वाघ - भारताचा राष्ट्रीय पशु

वाघाचे नाव ऐकताच अंगावर काटा येतो नाही का? अतिशय बलवान परभक्षी असलेला वाघ हा मार्जार या सस्तन प्राण्यांच्या प्रवर्गातील सर्वात मोठा प्राणी आहे.

वाघ - भारताचा राष्ट्रीय पशु

वाघाची सरासरी लांबी साडेचार फूटापासून साडेनऊ फुटापर्यंत लांब असते आणि वजन २०० ते ६०० पौंड इतके असते. याचा रंग मु़ख्यतः नारंगी असून संपूर्ण शरीरावर काळ्या रंगाचे पट्टे असतात तसेच छाती, चेहरा व आतल्या बाजूस काहीसा पांढरा रंग दिसून येतो. आजतागायत वाघाच्या आठ उपजातींची नोंद करण्यात आली आहे.

मात्र यांतील तीन जातींचे वाघ अवैध शिकारीमुळे साल १९५० पासून नजरेस पडलेलेच नाहीत. या बेपत्ता जातींमध्ये कॅस्पीयन, बाली व यावान वाघांचा समावेश आहे. उर्वरित पाच जातींची परिस्थीती सुद्धा यापेक्षा फार काही वेगळी नाही. या उर्वरीत जातींमध्ये सायबेरीयन, बंगाल, इंडो-चायनीज, दक्षिणी चीन व सुमात्रीयन वाघांचा समावेश आहे.

एकेकाळी पश्चिमी-पूर्व तुर्कस्तानापर्यंत वाघ आढळत असे मात्र गेल्या काही काळात वाघाचे अस्तित्व हे ठरावीक आशियाई क्षेत्रापर्यंत मर्यादित राहीले आहे. चामड्यासाठी शोभेच्या वस्तूंसाठी तसेच हौसेखातर केली जाणारी शिकार, जंगलांचे कमी होत चाललेले प्रमाण, नैसर्गीक अन्नस्त्रोताचे कमी होणारे प्रमाण ही कारणे त्यामागे आहेत.

वाघ हा एकटा राहणारा प्राणी असून मुख्यतः रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतो. त्याच्या प्रमुख भक्ष्यांमध्ये हरण तसेच इतर पशू, मगरी, वानरे, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे इत्यादींचा समावेश होतो. वाघ हा सडलेले मांस सुद्धा भक्षण करतो इतकेच नाही तर पचन नीट होण्यासाठी औषध म्हणून तो कधीकधी गवत खातानासुद्धा आढळला आहे.

सध्या वाघांच्या संख्येतली वाढती घट पहाता. अनेक राष्ट्रांनी 'सेव्ह टायगर्स' मोहीमा सुरु केलेल्या दिसून येतात. आपल्या भारतामध्येच अनेक वाघ्र्यप्रकल्प सुरु करुन वाघांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेल्या या प्राण्याच्या संवर्धनाची तसेच संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकानेच उचलायला हवी तरच हा देखणा आणि साहसाचे प्रतिक असलेला प्राणी वाचण्यास मदत होईल अन्यथा येणार्‍या पिढीस आपल्या भारताचा राष्ट्रीय  प्राणी वाघ कसा होता? हे पुस्तकांतूनच वाचण्याची पाळी येईल.