नागोठणे - इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे शहर

रायगड जिल्ह्यास फार पुरातन असा ऐतिहासिक वारसा आहे या जिल्ह्यातली प्रत्येक गावे, मंदिरे, लेण्या, किल्ले, स्थळे इतिहासाला जपणारे फार मोठे पुरावे आहेत. मात्र या स्थळांच्या गर्भात शिरुन इतिहासास बोलते केले पाहिजे तरच मानवाला अजुनही न सापडलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टींचा गुंता उकलला जाईल.

नागोठणे - इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे शहर
नागोठणे

रायगड जिल्ह्यास फार पुरातन असा ऐतिहासिक वारसा आहे या जिल्ह्यातली प्रत्येक गावे, मंदिरे, लेण्या, किल्ले, स्थळे इतिहासाला जपणारे फार मोठे पुरावे आहेत. मात्र या स्थळांच्या गर्भात शिरुन इतिहासास बोलते केले पाहिजे तरच मानवाला अजुनही न सापडलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टींचा गुंता उकलला जाईल. यासाठी आपण नागोठणे या गावाचे उदाहरण घेऊ, भौगोलिक दृष्ट्या नागोठण्याचे स्थान महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतातल्या रायगड जिल्ह्यात येते. रायगड जिल्ह्याचे भौगोलिक दृष्ट्या दोन भाग पडतात ज्यास उत्तर रायगड व दक्षिण रायगड असे म्हटले जाते. मात्र नागोठणे हे उत्तर रायगड आणि दक्षिण रायगड यांच्या बरोबर मध्यभागी वसले आहे. नागोठण्याच्या पश्चिमेकडून अंबा नदी वाहते. अंबा नदी लोणावळ्याच्या दक्षिणेकडे आंबवणे येथे उगम पावते आणि नैऋत्येस ४८ कि.मी. वाहत जाते. पालीच्या दक्षिणेस रोहा तालुक्यातल्या वझरोली गावाखाली दिशा बदलून वायव्येस वाहते. नागोठण्यापासून पुढे नदीच्या खोर्‍याचा तळ रुंद होतोत व नदी सपाट माथा असलेल्या डोंगरांगांमधून धरमतर खाडीला मिळते यामुळे परिसरात दलदलीचा मोठा प्रदेश तयार झाला आहे. अंबा नदी धरमतर खाडीस जाऊन मिळते. अंबा नदीच्या प्रवाहाचे दोन भाग आहेत. भरती ओहोटीचा परिणाम होणारा मुखाकडील भाग आणि भरती ओहोटीचा परिणाम न होणारा उगमाकडिल भाग. पुर्वी नागोठण्याच्या मुखापर्यंत ३५ कि.मि. चा प्रवाह पाण्याच्या उपलब्धतेमुळे पुर्वी जलवाहतुकीस उपयोगी पडायचा. नागोठण्याच्या उत्तरेस १८ कि.मी. वर धरमतरच्या दक्षिणेस नदीचे पात्र रुदं होते. धरमतपासून रेवसपर्यंतचा अंबा नदीचा प्रवाह दलदलमय प्रदेशातून जातो. नागोठण्या पासून अंबा नदीस एकही मोठी नदी येऊन मिळत नाही.
परिसरातल्या प्रमुख डोंगररांगा सह्याद्रीच्या मुख्य शाखेपासून अलग झालेल्या उपशाखा आहेत. नागोठण्याच्य पुर्वेस जि डोंगररांग आहे तिला महालमिरा डोंगर रांग या नावाने ओळखले जाते. आणि नागोठण्याच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या डोंगररांगेस सुकेळी डोंगररांग म्हणुन ओळखले जाते. या डोंगरांगेत सुरगड, अवचित गड आणि सागरगड यासारखे तिन बेलाग दुर्ग नागोठणे परिसराचे पुरातन काळापासून संरक्षण करत आहेत. याशिवाय नागोठण्याच्या पुर्वेस नागोठणे गावास लागुनच एक उपशाखा महालमिरा रांगेपासून अलग झालेली आहे हिला पुर्व नागोठणे डोंगररांग असे नाव आहे. अशा प्रकारे तिन बांजूनी डोंगररांगानी वेष्टित असलेल्या नागोठण्यातून दक्षिणेकडे सुकेळी खिंडीतून, पश्चिमेकडे भिसे खिंडीतून व उत्तरेकडे अंबा नदीच्या तटाला लागून जावे लागते. सुकेळी डोंगररांग अंबा आणि कुंडलिका नद्यांचे पाणलोट क्षेत्र विभागते.

सद्यस्थितीस मुंबई गोवा महामार्गावरिल एक शहरवजा गाव असलेल्या या गावास हजारो वर्षांचा इतिहास आहे हे सांगुन कोणास खरे वाटणार नाही. खर तर नागोठण्याच्या नावातच फार मोठा इतिहास दडला आहे जो महाभारत काळापर्यंत जाऊन पोहोचतो. पुर्व महाभारतातल्या खांडवकांड नामक घटनेनंतर उत्तरेत राहणार्‍या नागलोकांमध्ये आणि पांडवांमध्ये जे वैर झाले त्याची परिणीती उत्तर महाभारत काळातल्या नागसत्र यज्ञामध्ये झाली, या भयानक युद्धात अनेक नागकुळांचा संहार झाला जिवंत राहिलेली नागकुळे दक्षिणेकडे सरकत जाऊन दक्षिणेकडिल अनेक भागांत स्थिरावली. यातिल काही कुळे कोकणात सुद्धा दाखल झाली आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल (पन्नगपल्ली), नागोठणे (नागस्थान), नागाव (नागग्राम) अशी ठिकाणे वसवून तेथे राहिली. रायगड जिल्ह्यात अनेक गावांत सापडणार्‍या नागमुर्त्या आणि गांवामधले नागदर्शक नाम हे नागवंशियांच्या रायगड जिल्ह्यातल्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. बहुदा नागलोकांच्या जेथे जेथे वस्त्या झाल्या ति ठिकाणे समुद्रतिरी, बंदरावर अथवा खाडीच्या मुखाशी दिसून येतात यावरुन नागलोक हे निष्णात दर्यावर्दी होते असाही सिद्धांत लावता येतो कारण अगदी बुद्धकाळातही नागलोकांची कोकणपट्ट्यात आरमारे होती असे उल्लेख पुरातन ग्रंथांमध्ये आढळुन येतात याचा अर्थ नागलोकांनीच कोकण पट्टीतली पहिली आरमारे स्थापन केली होती असे ठामपणे म्हणता येईल आणि यापैकीच एक आरमार नागोठणे येथेही स्थापन झाले असावे.

नागोठणे गावास खुप जुना आरमारी इतिहास आहे नागलोकांनी येथे आरमाराचा पाया रचला आणि सातवाहन, मौर्य, चालुक्य, शिलाहार, यादव, गुजरात सुलतान, निजामशहा, आदिलशहा, मराठे, आंग्रे, इंग्रज यांनी या आरमाराच्या इतिहासाच्या इमारतीची पक्की बांधणी करुन उत्कर्षाचे कळस चढवले. मौर्य सातवाहन काळात नागोठण्याचे व्यापारी महत्त्व खुपच वाढले इ.स्.पुर्व २२५ मध्ये चौल्-रेवदंडा, नागोठणे, महाड, मुरुड, गोरेगाव, पेण, पनवेल, राजपुरी या पुरातन व्यापारी पेठा होत्या. सह्याद्री पर्वतामधून कोकणात उतरणार्‍या कोंडाणे घाट, हिंदोळ घाट, मिरघाट, बोरघाट, कुरवंडा घाट, आंबेनळी, पायमोडी (मोराडी) घाट, निसणी (सव), कोराई (काठी), अनघाई, वारसदार, वाघजाई, सवाष्णी, भोरप्या, नांणदांड, नाळेची वाट, गाढवलोट, सावळा, लेंड आणि ताम्हिणी सारख्या घाटाटून नागोठणे बंदरात आयात केलेला माल देशभर पाठविण्यात येत असे आणि देशभरातला माल याच ठिकाणाहून परदेशात निर्यात होत असे. येथुन येणार्‍या व्यापार्‍यांच्या निवासासाठी नागोठणे मार्गे मावळात जाणार्‍या याच घाटरस्त्यांवर कार्ले, भाजे, कुडे, घारापुरी, नेणवली (खडसांबळे), ठाणाळे इत्यादी लेण्या वेगवेगळ्या राजवटींच्या काळामध्ये कोरुन काढण्यात आल्या. वरिल सर्व लेण्यांवरुन असे दिसून येते कि इ.स्.पुर्व १०० ते इ.स.३०० पर्यं बोरघाटामार्गे रहदारीचा मुख्य मार्ग होता. नेर्न या इतिहासकाराच्या मते प्राचिन काळी सह्याद्रीच्या घाटांमधुन चालणार्‍या व्यापाराची उलाढाल चौल मार्गे चालत असे आणि चौल हे नागोठण्यास समांतर आहे. चौलवरुन रेवदंडा खाडीमार्गे सुकेळी खिंडीतून व्यापारी मार्ग जात असावा. त्यामुळे तत्त्कालिन प्रमुख मार्ग बोरघाट ते नागोठणे, नागोठणे ते अष्टम आणि अष्टम ते चौल हा असावा.  इ.स. सनाच्या दुसर्‍या शतकात भारतात आलेल्या भुगोलतज्ञ टोलेमीने नागोठण्याचा उल्लेख नानागुना (नागोठणा) आणि नागरोरी (नागपुरी) असा केला आहे. पेरिप्ल्स मध्ये जे वर्णन करण्यात आले आहे त्यानुसार इ.स.७० ते ८० च्या सुमारास इजिप्तबरोबर धान्य, तिळ, साखर, तांदुळ, आले, कापड, खाद्यतेले इत्यादी वस्तूंचा व्यापार चालत असे. याशिवाय विविध प्रकारची मद्ये, कापड, तांबे-पितळ, जस्ताची भांडी, सोन्या चांदीची नाणी,शिंपल्यांचे दागिने, चांदिचे पेले, थाळ्या यांची आयात निर्यात होत असे. मौर्य काळाशिवाय सातवाहन, चालुक्य, शिलाहार, मराठे, गुजरातचे सुलतान, आदिलशाही, निजामशाही इत्यादी काळातही नागोठण्याचे व्यापारी महत्त्व कायम होते. शिलाहार काळातील अनंतदेव राजाच्या ताम्रपटात त्याने आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे महाप्रधान दुर्ग श्रेष्टींचे पुत्र भवन श्रेष्ठी आणि त्यांचे भाऊ धर्मश्रेष्ठी  यांच्या मालवाहू जहाजांस नागोठणे, चौल व नालासोपारा या तिन बंदरामध्ये करमाफी दिल्याचा उल्लेख आहे. नागोठण्याच्या अंबा नदीवर दिसणारा जो पुल आहे तो याच प्रमुख व्यापारी मार्गावर विजयनगर साम्राज्याच्या राजा अलिया राम राया याच्या काळात बांधण्यात आला होता यावरुन विजय नगर साम्राज्याची हद्द नागोठण्यापर्यंत भिडली होती हि महत्त्वाची माहिती कळते. याशिवाय गुजरात सुलतान, निजामशाही काळात चौलमार्गे नागोठण्यातून देशावर जाणार्‍या मुख्य व्यापारी रस्त्यावर वाहतुक सुलभ होण्याकरिता १५८० साली काजि अलाऊद्दीनने अंबा नदीवरिल याच पुलाचा जिर्णोद्धार केला होत पुढे मराठे तसेच इंग्रजांच्या काळातही या पुलाची वेळोवेळी दुरुस्ती झाल्याचे उल्लेख मिळतात.

नागोठण्यास फक्त आरमारी इतिहासच आहे असे नाही तर वांशिक, धार्मिक, औद्योगिक, भौगोलिक, भाषिक, व्यापारी अशा सर्व क्षेत्रांमध्ये नागोठण्यास भुतकाळात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. कारण वांशिक किंवा भाषिक इतिहासाबद्दल पहायचे झाले तर नागोठण्यात पाच हजार वर्षांपुर्वीची प्राचिन अशी नागवंशिय संस्कृती स्थिरावली होती. याकाळी कोकण परिसरात शैवपंथांचा आणि थोडाफार वैष्णव व शाक्तांचा प्रभाव होता नागलोकांनी अनेक वर्षे येथे आपली मुळ संस्कृती जपून ठेवली असावी मात्र कालांतराने नागसंस्कृती हि शैवसंस्कृतीमध्ये विलिन झाली असावी. एका वेगळ्या विचारप्रवाहाप्रमाणे नाग शब्दाचा विचार करतां हे लोक मूळचे डोंगरदर्‍यांतले रहिवाशी असावेत, कारण नग या शब्दाचा संस्कृत अर्थ डोंगर असा होतो त्यामुळे  नाग लोक मूळचे डोंगराळ मुलखांतील रहिवाशी असून ते कालांतराने जिकडे तिकडे पसरले असावे. जर यांचीं समुद्रांतरीं द्वीपें (उदा नागोठणे, नागाव, पनवेल, नागापट्टण) होतीं, तर जलयानाच्याशी यांचा बराच परिचय पूर्वीच्या काळीं असला पाहिजे. नागांचा लोक हे पाताळातले रहिआशी समजण्याचा संस्कृतांत संप्रदाय आहे. या संप्रदायावरून नाग हे मूळचे दक्षिण दिशेचे (कोकणपट्ट्यातले) रहिवाशी असून, ते पुढें वर हिमालयापर्यंत व काश्मिरापर्यंत पसरले असेंही म्हटले जाते. सप्तपाताळ या शब्दाचा सप्तकोकण या शब्दाची काहितरी संबध असावा. महाभारत काळात कुंकण नामक एका नागकुळाने येथे आपले राज्य स्थापिल्यामुळे या परिसरात सप्तकुंकण असे म्हटले गेले असेही म्हटले जाते. गुजरातमध्ये आजही नागर नामक जमात आहे. हे झाले वांशिक महत्त्व आणि भाषिक महत्त्वाचा विचार करता महाराष्ट्राच्या भाषिक जडणघडणीत नागोठण्याच्या नागवंशी संस्कृतीचा नक्कीच सहभाग होता कारण प्रथम नागवंशिय लोकांनी येथे वस्ती केल्यावर इ.स्.पुर्व सहाव्या सातव्या शतकामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रिक, वैराष्ट्रिक व महाराष्ट्रिक या तिन संघाचे लोक उदयास आले व या चारही संस्कृतींचा मिलाप होऊन महारट्ट अर्थात मराठी वंशाचा उदय झाला. नाग लोक वैदिक अपभ्रंशित भाषा बोलत असत तर महाराष्ट्रिक त्यांची महाराष्ट्रि भाषा बोलत असत. याच महाराष्ट्रिक आणि वैदिक अपभ्रंशित भाषांच्या मिलनातून मराठी भाषेचा उदय झाला.

वरिल अनेक घटनांवरुन नागोठण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते मात्र इतकेच नव्हे तर नागोठणे हे गाव अनेक वेळा वेगवेगळ्या साम्राज्यांच्या संकरसिमेवरिल संवेदनशिल गाव म्हणुन प्रसिद्ध राहिले आहे. सन १५४२ ते १५६५ हा काळ विजय नगर साम्राज्याचे सम्राट अलिया राम राय यांच्या कारकिर्दीचा काळ या काळात विजयनगर या संपन्न हिंदू साम्राज्याची हद्द नागोठण्यापर्यंत भिडली होती. आजही तज्ञ हे मानत असले कि विजयनगर साम्राज्य रत्नागिरी पर्यंत मर्यादित होते तरी रायगड जिल्ह्यात असलेल्या तळे गावातल्या एका मंदिरात विजय नगर साम्राज्य काळातला एक तेलुगु भाषेतला शिलालेख आजही पहावयास मिळतो याशिवाय नागोठणे गावातला अंबा नदीवरिल जो मजबुत पुल आहे तो सुद्धा विजय नगर साम्राज्याच्या काळातच तालिकोटच्या लढाईच्या आधी राम रायाच्या काळात बांधण्यात आला होता कारण तसा प्राकृत भाषेतला शिलालेख या परिसरात दुर्लक्षित स्थितीत पडलेला होता मात्र भारतीयांच्या इतिहासाविषयीच्या उदासिनतेमुळे हा शिलालेख यानंतर अंबा नदीस आलेल्या वारंवार पुरामुळे आता दिसूनही येत नाही. याच पुलाचा जिर्णोद्धार पुढे १५८० साली गुजरातच्या सुलतान अथवा निजामशाही काळात झाला यावेळी जिर्णोद्धार करताना जुन्या पद्धतीचे बांधकाम नष्ट करुन त्याऐवजी नविन पद्धतीचे बांधकाम करण्यात आले तसेच पुलावर नविन शिलालेख बसवण्यात आला ज्यावर येथिल काजी अल्लाऊद्दीन याचे नाव दिसून येत होते मात्र दुदैवाने हा शिलालेख सुद्धा आता दिसून येत नाही. सन १४९८ मध्ये गुजरातच्या सुलतानाकडे महाराष्ट्रातिल साष्टी, मुंबई,ठाणे वसई पासून नागोठण्याचा प्रदेश होता व उर्वरित महाराष्ट्रात बहामनी राज्य होते. नागोठण्यास त्या काळात गुजरातच्या दक्षिण टोकाकडिल शहर म्हणुन सुद्धा ओळखण्यात येत होते. याच काळी चौलमध्ये पोर्तुगिजांनी शिरकाव केला होता या दोन्ही सत्तांच्या संकरस्थळी नागोठणे असल्याने येथे अनेकदा पोर्तुगिज विरुद्ध सुलतान यांची युद्धे झाली होती. गुजरातचा सुलतान मेहमुद बेगडा याने नागोठण्यात तळ ठोकून चौलवर बरेच हल्ले केले होते. १५२९ साली हेक्टर दे सिल्व्हेरिया ने नागोठण्यावर हल्ला करुन जाळपोळ केली त्याला नागोठण्यातिल सेनापतीने प्रत्युत्तर दिले होते.

मक्का येथून येणार्‍या काही भाविकांच्या जहाजाला लुटल्याने पोर्तुगिजांविरुद्ध गुजरात सुलतान, निजामशाह आणि आदिलशहा अशा तिन सत्ता एकत्र येऊन युद्ध पुकारले होते या काळी नागोठण्यामार्गे सुकेळी खिंडीतून रेवदंडा खाडीत मोठ्या प्रमाणात घोडदळ, हत्तीदळ तसेच तोफखाने इत्यादींची वाहतुक झाली होती आणि हि वाहतुक सुकर व्हावी यासाठी नागोठण्याच्या विजयनगर कालिन पुलाचा जिर्णोद्धार करण्यात आला होता.

सन १६३६ साली मुघलांनी निजामशाही नष्ट करुन नागोठ्णे आदिलशहाच्या ताब्यात दिले याच काळी पुण्यात शिवाजी महाराजांचा उदय झाला होता. सन १६४३ च्या सुमारास आदिलशाही सत्ता कोकणातली सर्वश्रेष्ट सत्ता होती त्याकाळि नागोठणे विभाग हा सुभे कल्याणच्या अख्यतारित येत असे. सुभा कल्याण हा वैतरणा नदीपासून नागोठण्यापर्यंत् मुल्ला अहमदकडे तर दुसरा सुभा नागोठण्यापासून महाडपर्यंत जंजिर्‍याच्या सिद्दीकडे होता. सन १६५७ साली शिवाजी महाराजांनि कल्याण सुभ्यावर हल्ला करुन हा सुभा स्वराज्यात आणला अशा तर्‍हेने नागोठणे शिवाजी महाराजांच्या राज्यात आले. इथे शिवाजी महाराजांनी आदिलशहा विरोधात मोहिम उघडली असताना मुघल सुद्धा मराठ्यांवर हल्ले करण्याच्या तयारित होते आणि या कामासाठी औरंगजेब याने त्याचा मामा शाईस्ताखान यास दख्खनवर पाठवले आणि त्याने पुण्यात तळ मांडला. त्याने पुण्यातून कल्याण सुभ्यावर हल्ला करुन कल्याण स्वतःच्या ताब्यात घेतले मात्र नागोठणे त्याच्या ताब्यात येऊ शकले नाही. नागोठण्यावरिल मोहिम फत्ते करण्यासाठी त्याने करतलब खान उझबेक याची निवड केली. त्याच्या दिमतीला बलाढ्य सैन्य व अनेक सरदार तसेच देशमुख देऊन नागोठण्यावर कुच करण्यास सांगितले. या खानाने लोणावळ्यावरुन अंबा नदीचा जो उगम आहे ति वाट कोकणात उतरण्यासाठी पकडली मात्र शिवाजी महाराजांना या कटाची अगोदरच माहिती लागून ते स्वतः सैन्यासह या परिसरात दाखल झाले होते. दाट रानात जागोजागी  मराठा सैन्य लपुन खानाच्या सैन्याची वाट पहात होते. मेंढराचा कळप जसा वाघाच्या तावडित येतो तसा कारतालब खान आपल्या सैन्यासह उंबर खिंडीत येऊन पोहोचला होता. महाराजांना दया येऊन त्यांनी आपला वकिल खानाकडे पाठवला मात्र खानाने उद्धट वर्तन करुन नागोठणे आपण ताब्यात घेणारच अशि दर्पोक्ती केल्याने महाराजांनि सैन्याला हल्ल्याचे आदेश दिले. मराठे सैन्य मुघलांवर तुटून पडले सैन्याची धुळधाण उडवली व खानास अक्षरशः जबरी खंडणी देऊन माफी मागुन पुण्यास पळ काढावा लागला. या लढाईस उंबरखिंडीची प्रसिद्ध लढाई म्हणुन ओळखण्यात येते.

महाराजांना या काळात जंजिर्‍याच्या सिद्दीचा सुद्धा सामना करावा लागत होता. पुर्वी आदिलशहा व नंतर मुघलांचा मांडलिक झालेल्या या सिद्दीचे राज्य मर्यादित असले तरी नागोठण्याच्या हद्दीस लागून होते. नागोठण्यास शिवाजी महाराजांचा जहाज बांधणीचा कारखाना असून ते मराठा राज्यातले सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण असल्याने सिद्दी बर्‍याच वेळा आपले सैन्य पाठवून नागोठण्यात जाळपोळ करत असे आणि अनावश्यक रक्तपात करुन माणसे, मुले व स्त्रिया गुलाम बनवून मुंबईस नेत असे. सिद्दी संबळने १६७३ मध्ये सुद्धा असे कृत्य केले तेव्हा महाराजांनी रायगड वरुन १०० सैनिक धाडून सिद्दीच्या सैन्याला चकित करुन कापुन काढले. १६७७ मध्ये सिद्दी कासिम परत एकदा नागोठण्यास आला आणि छापे टाकून येथिल रहिवाशांना भंगिकाम आणि अंगमेहनतीचे काम करायला लावले तेव्हा महाराजांनि या घटनेचा बदला घेण्यासाठी आरमार प्रमुख दौलत खान याला ४००० सैन्याच्या तुकडीसह सिद्दीवर कुच करायला सांगितले. पुढे नागोठण्याचे सिद्दी व इंग्रजांपासून रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी व दौलत खान यांना खाडीसमोरील खांदेरी किल्यावर बांधकाम करण्याचे आदेश दिले. हे करताना मराठ्यांना इंग्रजांच्या विरोधाचा सामना करायला लागला. इंग्रजांनी कॅप्टन गेप व केगविन यांना मराठ्यांवर हल्ला करण्यास जहाजे व कुमक सोबत देऊन खांदेरीवर धाडले मात्र मराठ्यांच्या हल्ल्यात गेप ठार झाला व त्याचे जहाज मराठ्यांच्या हाती लागले. केगविनने मराठा आरमारावर हल्ला चढवला आणि रिव्हेंज हे जहाज घेऊन मराठा गुराबांचा नागोठण्यापर्यंत पाठलाग केला. दोनच दिवसांनी मराठा आरमाराने नागोठण्यातून परत इंग्रजांवर हल्ला केला व इंग्रजांचे नुकसान केले. पुढे इंग्रजांना नाईलाजाने मराठ्यांशी तह करावा लागला ज्यामधिल कलमे स्वतः शिवाजी महाराजांनी तयार केली होती यामध्ये एका कलमात नागोठणे व पेण परिसरात मराठ्यांच्या शत्रूला प्रवेश देऊ नये आणि सिद्दीने नागोठणे येथून ज्या नागरिकांना, स्त्रियांना व मुलांना धरुन नेले आहे त्यांची ताबडतोब सुटक करण्यात यावी अशी कलमे होती.

संभाजी महाराजांच्या काळातही नागोठण्याचे राजकिय महत्त्व कायम होते. या काळातही सिद्दीचे नागोठण्यावरिल हल्ले थांबले नव्हते. सिद्दीने लहान लहान नौका नागोठण्यास पाठवून कैद्यांना गुलाम बनवून मुंबईस नेल्याचे कृत्य संभाजी महाराजांना कळल्यावर त्यांनि दोनशे सशस्त्र सैनिक उंदेरीवर उतरवले होते. १६८१ मध्ये परत एकदा सिद्दीने नागोठण्यात शिरुन जाळपोळ केल्यावर संभाजी महाराजांनी जंजिराच हस्तगत करुन सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले व यानंतर संभाजी महाराजांच्या सर्व जंजिरा मोहिमा सिद्दीने नागोठण्यावर जे अत्याचार केले त्याचा बदला म्हणुनच काढल्या असल्याचे लक्षात घ्यावयास हवे. जंजिरा मोहिमेच्या काळात मुघलांनि हसन अलिखानास मोठे सैन्य देऊन कोकणात मराठ्यांविरुद्ध पाठवुन दिले त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिरा मोहिम अर्धवट सोडून कल्याण कडे जावे लागले मात्र जाताना त्यांनी नागोठण्याच्या रक्षणासाठी १५००० सैन्याची कुमक तैनात करुन ठेवली होती.

शाहू महाराजांच्या काळात भोसले घराण्यात यादवी सुरु झाली या यादवी मध्ये ताराराणींच्या पक्षात असलेल्या कान्होजी आंग्रे यांना आपल्या पक्षात येण्यासाठी आवाहन करण्यास शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना कोकणात धाडले होते. बाळाजी विश्वनाथ हे अवचितगडावरुन नागोठणे प्रांतात येऊन त्यांनि कान्होजी आंग्रे यांची भेट घेतली व आपल्या पक्षात घेतले तसेच  शाहू महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब देऊन संपुर्ण कोकणपट्टीची जबाबदारी सोपवली.

पेशवे काळात नागोठण्यामध्ये नाण्यांची टांकसाळ तसेच तोफ गोळे बनवण्याच्या कारखान्यांची निर्मिती झाली होती. याशिवाज नारायणराव पेशवा खुनाच्या कटात सामिल असलेले रघुनाथराव पेशवे गटातले एक सदस्य सरदार आबाजी महादेव हे नागोठण्याचे नागरिक होते. या गुन्ह्याबद्दल त्यांना नागोठण्यातून अटक करुन कुटूंबियांसह सुरगड किल्यावर अटकेत ठेवण्यात आले होते.

सन १७९६ नंतर आंग्रे घराण्यात जि यादवी सुरु झाली त्यामध्ये सुद्धा नागोठण्याचा सहभाग विशेष महत्त्वाचा होता रघोजी आंग्रे मरण पावल्यावर त्यांचे पुत्र मानाजी, कान्होजी व सावत्र पुत्र  जयसिंग यांच्या गृहकलह निर्माण झाल्यावर जयसिंगास अटक करुन त्याच्या परिवारास नजरकैदेत ठेवण्यात आले मात्र जयसिंग आंग्रेची पत्नी सकवारबाई हिने नजरकैदेतून सुटका करुन नागोठण्याचा किल्ला ताब्यात घेऊन तेथून तिने बंडाचा झेंडा फडकविला आंग्र्यांच्या राज्यात धुमाकुळ घालू लागली कालांतराने जयसिंगाने आपली सुटका करुन घेऊन तो सुद्धा पुण्यास पेशव्यांकडे गेला.

पुढे आंग्रे घराण्याच्या ग्वाल्हेर शाखेचे बाबुराव आंग्रे यांनी जयसिंगाच्या मदतीसाठी अलिबाग येथे कुच केले ग्व्हाल्हेरच्या दौलत राव शिंदे यांनी आपले सरदार भावे यांस बंदुका आणि चारशे घोडेस्वार देऊन बाबुरावाच्या मदतीने कुलाबा सर करण्यास पाठवले. हे सैन्य पुण्याहून निघून खंडाळ्यास थांबले. अलिबाग ला आल्यावर सैन्याने हिराकोटला वेढा दिला पण जयसिंग गुपचुप निसटून रात्री नदी पोहत कुलाब्यास आला. बाबुराव यांनी हिराकोट ताब्यात घेऊन मानाजी, कान्होजी आणि जयसिंग यांना पकडले. यानंतर सकवारबाईने नवर्‍याच्या मदतिस जाऊन खांदेरी किल्ला काबिज केला. इ.स.१७९९ मध्ये मानाजी आणि कान्होजी हे पुण्यास पळून गेले आणि काही माणसे मदतीस घेऊन परत आले. बाबुरावाने खांदेरीस वेढा दिला पण त्यात त्यांची माणसे मारली गेली परत एकदा बाबुरावाच्या सैन्याची आणि मानाजी व कान्होजीच्या सैन्याची गाठ चौल व नागोठणे येथे पडून तुंबळ युद्ध झाले आणि यात मानाजी आणि कान्होजी या दोन्ही भावांचा पराभव होऊन कैदी बनवण्यात आले. यानंतर बाजिराव दुसरा याने बाबुराव यांना सरखेलपद दिले.

जानेवारी १८१८ मध्ये कर्नल प्रोथर ने ३८० इंग्लिश आणि ८०० स्थानिक सैनिकांच्या सहाय्याने अवचितगड, नागोठणे, सोनगड, पाली हि ठिकाणे ताब्यात घेतली. सन १८१८ ते १८४० च्या दरम्यान ब्रिटीश सत्ता आणि आंग्रे, पंतसचिव यांच्यात गावे ताब्यात घेण्यावरुन देवाणघेवाण झाली. यानंतर सांक्षी, राजपुरी व रायगड उपविभाग ब्रिटीश सत्तेखालील रत्नागिरी जिल्ह्यास जोडण्यात आले. सन १८३० साली ठाण्याला जिल्हा केल्यामुळे हे सर्व उपविभाग ठाण्यास जोडण्यात आले. ब्रिटीशांच्या आधि हा परिसर आंग्रे आणि पंतसचिव यांच्यामध्ये विभागला होता. नागोठणे विभागातली खेडी पंतसचिव आणि आंग्रे यांच्या ताब्यात होती. सन १८३० मध्ये नागोठण्यातला अर्धा भाग ब्रिटीशांना देऊन त्याबदली भोरकरांनी अवचितगडचा निम्मा भाग स्वतःकडे घेतला. पुढे १८३३ मध्ये ब्रिटीशांनी आंग्रेंकडून नागोठणे भाग घेतला व त्याबदली अवचितगडाचा अर्धा भाग आंग्य्रांना दिला. रघोजी आंग्रे यांचा मुलगा दुसरा कान्होजी याच्या मृत्यूनंतर आंग्र्यांच्या गादीस वारस नसल्याने इंग्रजांनी १८३९ साली कुलाबा संस्थान खालसा करुन ब्रिटीश राज्यात विलीन केले आणि ब्रिटीश कायदे लागू झाले. १८४० साली रामोशी स्वातंत्र्य सैनिकांचा एक संघ भोर संस्थानाहून घाटावरुन खालि उतरली आणि त्यांनी  ब्रिटीशांच्या ताब्यातल्या पाली आणि आणि नागोठणे गावावर हल्ला चढवला आणि ति गावे जाळून टाकली. रामोशांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटीशांनि नेटीव्ह लोकांच्या १५ व्या रेजिमेंटला पाचारण केले यामध्ये अनेक रामोशी पकडले गेले किंवा मारले गेले. ऑक्टोबर १८४४ साली तुंगारतन, कर्नाळा, वाक्रुळ, हवेली, अंतोरा हि ठिकाणे ठाणे जिल्ह्यात घेऊन नागोठण्याचा दर्जा कमी केला गेला आणि नागोठण्याचा साक्षी प्रांतात समावेश केला. १८५२ साली इंग्रजांनी कुलाबा एजन्सी रद्द केली आणि या एजन्सी मधली खांदेरी, रेवदंडा, सांक्षी, राजपुरी, रायगड उपविभाग आणि नागोठणे, तळा, निजामपुर, गोरेगाव, बिरवाडी आणि पोलादपुर हे लहान विभाग एकत्र करुन कुलाबा उपजिल्हा तयार केला. पुणे सार्वजनिक सभेने सुरु केलेल्या १८५७-१८७६ च्या दुष्काळविषयक मोहिमेनंतर १८९६ च्या दुष्काळात, दुष्काळ निवारण कार्यासाठी सार्वजनिक सभेने मोठी मोहिम काढली. १८५६ साली भोर संस्थानाने नागोठण्यात पहिली देशी शाळ उघडण्यात आली. हि रायगड जिल्ह्यातली महाड नंतर उघडलेली दुसरी देशी शाळा होती. डिसेंबर १८९६ मध्ये सार्वजनिक सभेच्या दुष्काळ समितीने पनवेल, पेण, नागोठणे, गोरेगाव व रेवदंडा येथे शेतकर्‍यांच्या सभा आयोजित करुन दुष्काळ निवारण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार करण्याचा चंग बांधला. सन १८८२ साली तत्कालिन जिल्ह्यातली अलिबाग, पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि महाड उपविभागत १०६४ गावांचा समावेश होता. सन १९२१-१९३१ च्या दरम्याने नागोठणे महाल खालसा करण्यात आले.

ब्रिटीशकाळातसुद्धा नागोठणे गावाचे पेठ व महालाचे स्वरुप कायम होते आणि अनेक सरकारी कार्यालये आणि कचेर्‍या तिथे स्थापन झाल्या ज्या आजही येथे पहावयास मिळतात . एक जुन ते ३१ ऑगस्ट हे पावसाचे तिन महिने सोडले तर नागोठणे बंदर त्याकाळि चोविस तास गजबजलेले असे. गोरेगाव, इंदापुर, कोलाड, खांब, पाली सुधागड ते अगदी महाबळेश्वरपर्यंतचे मुंबईत जाणारे प्रवासी नागोठणे बंदरात येत. या प्रवाशांचा नागोठणे बंदराकडे होणारा प्रवास बैलगाडीतून असे आणि जिकडून तिकडून चाळिस पन्नाच कि.मी. बैलगाडीतून येऊनही बोट चुकली म्हणजे दुसर्‍या दिवशी भरती ओहोटीची वेळ पाहून नागोठ्णे बंदरावर बांधलेल्या धर्मशाळ्त प्रवाशांना मुक्काम करावा लागत असे.त्यामुळे परिसरात जिकडे तिकडे बैलगाड्या सोडलेल्या असत व सोडलेले बौल गळ्यातल्या घुंगरांना मंजुळ झटका देऊन रवंथ करताना दिसत. सायंकाळी प्रवाशांच्य पेटलेल्या चुलीमुळे बंदरावर ठिक ठिकाणी चुलींचा उजेड दिसत असे आणि चुलीवर भाजल्या जाणार्‍या भाकर्‍या किंवा घमघमणार्‍या सुक्या मासळीच्या कालवणारे हा परिसर धुंद होत असे. १९१८ च्या दशकाच्या अखेरपर्यंत नागोठणे-धरमतर्-मुंबई या जलवाहतुकिच्या मार्गावरुन तांदुळ, मिठ, मासे, जंगली लाकुड, तांब्या पितळेची भांडी या मालाची निर्यात होत असे. १९१४ ते १५ या दरम्याने धरमतर ते नागोठणे स्टीम बोट सेवा चालत असे मात्र पुढे बंदर गाळात सापडल्याने हि वाहतुक बंद पडली. तरी मुंबईहून महाबळेश्वरपर्यंत प्रवासी नागोठणे बंदरात उतरुन प्रवास करत असत. आजुबाजुच्या डोंगर माथ्यावरिल बेछुट आणि अविरत जंगलतोड यामुळे कोकणातील एकेकाळी हिरवेगार असणारे डोंगर आज उघडे बोडके दिसतात. हि परिस्थिती सुधागड तालुक्यातल्या अंबा नदीच्या उगमापासून नागोठण्यापर्यंत कायम आहे. जंगलतोडीमुळे डोंगरावरिल माती व जमिन जोरदार पावसामुळे सुटून नदीत आली आणि खाडीपर्यंत सरकली त्यामुळे गाळ साचून बोट सेवा बंद पडली. त्यामुळे गेली ५००० वर्षे उत्कर्षाच्या शिखरावर असलेले हे ऐतिहासिक नागोठणे बंदर काळाच्या ओघात नाहिसे झाले आणि नागोठण्याचे व्यापारी आणि ऐतिहासिक महत्त्वही त्याबरोबर संपुष्टात आले.

नागोठण्याच्या वैभवशाली इतिहासाकडे पाहिले तर अभिमानाने उर दाटून येतो मात्र इतिहासाचे जतन करण्यामध्ये जि उदासिनता आपण दाखवतो ति नक्कीच दुर्दैवी आहे. नागोठण्याच्या वैभवशाली इतिहासाचे जतन होण्यासाठी लोकजागृती होण्याची नितांत गरज आहे यासाठी शहराच्या इतिहासाचे संकलन करुन नागोठण्याच पर्यटनस्थळाचा दर्जा देणे, गावातल्या सोळाव्या शतकातल्या ऐतिहासिक पुलाचे तसेच इतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचे रक्षण करणे, गावात पुरातत्विय दृष्ट्या उत्खनन करुन नाहिशे झालेले शिलालेख अथवा इतर ऐतिहासिक पुरावे शोधून काढणे, गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे इत्यादी उपक्रम राबवणे गरजेचे आहे अन्यथा नागोठण्याचा वैभवशाली इतिहास इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही. कोकणपट्ट्यातल्या वाढत्या शहरीकरणाच्या अजगराने ठाणे (स्थानक), मुंबई (पुरी), साष्टी, वसई (विषय), नालासोपारा (शुर्पारक), पनवेल (पन्नगपल्ली) अशी अनेक ऐतिहासिक शहरे एकामागुन एक अशाप्रकारे गिळंकृत केली आहेत कि आज तिथे इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणे कठिण झाले आहे. उद्या नागोठण्याची स्थिती सुद्धा अशीच होण्याआधी या वैभवशाली इतिहासाचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांसमोर आहे अन्यथा शहरीकरणाचा अजगर या ऐतिहासिक नागास अशा रितीने गिळंकृत करेल कि या ठिकाणी नागोठणे नावाचे एक गाव अस्तित्वात होते हे देखिल पुढील पिढीच्या लक्षात राहणार नाही.