श्री पंचमुखी गायत्री व पोवळ्या गणपती मंदिर - गोरेगांव

पंचमुखी गायत्री मंदिरासमोर राज्यातील एकमेव असे पोवळ्या गणपतीचे जागृत देवस्थान आहे.

श्री पंचमुखी गायत्री व पोवळ्या गणपती मंदिर - गोरेगांव
श्री पंचमुखी गायत्री व पोवळ्या गणपती मंदिर

कोकणातील एक प्राचीन व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील गोरेगाव मधील श्री अमृतेश्वरी पंचमुखी गायत्री मंदिर सुप्रसिद्ध आहे.

या मंदिराची स्थापना १९०४ साली गोविंद लक्ष्‍मण शास्त्री रानडे यांनी केली. 

आकाराने भव्य अशा या मंदिराच्या बाह्यभागाचा जीर्णोद्धार झाला असला तरी अंतर्भागातील लाकडी सभामंडप आजही मूळ मंदिराची रचना जपून आहे.

मंदिराच्या गर्भगृहात पंचमुखी गायत्री देवीची मूर्ती आहे. 

देवीची मूर्ती संगमरवरी पाषाणात घडविलेली असून मूर्तीच्या बाजूस संगमरवरी शिवलिंग आहे. 

शंभर वर्षांहून जुने असे हेजागृत देवस्थान गोरेगाव वासियांचे श्रद्धास्थान आहे.

पंचमुखी गायत्री मंदिरासमोर राज्यातील एकमेव असे पोवळ्या गणपतीचे जागृत देवस्थान आहे.

या मंदिरातील गणेशमूर्ती ही पोवळे या रत्नापासून बनवली गेली असून ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. 

पोवळ्यास प्रवाळ या नावाने सुद्धा ओळखले जात असून संस्कृत भाषेत पोवळ्यास विद्रुम, हिंदीमध्ये मुंगा तर इंग्रजीमध्ये रेड कोरल या नावाने ओळखले जाते. 

पोवळ्या गणेशाची स्थापना सुद्धा गोविंद लक्ष्मणशास्त्री रानडे यांनी १९०४ साली केली. 

पोवळ्या गणेशाची मूर्ती गायत्रीदेवी मंदिरासमोर असलेल्या दीपमाळेच्या पायथ्याशी स्थानापन्न असून मूर्ती व दीपमाळ यांचे भोवती एक छोटेखानी मंदिर बांधण्यात आले आहे. 

या दीपमाळेवर कोरलेल्या लेखावरून सदर दीपमाळेची निर्मिती १९०९ साली करण्यात आल्याचे समजते.

वैशाख पौर्णिमेस पोवळ्या  गणपतीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. 

गोरेगाव वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या या गणपतीची नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असून त्याच्या दर्शनास राज्याच्या विविध भागातून भाविक येत असतात.