रायरेश्वर महादेव मंदिर - स्वराज्याच्या शपथविधीचे स्थळ

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यनिर्मितीचा शपथविधी ज्या देवतेच्या साक्षीने केला त्या रायरेश्वराचे हे ऐतिहासिक मंदिर. रायरेश्वर हे पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात असून समुद्रसपाटीपासून १३३६ मीटर उंचीवर आहे.

रायरेश्वर महादेव मंदिर - स्वराज्याच्या शपथविधीचे स्थळ
रायरेश्वर महादेव मंदिर

रायरेश्वराचा शंभू महादेव हा स्वयंभू असून हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी येथेच स्वराज्याची शपथ आपल्या सहकाऱ्यांसोबत घेतली होती. 

रायरेश्वरास पूर्वी रोहिरेश्वर या नावाने सुद्धा ओळखले जात असे. १६४२ साली दादाजी नरस प्रभू यांनी एक गाव रायरेश्वर मंदिरास पूजेसाठी नेमून दिले होते व तेथे पुजारीही नेमला होता मात्र आदिलशहास ही बातमी समजल्यावर आपल्या फतव्याविरोधात ही गोष्ट झाल्याचा राग येऊन त्याने तेथील शहाजी महाराजांचे मुतालिक दादोजी कोंडदेव यांना बडतर्फ केले व त्यांच्या जागी घोरपडे यांना सुभेदारी दिली. पुढे आदिलशाह व शहाजी महाराज यांच्यात समेट झाल्यावर दादोजी कोंडदेव यांना पुन्हा एकदा कोंडाण्याची सुभेदारी प्राप्त झाली. 

यावेळी मावळ प्रांताचे प्रमुख देशमुख असलेले कान्होजी जेधे यांना शहाजी महाराजांनी शिवाजी राजांसोबत बंगरुळ हुन पाठवले होते. कान्होजी जेधे हे बाजी पासलकर यांचे जावई त्यामुळे शिवाजी महाराजांची अगदी सुरुवातीस साथ देणाऱ्यांमध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर व त्यांचे बालपणीचे सवंगडी तानाजी मालुसरे हे होते. 

हळूहळू प्रांतातील मावळे शिवरायांच्या छत्राखाली एकत्र येऊ लागले. पावसाळ्यात चार महिने शेती करणारे मावळे पावसाळा झाल्यावर स्वराज्य निर्माणार्थ शस्त्रे हाती घेऊ लागले. या कार्यात शिवाजी महाराजांना व मावळ्यांना राजमाता जिजाऊंचे आशीर्वाद होते. बघता बघता हजार बाराशे मावळे तयार झाले व स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेचा बेत तयार झाला व तो होता रोहीड खोरे नावाचे मावळ स्वराज्यात सामील करून घेण्याचा.

यावेळी रोहिड खोऱ्याचे अधिकारी दादाजी नरस प्रभू शिवरायांना अनुकूल झाले व स्वराज्याच्या संकल्पाची सुरुवात रोहीडखोऱ्याचे दैवत असलेल्या रायरेश्वराच्या साक्षीने घेण्यासाठी शिवरायांच्या नेतृत्वात सर्व मावळे रायरेश्वराच्या दिशेने हातात ढाल तलवारी घेऊन हर हर महादेव असा जयघोष करीत चालू लागले. सोबत येसाजी कंक, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, दादाजी नरस प्रभू हे शिवरायांचे निष्ठावंत शिलेदार होते. 

सर्व मावळ्यांना घेऊन महाराजांनी रायरेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला व रायरेश्वराच्या साक्षीने सर्वांनी स्वराज्यनिर्मितीचा अभूतपूर्व संकल्प केला व ते वर्ष होते १६४५. आदिलशाही जोखडातून महाराष्ट्राचा हा भाग मुक्त करण्याचा दृढनिश्चय शिवरायांनी समस्त मावळ्यांच्या साथीने व रायरेश्वराच्या साक्षीने केल्यावर सर्व मावळ प्रांतात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुढे शिवाजी महाराजांनी राजगड हा किल्ला नव्याने बांधण्याची सुरुवात केली व ही बाब आदिलशहाच्या कानावर पडली. दादाजी नरस प्रभू देशपांडे यांच्याकडे रोहीडखोरे व वेळवंडखोरे या मावळांचे कुलकर्ण पद असल्याने आदिलशहाने त्याना पत्राद्वारे तंबी दिली त्यामुळे दादाजी यांचे वडील नरसोबा चिंताक्रांत झाले.

दादाजी यांनी सदर घटना शिवरायांचे कानावर घातली असता शिवरायांनी दादाजी यांना सांगितले की,

तुम्हास मेहेरबान वजिराचा विजापूरहून हुकूम आला तो ठाणे शिरवळ वरून अमीननी तुम्हाकडे पाठवला. त्याजवरून तुमचे वडील नरसीबाबा हवालदिल झाले असे समजले. त्यास शाहासी बेईमानी तुम्ही व आम्ही करीत नाही. श्री रोहिरेश्वर (रायरेश्वर) तुमचे खोऱ्यातील आदिकुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनांत फार आहे त्याप्रमाणे नरसी बाबांचे मनाची खात्री करून तुम्ही येणे. बहुत काय लिहिणे.

हे पत्र लिहून महाराजांनी आपला मनोरथ व्यक्त केला व लगेचच तोरणा या बळकट किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले. अशाप्रकारे रायरेश्वराच्या शपथेने सुरु झालेला स्वराज्याचा महारथ बलाढ्य शत्रुंना धूळ चारत विजयश्री मिळवत चालतच राहिला.

रायरेश्वर पठाराचा विस्तार १६ किलोमीटर लांब असून रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात सर्वोच्च टेकडीच्या माथ्यावरून चौफेर नजर टाकल्यास उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर, प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड हे किल्ले दिसू शकतात. रायरेश्वर येथील आणखी एक आश्चर्य म्हणजे येथे आढळणारी विविध रंगांची माती. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी अनेक पर्यटक व अभ्यासक येथे भेट देत असतात.

रायरेश्वराचे मंदिर हे पांडवकालीन असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते व मंदिराच्या स्थापत्यावरूनही हे मंदिर प्राचीन असल्याचे लक्षात येते. मंदिराच्या गाभाऱ्यात रायरेश्वराचे स्वयंभू लिंग असून समोरच्या भिंतीवर स्वराज्याच्या शपथविधीचा प्रसंग चित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. रायरेश्वर मंदिराव्यतिरिक्त येथील जननी देवीचे मंदिर, पांडवकालीन लेणी, गोमुखकूंड, अस्वलखिंड (नाकिंदा) व पाण्याची शिवकालीन टाकी ही स्थळे सुद्धा आवर्जून पाहण्यासारखी आहेत. शिवरायांनी स्वराज्याच्या महायज्ञाची सुरुवात जेथून केली होती ते रायरेश्वर पाहणे प्रत्येक शिवप्रेमीस अगत्याचे आहे.