समुद्री कासवांचे संवर्धन

महाराष्ट्राच्या सर्वच किनाऱ्यांवर छोट्या आकाराच्या ऑलिव्ह रिडले कासवांचे दरवर्षी आगमन होते. ही कासवे २ ते २.५ फूट आकाराची, ३६-४९ किलो वजनाची असतात.

समुद्री कासवांचे संवर्धन

डिसेंबर ते फेब्रुवारी हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो आणि साधारण ५० ते १०० वर्षे इतके त्यांचे आयुष्य असते. ही कासवे स्थलांतर करणारी असतात मात्र प्रजनन काळात मादी कासव आपला जन्म जिथे झाला त्या किनारी येते, १-१.५ फूट लांबीचा खड्डा खणून त्यात १००-१५० अंडी देते. या अंड्यांतुन जी अंडी मानवी तस्कर, कोल्हा, कुत्रा असे प्राणी आणि समुद्री लाटा इत्यादींपासून वाचतात त्यातील १% पिल्ले जगतात. म्हणजे १०० कासवातील एकच जगण्यासाठी तंदुरुस्त निघते. 

भाऊ काटदरेंनी या कासवाच्या जातीचे महत्त्व विषद करताना सांगितले की ही कासवे समुद्र स्वच्छ करतात कारण मृत मासे, समुद्री गवत हे त्यांचे अन्न असते. स्वच्छ समुद्रात माशांची पैदास अधिक होते. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कासवांची मोठ्या प्रमाणावर हानी होत होती. कासवांची अंडी रात्री चोरणे, ती खाणे अथवा विकणे, कासवांना त्रास देणे असे प्रकार सुरु होते. मात्र २००३ साली वेळासला कासव संवर्धन सुरु झाल्यापासून येथील चित्र पालटले. 

श्री. भाऊ काटदरेंनी शून्यापासून सुरवात करून कासवांची अंडी नेमकी का पळवली जातात याचा अभ्यास केला. कासवांचे अंडी घालून सरपटत जातानाचे मार्ग पाहून ती अंडी खड्ड्यातून काढून हॅचरी मध्ये म्हणजे प्रजनन केंद्रामध्ये कुंपण घालून सुरक्षित ठेवली. ऑलीव्ह रिडले कासवांना परिशिष्ट १ चे संरक्षण आहे म्हणजेच कासव पकडणे हा वाघ पकडण्याइतका गंभीर गुन्हा आहे. श्री. भाऊ काटदरेंनी मात्र कायद्याचा धाक न दाखवता बक्षिसाची थाप देण्याचा मार्ग निवडला. कासव संवर्धनातून रोजगार निर्मिती होऊ शकते हे स्थानिकांना पटवून दिले. कासवांची पाहणी, हॅचरीचे नियोजन, अंड्यांचे संरक्षण असे नवे रोजगार मिळवून देणारे आणि संवर्धन करणारे उपक्रम सुरु केले. यासाठी आधी वन विभागाची आणि मग वैयक्तिक प्रायोजकांची मदत घेतली. या प्रायोजकांना व अन्य पर्यावरणप्रेमी अशा १५६ लोकांना उपक्रमाची स्थिती दाखवण्यासाठी २००६ साली अवघ्या दोन होमस्टेजची व्यवस्था करून बोलावले गेले आणि तिथून कासव महोत्सवाची सुरवात झाली. 

नंतर होमस्टेज हा रोजगाराचा नवीन मार्ग खुला झाला आणि आता दरवर्षी जगभरातून १००० लोक वेळास मधील या महोत्सवाला हजेरी लावतात. वेळास येथील ५५ घरे होमस्टेज म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी पर्यायाअभावी कासवाची अंडी चोरणारे अनेक जण आज त्याच अंड्याच्या संवर्धनाचे काम करत आहेत. या उपक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे वन विभाग, एमटीडीसी आणि पर्यटन संचालनालयाच्या मदतीने आकाराला आलेला वेळास व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील एकूण ८० गावांत राबवला गेलेला हा उपक्रम पूर्णपणे पर्यावरणस्नेही आहे. 

कंट्रोल्ड आणि डिसीप्लिन्ड पर्यटन म्हणजे नियंत्रित आणि शिस्तबद्ध पर्यटन येथे केले जाते. कोणत्याही प्रकारे कासवांच्या नैसर्गिक क्रमाला धक्का पोहचवला जात नाही. जेव्हा कासवांच्या प्रजननाचा काळ नसतो तेव्हा अन्य निसर्गाने संपन्न पर्यटनाची ठिकाणे, कोकणचा रानमेवा अशी पर्यटन आकर्षणे पर्यटकांच्या स्वागताला हजर असतात. होमस्टेजमध्ये राहून अगदी स्थानिकांसारखे राहण्याचा पर्याय शाश्वत पर्यटनाविषयी जागरूक असलेले पर्यटक आनंदाने पसंत करतात. 

कासवांखेरीज पक्षी, फुलपाखरे, झाडांच्या अनेक प्रजाती पाहायला लोक उत्सुक असतात. सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांनी या उपक्रमाला प्रचंड पाठबळ दिले. या अत्यंत माहितीपूर्ण आणि शाश्वत पर्यटन विकासाची आधुनिक, सहिष्णू दिशा दाखवणाऱ्या वेबिनारच्या शेवटी ‘निसर्ग टूर्स’ चे व्यवस्थापक श्री. संजय नाईक यांनी श्री. भाऊ काटदरेंच्या संवर्धनातून रोजगार निर्मिती या कल्पनेचे कौतुक केले. श्री. हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन) प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई यांनी भाऊ काटदरेंच्या या वेबिनारविषयी असे मत व्यक्त केले की, “रम्य निसर्ग आणि होमस्टेजची ही पर्यटनाची संकल्पना स्तुत्य असून होमस्टेजना पर्यटन विभागातर्फे मदत करायचा आम्ही प्रयत्न करू. शिवाय कासव महोत्सवाच्या धर्तीवर वेळास- आंजर्ले महोत्सव आयोजित करण्याचा पर्यटन विभागाचा विचार आहे, जेणेकरून केवळ कासवांपुरते पर्यटन मर्यादित न राहता त्या गावाच्या सर्व बलस्थानांचा शाश्वत पर्यटनासाठी उपयोग होईल. कोकणातील गावांचा पर्यटनाद्वारे विकास होऊ शकतो याचे आदर्श उदाहरण श्री. भाऊ काटदरे यांनी जगाला दिले आहे.”