माळढोक - एक संरक्षित पक्षी

सुमारे एक मिटर उंचीचा माळढोक पक्षी हा मोठा रुबाबदार पक्षी आहे. जवळ जवळ छोट्या शहामृगाच्या आकाराचा हा पक्षी वजनदार असतो.

माळढोक - एक संरक्षित पक्षी
माळढोक

माळढोक नराचे वजन १० किलो तर मादीचे ५ किलो असते. बाजूने काळे असलेले त्याचे बदामी रंगाचे पंख, डोक्यावार असलेला काळा मुकूटासारखा तुरा, लांब पांढरी मान व तशाच रंगाचे शरिराच्या खालच्या बाजूचा भाग अशी त्याची शरीर रचना असते.

मादी नराहून लहान असते व नर हा अधिक रुपवान असतो. माळढोकला चांगले उडता येते मात्र उडण्यासाठी त्यास १५-२० फुट पळत जावे लागते व नंतर तो आकाशात झेप घेतो, पण तो खुप उंचावरुन उडत नाही.

मादी एकावेळी एकच अंडे देते. महिन्याभरात अंड्यातून पिल्लू बाहेर पडते, त्याला उडता यायला पाच महिने लागतात. एका वर्षात त्याची संपुर्ण वाढ होते. मात्र मादी एका वेळी एकच अंडे देत असल्याने या पक्ष्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढत नाही. घार, गरुड सारखे शिकारी पक्षी, मंगूस, घोरपड, साप हे प्राणी अंडी खातात तसेच गुरांच्या पायाखाली ही अंडी तुडवली जातात.

हा पक्षी दोन्ही प्रकारचा आहार घेतो. करवंद, बोर, तुरे तसेच मांसाहारामध्ये किटक, अळ्या, टोळ, पाली, उंदीर, लहान साप हे त्याचे प्रमुख अन्न आहे. माळढोक हा खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचा मित्र आहे. तो थव्याने वास्तव्य करतो. माळढोकच्या जगात एकूण २२ उपजाती आहेत. यातील भारतात आढळणार्‍या तिन उपजाती म्हणजे मोठा माळढोक, तणमोर व बंगाली तणमोर या आहेत. हा सारंग कुळातला पक्षी आहे.

एकेकाळी बंगाल, आसाम व म्हैसुरचा दक्षिण भाग वगळता भरतात सर्वत्र ते आढळत मात्र आता ते राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रातील अहमदनगर तसेच सोलापूर जिल्ह्याती रुक्ष व सौम्य भागात दिसून येतात.

माळढोकच्या राहण्याच्या ठिकाणाचा नाश, मांसासाठी केली गेलेली शिकार यामुळे ते आता दुर्मिळ झाले आहेत. काही वर्षापूर्वी भारत सरकारच्या वन्यप्राणी संघाने त्याचा दुर्मिळ पक्ष्यांच्या यादीत समावेश केला. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गाला लागला मग १९७९ साली अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात काही चौ.कि.मी. वनक्षेत्रात माळढोक पक्षी अभयारण्याची स्थापना करण्यात आली. आज येथे माळढोक सुरक्षीत आहेत.