्वरी, भैरवनाथ, दाजीबुवा अशा २२ मूर्त्या आहेत. या ठिकाणीही इतर मंदिरांप्रमाणे आतून-बाहेरून रंग चढविलेला आहे. हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असल्याने उंचीने लहान आहे त्यात थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे मंदिरात थंडावा मोठ्या प्रमाणात आहे.मंदिराच्या बाजूने गणपती, हनुमान आणि देवी देवतांची छोटेखानी मंदिरे आहेत. साताऱ्यामधील कर्मयोगी ह.भ.प.दत्तात्रय महाराज कळंबे यांचे मंदिरात स्मारक आहे. श्री केदारेश्वर दांडेघर गावाचे ग्रामदैवत तसेच काहींचे कुलदैवत असल्याने डिसेंबर महिन्यात यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. दांडेघर गाव हे पाचगणीपासून वाईकडे जाताना ३ कि.मी आहे. आपण जर कधी महाबळेश्वर-पाचगणीला गेलात तर जवळ असणारं हे मंदिर निश्चित पाहता येईल.
- वैभव साबळे (माणगाव रायगड)