सरसगडाच्या कुशीतले बल्लाळेश्वराचे पाली
रायगड जिल्ह्यास जसा ऐतिहासिक व भौगोलिक वारसा आहे, त्याचप्रमाने धार्मिक व सांस्कृतीक वारसा सुद्धा आहे. येथे अनेक धार्मिक स्थळे आहेत जी राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशातील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. गणपती हे महाराष्ट्राचे लाडके दैवत, या देवतेस आपल्याकडे आराध्यदेवतेचा मान दिला जात असल्याने कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपतीची पुजा करुनच केली जाते व ही आजची नव्हे तर पुरातन कालापासून चालत आलेली प्रथा आहे.

गणपतींची अनेक स्थाने महाराष्ट्रात आहेत मात्र त्या सर्वांत अष्टविनायक हे सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. गणपतीवर श्रद्धा असणारे सर्व भाविक अष्टविनायकांचे दर्शन घेण्याचे कधीच चुकत नाहीत. अष्टविनायकांपैकी एकून दोन विनायक खुद्द रायगड जिल्ह्यातच आहेत. यातला एक म्हणजे महडचा वरदविनायक व दुसरा पाली गावचा बल्लाळेश्वर, बल्लाळेश्वरामुळे या गावास 'बल्लाळेश्वराची पाली' असे नामाभिमान प्राप्त झाले आहे. पाली हे गाव मुंबई गोवा हायवेवर लागणार्या वाकण गावापासून आठ कि.मी. अंतरावर खोपोली पुणे मार्गावर आहे व मुंबई व पुण्याहून सारख्याच अंतरावर आहे. अंबा नदीच्या तिरावर व सरसगडाच्या कुशीत वसलेल्या या गावास प्राचिन इतिहास आहे, पाली हा पल्ली या नावाचा अपभ्रंश आहे, पल्लीचा अर्थ नगर असा होतो, याशिवाय या गावास इतर कुठेही आढळून न येणारी जुन्या धाटणीची वेस आहे यावरुन पालि हे पुरातन काळापासून एक टुमदर नगर म्हणुन प्रसिद्ध होते हे स्पष्टच आहे . प्राचिन महाराष्ट्राचा सुसंगत इतिहास सातवाहन कालापासून मिळतो, त्याकाळी परदेशातून आयात अथवा निर्यात केलेला माल कोकणातून देशावर जात असे किंवा देशावरुन कोकणात येत असे, अशाच एका महत्त्वाच्या प्राचिन हमरस्त्यावर पाली आहे याला दुजोरा याच परिसरात असलेल्या ठाणाळे-नाडसुर, गोमाशी व घाटमाथ्यावरील अनेक लेण्या देतात. याशिवाय हे गाव ज्या सरसगडाच्या पायथ्याशी वसले आहे तो सरसगड पुरातन कालापासून या व्यापारी रस्त्याचा संरक्षक म्हणुन सेवा करीत होता, आजही या किल्ल्याच्या पोटात अनेक लेण्या, कोठारे व टाक्यांचे अवशेष आढळतात जे प्रामुख्याने सातवाहन कालीन असावेत.
येथील श्री बल्लाळेश्वर व श्री धुंडीराज ही दोन गणेशदैवते तर समस्त भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. या दोनही देवस्थानांना प्राचिन इतिहास असून पुराणात यांचे उल्लेख आढळून येतात. गणेश पुराणात पालीचा उल्लेख 'सिंधुदेशे विख्याता पल्लीनामा भवत्पुरी' असा उल्लेख असून मुद्गल पुराणात 'सिंधुदेशे समाख्याता पल्लीनामा पुरी पुरा' असा उल्लेख आहे यावरुन बल्लाळेश्वराची व पालिची प्राचिनता लक्षात येते. गणेश पुराणात विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे व मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. या कथा पुढीलप्रमाणे, कृत युगात पल्लीपूर नांवाचे नगर होते. या पल्लीपुरात कल्याण नामक वाणी रहात असे, त्यास बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. हा बल्लाळ लहानपणापासूनच गणेशचिंतनात मग्न असे. गणेशचिंतनान मग्न राहिल्यामुळे त्याचे अभ्यासात व व्यापारात दुर्लक्ष होते, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले मात्र बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री स्वतः प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला मात्र बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे. बल्लाळेश्वर फार प्राचिन असल्याचे सर्वज्ञातच आहे मात्र बल्लाळेश्वराच्या मंदिराचे फार पुरातन काळापासून अनेक जिर्णोद्धार झाले असावेत, सध्या जे मंदीर दिसून येते त्याची धाटणी पेशवेकालीन आहे, कारण पेशवे हे गणेशभक्त होते. बाबुराव फडणिस यांनी पुर्वीच्या लाकडी मंदीराचे भक्कम अशा दगडी मंदिरात रुपांतर केले. या मंदिराची रचना करताना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण बारकावे वापरले आहेत, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत, हे मंदिराचे बांधकाम करण्यासाठी लागणारे दगड काढताना खोदकाम करुन झाले असावेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिर्यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक भलीमोठी पितळेची घंटा आहे जी चिमाजी अप्पांनी वसईच्या विजयातून मिळवली होती. तसेच या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आलेला चुन्याचा प्रचंड घाणा मंदिराच्या प्रांगणात आजही पहावयास मिळतो. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यापुर्वी श्री धुंडीराज विनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे व दर संकष्टी चतुर्थीस व विनायकीस लाखो भाविक राज्यभरातून दर्शनास येत असतात. श्री बल्लाळेश्वराची मुर्ती अतिशय तेजस्वी असून भव्य आहे, डाव्या सोंडेची ही मुर्ती तीन फुट उंच आहे.
येथील सरसगड हा किल्ला म्हणजे जणू बल्लाळेश्वराची प्रतिकृतीच, खुप दुरवरुन याचे दर्शन झाल्यास साक्षात बल्ला़ळेश्वराचेच दर्शन झाल्याचा आभास होतो. याच्या पगडीसारख्या आकारामुळे यास पगडिचा किल्ला असेहि एक स्थानिक नाव आहे मात्र बर्याचदा अनेक पर्यटक याचा सुधागड असा चुकीचा उल्लेख करतात, सुधागड हा वेगळा किल्ला असून सह्याद्रीच्या जवळ आहे. हा किल्ला अतिशय दुर्गम व अभेद्य असून पाहणार्याच्या छातीत धडकी भरवणारा आहे. पाषाणाचा एकसंध कडा असल्यामुळे हिवाळ्यात हा थंड झाल्यास पुर्ण पाली गावात गारवा निर्माण होतो व उन्हाळ्यात तापल्यामुळे पाली गावाचे तापमान बरेच तप्त असते. निजामशाही काळात पालीस मामलेदार कचेरी होती, त्यावेळी पालीस मामले अमिनाबाद असेही नाव होते. राजाराज महाराजांचे सेनापत शंकराजी नारायण यांनी हा भाग ताब्यात घेतल्यावर अगदी १९४८ सालापर्यंत हा भाग पंतसचिवांच्याच ताब्यात होता, संस्थाने खालसा झाल्यावर हा भाग रायगड जिल्हास जोडण्यात आला व सुधागड नावाचा तालुका निर्माण करुन पालि हे त्याचे मुख्यालय करण्यात आले. तर असे हे पाली खर्या अर्थाने धार्मिक, ऐतिहासिक व भौगोलिक वारश्याने नटलेले सर्वसंपन्न असे गाव आहे.
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |
मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके आजच खरेदी करा
इतिहास भवानी तलवारीचा | खरेदी करा |
मुंबईचा अज्ञात इतिहास | खरेदी करा |
नागस्थान ते नागोठणे | खरेदी करा |
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट | खरेदी करा |
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा | खरेदी करा |
दुर्ग स्थल महात्म्य | खरेदी करा |
शिवकाळातील अपरिचित प्रसंग | खरेदी करा |
रुळलेल्या वाटा सोडून | खरेदी करा |
महाराष्ट्रातील देवस्थाने | खरेदी करा |
इतिहासावर बोलू काही | खरेदी करा |