नागपंचमी सणाची माहिती व इतिहास

नागपंचमीच्या दिवशी नागाची अथवा नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यासोबतच रात्री धूप, दीप व नैवद्य दाखवला जातो आणि त्या दिवशी नांगरणी, जमीन खणणे, भाजी चिरणे व हिंसा करणे निषिद्ध मानले जाते.

नागपंचमी सणाची माहिती व इतिहास

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारतीय सौरवर्षातील बारा महिन्यात श्रावण हा महिना अधिक पवित्र मानला जातो व श्रावण महिन्यापासूनच हिंदू धर्मियांच्या सणांची खऱ्या अर्थी सुरुवात होते. या श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीस असून या दिवशी नागाची घरोघरी पूजा केली जाते. नागास हिंदूंच्या धर्मशास्त्रात महत्वाचे स्थान असून नागाचे वास्तव्य अनेक देवतांच्या बरोबर असल्याचे पाहतो आणि नागास शेतकऱ्यांचा मित्रही म्हटले जाते कारण शेताची नासाडी करणारे उंदीर व इतर तत्सम प्राणी खाऊन नाग एकप्रकारे शेताचे रक्षण करतो.

नागपंचमी या सणाचे महत्व म्हणजे याच दिवशी कृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचा पराभव केला मात्र श्रीकृष्णास कालियाच्या फण्यावर उभा राहिलेले पाहून सर्वांना वाटले की कालियानेच श्रीकृष्णास वाचवले आणि लोकांनी त्याची पूजा करून त्यास दूध पाजले व या घटनेनंतर या दिवशी नागाची पूजा आणि त्यास दूध पाजण्याची परंपरा सुरु झाली.

नागपंचमी सणाची आणखी दुसरी प्रसिद्ध कथा म्हणजे भारतातील मणिपूर येथे फार पूर्वी एक शेतकरी होता व एके दिवशी तो आपले शेत नांगरत असताना शेतीखाली असलेल्या एका बिळातील नागिणीची सर्व पिल्ले नांगराच्या फाळाखाली आल्याने ठार झाली. नागिणीस ही गोष्ट समजल्यावर तिने बदला घेण्याचा निश्चय केला आणि तिने शेतकऱ्याचे घर गाठून शेतकऱ्यासहित त्याच्या कुटुंबातील इतर लोकांना दंश करून ठार मारले. 

असे असले तरी शेतकऱ्याची एक मुलगी तिच्या सासरी गेली होती त्यामुळे जिवंत राहिली मात्र नागिणीने शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्वांना संपवण्याचा पण केल्याने ती शेतकऱ्याच्या मुलीच्या सासरी जाण्यास निघाली. ज्यावेळी नागीण शेतकऱ्याच्या मुलीच्या घरी पोहोचली त्यावेळी तिने पहिले की शेतकऱ्याची मुलगी एका पाटावर नागाची प्रतिमा काढून तिची पूजा करीत होती. हे दृश्य पाहून नागिणीचा राग शांत झाला आणि तिने मुलीस आशीर्वाद देऊन तिचे वडील व इतर कुटुंबीय या सर्वांना पुन्हा एकदा जीवदान दिले व हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता व या घटनेपासूनच या दिवशी नागाची पूजा करण्याची प्रथा सुरु झाल्याचे म्हटले जाते. 

नागपंचमीच्या दिवशी नागाची अथवा नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यासोबतच रात्री धूप, दीप व नैवद्य दाखवला जातो आणि त्या दिवशी नांगरणी, जमीन खणणे, भाजी चिरणे व हिंसा करणे निषिद्ध मानले जाते. या दिवशी लहान मुले व स्त्रिया नागाची प्रतिमा तयार करून तिची पूजा करतात तर पुरुष एखाद्या वारुळाजवळ जाऊन त्याची पूजा करतात. तसेच पाटावर गंध, हळद, कुंकू, चंदन व केशर यांच्या मिश्रणाने पाच फणांचा नाग काढला जातो व त्याचे पूजन केले जाते. पूर्वी नागपंचमीस गावोगावी गारुडी त्यांच्या टोपलीत नाग घेऊन येत असत त्यामुळे नागरिकांना या नागाची पूजा करता येत असे मात्र सध्या गारुडी दृष्टीस पडत नाहीत.

नागपंचमीचा सण हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त भारतात उत्साहाने साजरा केला जातो. उत्तर भारतात नागपंचमीस गुडिया या नावानेही ओळखले जाते व उत्तर प्रदेशातील प्रयाग येथे वासुकेश्वर नावाचे मंदिर आहे तेथे नागपंचमीस मोठी यात्रा असते व या यात्रेस हजारो भावीण येतात व गंगेत स्नान करून नागांचा राजा वासुकीची पूजा करतात. महाराष्ट्राच्या सांगली जिल्यातील बत्तीस शिराळे येथेही नागपंचमीस खूप मोठा उत्सव असतो व या उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणाहून भाविक येत असतात.

मनुष्य प्राणी निर्माण झाल्यापासून तो जंगलात व कालांतराने गावात वास्तव्य करत असताना त्याचा सर्वाधिक संबंध हा सर्पांशी आला व सर्पांची विशिष्ठ आकृती व त्यांचे विष याबद्दल त्याच्या मनात भययुक्त कुतूहल होते व हे कुतूहल आधुनिक काळातही अनुवांशिक रित्या मनुष्यामध्ये असल्याने सर्पाची एका बाजूला पूजा केली जाते तर दुसऱ्या बाजूला सर्प दिसताच त्याची हत्या केली जाते मात्र सर्प हा मनुष्याचा शत्रू नसून फक्त त्यास छेडल्यासच तो फक्त आपल्या बचावासाठी मनुष्यावर हल्ला करतो आणि उंदीर घुशी इत्यादी उपद्रवी प्राणी खाऊन तर तो मनुष्यजातीवर उपकारच करतो हे सुद्धा नागपंचमीच्या निमित्ताने लक्षात घ्यावयास हवे.