वीरदेवपाटचा श्री लक्ष्मीमल्लमर्दन

शिल्पसमृद्ध कोकणात आपण विष्णू, महिषासुरमर्दिनी, सूर्य, कार्तिकेय अशा देवदेवतांच्या मूर्ती बघतो. त्यातही विष्णूमूर्तींची संख्या जास्त वाटते. पण कोकण हा खरंच एक मोठा खजिना आहे. जितके आपण शोधत जाऊ तितक्या एक से एक गोष्टी इथे सापडतात.

वीरदेवपाटचा श्री लक्ष्मीमल्लमर्दन

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

विविध देवता आणि त्यांच्या मूर्तींच्या बाबतीत सुद्धा असेच म्हणावे लागेल. आता हेच बघा ना. कृष्णाची मूर्ती म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर देहुडा पावली उभा असलेला, बासरी वाजवणारा, डोक्यात मोरपीस खोचलेला असा देव उभा राहतो. पण आपण आता जे कोकणातले कृष्णाचे रूप बघणार आहोत ते सर्वथैव निराळे आहे. हा कृष्ण आहे राक्षसांचे निर्दालन करणारा. त्यांना मारणारा म्हणून याचे नाव पडले मल्लमर्दन. या मागे एक पौराणिक कथा आहे. कंसाने कृष्णाला मारण्यासाठी चाणूर वगैरे जे आठ मल्ल पाठवले त्या सगळ्या मल्लांना एकावेळी मारणारा असा हा कृष्ण आहे.

हे गाव आहे चिपळूण तालुक्यातील वीर. चिपळूण-सावर्डे-वहाळ-शिरंबे अशा मार्गाने आपण वीर गावात येऊन पोचतो. गावात मल्लमर्दन बस थांबा आहे. तिथून आत १०० मीटर चालत गेल्यावर डावीकडे खालच्या भागात मंदिर दिसते. कौलारू सभामंडप आणि उंच गाभारा यामुळे हे मंदिर उठून दिसते. हे वीर गाव अत्यंत निर्सगरम्य ठिकाणी, डोंगराच्या ऐन मध्यात वसले असून या मंदिराच्या चारही बाजूने उंच डोंगर आहेत. आंबा, काजू, फणस अशा झाडांमुळे ह्या सर्व परिसरात फिरताना आपण जणू नंदनवनात फिरत आहोत असे वाटते. डोंगरावरून वहात येणारे पाण्याचे ओहोळ पाहताना मन प्रसन्न होते. मंदिराच्या जवळच खळाळत वाहणारा प्रवाह आणि तीन कुंडे आहेत.

मंदिराच्या गाभाऱ्यात एका चौथऱ्यावर अंदाजे ६ फूट उंच, आणि ६ फूट रुंद असा मोठा पाषाणखंड आहे. यावर मधोमध श्रीकृष्ण व त्याच्या सभोवती गोलाकार रचनेत ८ मल्ल दाखवलेले आहेत अशी ही मूर्ती. कंसाला मारायच्या आधी कृष्णाने अनेक मल्लांना मारले म्हणून तो मल्लमर्दन झाला. हे आठही मल्ल त्याच्याभोवती फेर धरल्यासारखे दाखवले आहेत. ही मूर्ती दुर्मिळच म्हणायला हवी. कृष्णाचे असे स्वरूप इतरत्र कुठे दिसत नाही. देवाच्या डावीकडे खाली हात जोडलेला गरुड दाखवला असून उजवीकडे खाली हातात नांगर धरलेला बलराम आहे. कंसाला मारायला हे दोघे भाऊ बरोबरच गेले असल्याचे इथे शिल्पकाराने खूप सुंदर शिल्पांकित केलेले दिसते. मूर्तीच्या मागे एक प्रभावळ असून त्याच्या माथ्यावर मकर तोरण आहे. त्या तोरणात विष्णू-लक्ष्मीची मूर्ती आहे. आता ही मूर्ती खूपच झिजली आहे. प्रभावळीत लक्ष्मीचे शिल्पांकन असल्यामुळे या देवाला ‘लक्ष्मी मल्लीमर्दन’ असे नाव पडले. हे शिल्प आत्ता खूपच झिजलेल्या स्थितीत आहे. अभ्यासकांच्या मते ही मूर्ती इ.स.च्या १२-१३ व्या शतकातील म्हणजे शिलाहार काळातील असावी.

वीरकरांच्या देवपाटकर घराण्यातील कोणा पुरुषाला, मी वीर येथील खाडीत पडलो आहे. तेथून मला काढ व देऊळ बांध असा दृष्टान्त लक्ष्मीमल्लमर्दनाने दिला. त्याप्रमाणे त्या गृहस्थांनी ही मूर्ती खाडीतून काढून आणली व तिची स्थापना केली. ती जागा आत्ता जिथे देऊळ आहे तिथून काहीशा उंचावर डोंगरात होती. त्यानंतर काही काळाने गावातील लोकांना दृष्टान्त झाला. “याठिकाणी दरड कोसळणार आहे त्यामुळे मला इथून हलवा” असे या देवाने स्वप्नात येऊन सांगितले. म्हणून त्यावेळच्या लोकांनी त्या ठिकाणाहून मूर्ती हलविली व सध्याचे ठिकाणी आणली. इथून ती मूर्ती पुढे हालेना म्हणून इथेच एक लहान देऊळ बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. काही दिवसातच जुन्या मंदिराच्या जागेवर दरड कोसळली आणि ते मंदिर त्याखाली गाडले गेले. सध्याच्या या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे.

पेशवाईपासून या मंदिराला २५ रुपये वर्षासन आहे. त्याबद्दलची एक सनददेखील आहे. सध्या या मूर्तीला वज्रलेप करत असून मूर्तीला परत सुबक रूप देण्याचा प्रयत्न सुरु आहे. रमणीय असे हे गाव डोंगराचे मध्यावर वसले आहे. डोंगराच्या पायथ्याशी खाडी आहे. गावात सतत वाहणारे भरपूर पाणी आहे. येथे रत्नेश्वर, केदार, वाघजाई, नवलाई, सोमेश्वर, वरदान, मानाई या देवतांच्या पालख्या असतात. वरदान देवीचे जवळच एक पाषाण असून याला चंद्रराव मोरे यांचा वस म्हणतात. येथील मोरे यांनाच पुढे आदिलशाहीचे काळात जावळी भाग इनाम मिळाला व चंद्रराव हा किताब मिळाला. या मोऱ्यांची स्मृती म्हणून इथे हा पाषाण वसवला असावा.

निसर्गरम्य वीर गाव असा आडवाटेच्या कोकणात दडलेला आहे. रमणीय असे हे स्थान पर्यटनाच्या नकाशावर येऊ पहाते आहे. कोकणात अशी बरीच रत्ने दडलेली आहेत. अनेकवार कोकणवारी करूनही केव्हातरी अकस्मात असे काही नवीन गवसते तेव्हा आश्चर्यचकित व्हायला होते.

- आशुतोष बापट