लकुलिश मंदिर पावागढ

चंपानेर पावागढ हे गुजराथमधलं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेलं ठिकाण. पावागडच्या डोंगरावर रोप वे वरून गेल्यावर उजवीकडे एका तळ्याकाठी दिसते पडझड झालेले लकुलिश मंदिर.

लकुलिश मंदिर पावागढ

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

शैव पंथात पाशुपत संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणारे लकुलिश हे गुजराथ मधलेच. लकुलीशाला शिवाचा अवतार समजले गेले आहे. लकुलिशाचा काळ इ.स.चे १ ले शतक समजले जाते. पावागढच्या डोंगरावर लकुलिशाचे मंदिर आहे. एका बाजूला, पडझड झालेले पण अतिशय सुंदर, अप्रतिम आणि देखण्या मूर्ति या मंदिरावर बघायला मिळतात.

सूर्य, अंधकासुरवध, शिवपार्वती कल्याणसुंदर या आणि विविध मूर्तींनी हे मंदिर मढलेले आहे. ऊन-वारा-पाऊस आणि माणसाचे दुर्लक्ष यामुळे अनेक मूर्तींची झीज झाली असली तरी त्यांचे सौंदर्य त्या पडझडीतही दिसून येते. मंदिराच्या ललाटावर लकुलीशाची मूर्ति आहे. हे मंदिर इ.स. च्या १० व्या शतकातले असल्याचे सांगतात. मंदिराचे शिखरसुद्धा पडलेले आहे. समृद्ध अशा पाशुपत पंथाच्या प्रवर्तकाचे हे दुर्लक्षित मंदिर नक्की पाहण्याजोगे आहे.

मूर्तिभंजकांनी या मंदिराकडे जितके लक्ष दिले त्याच्या १० टक्के लक्ष जरी मूर्तिप्रेमींनी दिले तरी एक सुंदर ऐतिहासिक ठेवा गवसल्याचा आनंद होईल. देखण्या सुडौल मूर्तींनी मढलेले हे लकुलिश मंदिर पावागडला जाऊन मुद्दाम पाहावे असे आहे.

- आशुतोष बापट