विजापूर - शिवरायांच्या पहिल्या शत्रूची राजधानी

कोर्टाची जागा फारच भव्य आहे. किमान ५०-६० फूट उंचावर मजला आहे. तो पूर्ण मजला सागाच्या लाकडाने नाजूक कोरीवकामाने बनवला आहे. मुख्य वस्तूला लागूनच तलाव आहे. त्याला लागूनच फाशी देण्याचं ठिकाण आहे. पूर्ण वास्तूच्या आजूबाजूला बाग आहे. स्थानिक शाळा- कॉलेज मधली मुलं इकडे गप्पा मारत बसलेली असतात. कधी काळी ज्या वास्तूत परवानगीविना बोलता येत नव्हतं त्याच वास्तूत ते मुक्तपणे गप्पा मारत होते. तलावातील हिरव्या पाण्यात पडलेली असर महालच प्रतिबिंब बघण्याजोगे आहे.

विजापूर - शिवरायांच्या पहिल्या शत्रूची राजधानी
विजापूर

महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेल्या कर्नाटक राज्यात विजापूर जिल्हा आहे. महाराष्ट्रासारखंच हेही राज्य विविधतेने नटलेले. १७ ऑक्टोबरला आत्याकडे डोंबिवलीला जायला निघालो तेव्हा डोक्यात विचारही नव्हता की आपल्याला एकाचवेळी पंढरपूर आणि विजापूरची वारी होईल. नशिबाने पंढरपूरला भावाचं काम निघालं आणि मीही त्याच्याबरोबर जायच ठरवलं. पंढरपूरचं नियोजन भावाने आधीच केलं होतं. मीदेखील गुगल वरून पंढरपूर परिसरातील काही ठिकाणांची माहिती काढली व त्यात प्रामुख्याने विजापूर अधोरेखित होत होतं. तीन दिवस हाताशी आहेत मग विजापूर पण पाहून येऊ असं ठरवलं. १८ तारखेला पंढरपूरला मुक्काम केला थोडंफार पंढरपूर दर्शन केलं नि विजापूरला जायची माहिती सुद्धा काढली. पंढरपूर ते विजापूर हे अंतर साधारणतः १०३ कि.मी. आहे. सकाळी ६ ची कर्नाटक परिवहन मंडळाची (KSRTC) ची बस ६ असते  तीच पकडून मी विजापूरला निघालो.

पंढरपूर ते विजापूर ह्या मार्गावर वाहनांची फार वर्दळ नव्हती. ऑक्टोबर असूनही नभ मेघांनी आक्रमिले होते. त्यामुळे वरवर आणि रिमझिम पाऊस होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राची छाप जास्त दिसते. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे दोन-तीन शिवाजी चौक पार करूनच कर्नाटकात प्रवेश होतो. 

एकूण चार तासाच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात झेंडूची आणि उसाची  शेती दिसली. पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक शेतांमध्ये खड्डे खणून त्यात पॉलीथीन अंथरून त्यात पावसाचे पाणी अडवण्याची सोया केली होती, जी महाराष्ट्रातआढळली नाही. सकाळची वेळ असल्याने बस वेगाने अंतर कापत होती. बसमधून प्रवास करत असताना गंमत म्हणजे सगळेच कन्नड बोलत होते आणि तेही तारसप्तकात त्यामुळे अगदीच मज्जा येत होती.

विजापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर अजून एक बाब समोर आली ती म्हणजे गावात अजूनही घरोघरी शौचालय नाहीत. कारण सकाळीच वेळ असल्याने सगळे रस्त्याच्या कडेला प्रातर्विधी उरकत होते. मजल दरमजल करत विजापूर शहर जवळ येत आहे हे आजूबाजूला कॉलेज आणि शाळांच्या गर्दीवरून कळलं. विजापूरला पूर्ण शहरही म्हणता येणार नाही आणि गावही. १०.१५ वाजता ठीक बस  विजापूर बस आगारात पोहोचली. लगेचच मी विजापूर ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे आदिलशाही राजवट आणि त्यांच्या आज उरलेल्या पाऊलखुणा त्यांची यादी काढली आणि सर्वप्रथम असर महाल बघायचं ठरवलं. बस आगारापासूनपासून साधारण २ किमी अंतरावर असलेला हा १६४६ साली बांधलेला  महाल आदिलशाहीचं न्यायालय होत. विजापूरच्या आर्थिक, सामाजिक गोष्टींची अभ्यास करायचा होता, त्यामुळे चालतच जायचं ठरवलं. चालल्याने अनेक गोष्टी समजायला मदत होते.

विजापूर हे जिल्ह्याचं शहर असल्याने घरे आणि इतर गोष्टींचा विचार करता घरं row-houses जास्त आहेत. चाळ संस्कृती दिसली नाही. एकूण बघता शहराचे मुख्य रस्ते स्वच्छ असून पदपथ चालण्याजोगे आहेत. २० मिनिट चालल्यानंतर google map आणि लोकांच्या मदतीने असर महालला पोहोचलो.तिथे एक केअर टेकर आहे जो वास्तूची जुजबी माहिती देतो.

आदिलशाहीच्या कोर्टाची जागा फारच भव्य आहे. किमान ५०-६० फूट उंचावर मजला आहे. तो पूर्ण मजला सागाच्या लाकडाने नाजूक कोरीवकामाने बनवला आहे. मुख्य वस्तूला लागूनच तलाव आहे. त्याला लागूनच फाशी देण्याचं ठिकाण आहे. पूर्ण वास्तूच्या आजूबाजूला बाग आहे. स्थानिक शाळा- कॉलेज मधली मुलं इकडे गप्पा मारत बसलेली असतात. कधी काळी ज्या वास्तूत परवानगीविना बोलता येत नव्हतं त्याच वास्तूत ते मुक्तपणे गप्पा मारत होते. तलावातील हिरव्या पाण्यात पडलेली असर महालच प्रतिबिंब बघण्याजोगे आहे.

असर महालपासून २.५ किमी अंतरावर  विजापूरच्या इतिहासातील सर्वोत्तम वास्तू  आहे आणि ती म्हणजे गोल घुमट. इसवि सन १६५६ साली बांधून पूर्ण झालेली हो वस्तू म्हणजे मोहम्मद आदिलशाह आणि त्याच्या बेगमांची कबरीची जागा आहे. गोल घुमट बघण्यासाठी २५ रु  तिकीट आहे. मुख्य गेट बाहेर घोडागाड्या उभ्या आहेत ज्या तुम्हाला शहर दर्शन करवतात. वास्तूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न आहे. घुमटाच्या परिसरातील बागबगीच्यांची देखरेख  चांगल्या पद्धतीने होते. मूळ वास्तूच्या आधी अजून एक वास्तू आहे. ह्या इमारतीचा उपयोग आधी नगारखाना म्हणून होत असे. आता त्याचे रूपांतर वस्तुसंग्रहालयात झाले आहे. हिंदू, जैन, पर्शियन अशा विविध वस्तुंनी ताल मजला विभागला गेला असून पहिल्या मजल्यावर आदिलशाहीचा अतःपासून इतिपर्यंतचा  प्रवास  अनेक चित्र आणि वस्तूंमधून पाहायला मिळतो. संग्रहालयाच्या बाहेर ६ आदिलशाही तोफा आहेत. त्यावर सुंदर बारीक नक्षी काम केलेलं आपल्याला आढळत.वस्तुसंग्रहालयाला मागे टाकून दरवाज्यातून आत शिरल्यावर एक भव्य इमारत दिसते ती म्हणजे गोल घुमट. ७ मजली टोलेजंगी इमारत बघून आपण हरकून जातो. आता आपल्याला ७ मजले काहीच वाटत नाहीत, पण १६५६ साली ते टोलेजंगच होते. असं म्हणतात गोल घुमटाची रचना बघूनच शहाजहानला ताजमहाल बनवण्याची कल्पना सुचली. मुख्य घुमटाला चिकटून ४ मिनार आहेत. त्यामधील एका मिनारात वरती जाण्यासाठी जिने आहेत. भारतीय आणि मुघल शैलीतून झालेली वास्तूची घडण अगदी अव्वल दर्जाची आहे. घुमटाच्या खाली दोन बाजूला बारीक नक्षीकाम आपलं लक्ष वेधून घेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला दगडात गुंतागुंतीचं कोरीव काम केलं आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर मध्यभागी मोहम्मद आदिलशाह आणि त्याच्या बेगमांच्या कबरी आहेत. आत शिरल्यावर उजव्या बाजूने एक रस्ता जिन्याकडे जातो जो तुम्हाला वीसपेरिंग गॅलरीकडे घेऊन जातो. हे ७ मजले अतिशय थकवणारे आणि अरुंद आहेत. वरती गेल्यावर आपल्याला विजापूरचे विहंगम दृश्य दिसते. विसरपींग गॅलरीला गोल फिरत येत. ह्या गॅलरी मध्ये आपल्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकायला येतो. घुमटाच्या चोहोबाजूस असलेले मिनार वास्तूच्या सौंदर्यास अधिकच भर घालतात. गोल घुमट नुसताच भव्य नसून नाजूक आणि वैज्ञानिक करामतींनी भरलेला आहे. विजापूरचे सुंदर दृश्य डोळ्यात साठवून परत सात मजल्यांची कसरत करत खाली आलो. गोल घुमट आणि आजूबाजूचा परिसर पाहून होईतोवर दुपारचा १ वाजला होता. पोटात कावळे ओरडायला लागले होते. अजून दोन स्थळांना भेट द्यायची होती त्यामुळे पोटपूजा आवश्यक होती. पुढील वास्तू होती '१२ कमान'.

गोल घुमट ते १२ कमान हे अंतर २.२ किमीच आहे. google map वर रस्ता सुनिश्चित करून चांगल्या रेस्टॉरंट च्या शोधार्थ परत एकदा पायपीट करायला सुरुवात केली. चालत असताना वाटेत अनेक कणीस विकणाऱ्या गाड्या दिसल्या. आपल्याकडे बहुधा कणीस भाजून देतात पण इकडे उकडवून मिळतात. गोल घुमट ते बारा कमान हा मुख्य रस्ता असल्याने अनेक गोष्टी निदर्शनास आल्या; त्या म्हणजे विजापूर मध्ये खासगी वाहनांची संख्या तशी कमी जाणवली. स्थानिक लोक ksrtc च्या बसेसवर जास्त  अवलंबून आहेत. रिक्षाचं प्रमाणही बऱ्यापैकी आहे. सर्व रिक्षांवर एक अतिशय महत्वाची गोष्ट आढळून आली ती  म्हणजे प्रत्येक रिक्षावर परवाना क्रमांक, परवाना घेतल्याची तारीख आणि त्याची संपायची तारीख ह्याचे स्टिकर लावली होती. हा अतिशय स्तुत्य उपक्रम विनापरवाना रिक्षा चालकांवर चाप आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राबवल्यास बरीच पारदर्शकता येण्यात मदत होईल. योग्य रेस्टॉरंट पाहून पोटपूजा झाल्यावर बारा कमानकडे कूच केलं. आंबेडकर चौक नंतर उजव्या हाताला थोडं चालत गेल्यावर लगेचच बारा कमान वास्तू येते. गोल घुमट नंतर अतिशय वेगळी आणि सर्वोत्तम  अशी आदिलशाही राजवटीमधील वास्तू होता होता राहिली. अली आदिलशाह  आणि त्याच्या बेगम ह्यांच्या कबरीचं हे स्थान आहे. १०- १२ जिने साधून गेल्यावर एक मोठा चौथरा आहे ज्याच्या मध्यभागी आदिलशहाची कबर आहे. असं सांगितलं जात की ही वास्तू जर पूर्ण झाली असती तर गोल घुमटाचं महत्त्व कमी झालं असत. गृहकलहांमुळे एक उत्कृष्ट कलाकृती पूर्ण होता होता राहून गेली.

आता दुपारचे २ वाजले होते, पंढरपूरपर्यंत परत ४ तासांचा प्रवास असल्याने मला ३ ला निघणं गरजेचं होत. पण जाता जाता एक वास्तू बघायची होती. बारा कमान पासून अवघ्या ५ मिनिटाच्या अंतरावर असलेला गगन महाल. आदिलशाहीच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या वस्तूंपैकी एक वास्तू म्हणजे गगन महाल होय. ह्या वास्तूचा शाही निवासस्थान आणि दरबार अशा दोन्ही गोष्टींसाठी वापर होत होता.इसवी सन. १५६१ साली बांधलेली ही वास्तुसुद्धा गोल घुमट एवढीच भव्य आणि कोरीव नक्षी कामाने सजवलेली आहे. गगन महालाच्या आसपासचा परिसर बॅगेवचा असून स्थानिक लोक तिकडे आपला फावला वेळ शांतपणे घालवायला येतात. गगन महालाच्या बाहेर भेळ, पावभाजी अशा  अनेक  खाद्यपदार्थांच्या गाड्या आहेत. एकूण विजापूर फिरत असताना एक चांगली आणि महत्वाची गोष्ट जाणवली ती  म्हणजे इकडची लोक प्रेमळ आहेत. मदत करण्यास उत्साही असतात. हिंदी येत असल्याने भाषेचा एवढा प्रश्न येत नाही. शांत जीवन जगणं पसंत करतात. विजापूरसारख्या विविध लोकांनी नटलेल्या शहरात राजकीय पोस्टरबाजी दिसली नाही. दुपारचे ३ वाजले होते आणि माझी पावलं हळूहळू महाराष्ट्राकडे वळायला लागली...

- अमेय जोशी