नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन

श्रावण महिना हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र असा महिना. या महिनात सण, व्रतकैवल्ये इत्यादी मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील असाच एक महत्वाचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन.

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन
नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन

श्रावण पौर्णिमा हा दिवस भारतातल्या विविध भागात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. याच दिवशी संपूर्ण भारतात बहिणीकडून भावास राखी बांधून ओवाळले जाते त्यामुळे हा दिवस राखी पौर्णिमा अथवा रक्षाबंधन म्हणूनही प्रसिद्ध आहे. देशाच्या काही भागात या दिवशी लोक आपल्या गळ्यात, बोटात किंवा मनगटावर सुताच्या धाग्याचे पोवते बांधतात त्यामुळे या दिवसास 'पोवती पौर्णिमा' म्हणूनही ओळखले जाते.

कोकण व समुद्रकिनाऱ्यास लागून असलेल्या प्रदेशातील रहिवाशी या दिवशी आपला पाठीराखा असणाऱ्या समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. समुद्र हा कोकणातील लोकांचा जणू कृपाळू देवच. कोळ्यांचे समस्त आयुष्यच या समुद्राच्या साथीने सुरु असते. समुद्रमार्गे देशोदेशीहून मालाची ने आण अविरत रित्या सुरु असल्याने व्यापारी लोकांचा सुद्धा समुद्र हा एक महत्वाचा घटक आहे त्यामुळे समुद्रावर खऱ्या अर्थी अवलंबून असलेले लोक या दिवशी विधिवत समुद्रास नारळ अर्पण करतात. काही श्रीमंत भाविक यावेळी सोन्याचा अथवा चांदीचा नारळ तयार करून समुद्रास अर्पण करतात.

खरे तर नारळी पौर्णिमेच्या आधीचे काही महिने पावसाळा सुरु असल्याने समुद्र हा खवळलेला असतो त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीस बंदी असते. याच काळात समुद्राच्या अंतर्भागात प्रचंड वादळे, भरती याशिवाय माशांचे प्रजनन सुरु असते त्यामुळे या काळात समुद्रात केलेला प्रवास धोकादायक असतोच मात्र माशांच्या वाढीसही प्रतिकूल ठरू शकतो. त्यामुळे पूर्वापार कोळीबांधव पावसाचे चार महिने समुद्रात न जाण्याची परंपरा पाळतात.

नारळी पौर्णिमेस पावसाळ्याचा जोर कमी होऊन समुद्र शांत होतो आणि कोळी बांधव पुन्हा एकदा समुद्रात आपली नौका घेऊन जाण्यास सज्ज होतो त्यामुळे समुद्रात पुन्हा एकदा संचारास सुरुवात करण्यापूर्वी या समुद्र देवतेस मान देणे गरजेचे असते व हा मान देण्याचा पवित्र दिवस म्हणजेच नारळी पौर्णिमा.

श्रावण पौर्णिमेचा हा दिवस नारळी पौर्णिमेसोबत रक्षाबंधनाचा दिवस म्हणूनही प्रसिद्ध आहे. या दिवशी पूर्वी रेशमाच्या सुताची राखी करून ती बहिणीने भावाला बांधायची असते. ही राखी म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची घेतलेली जबाबदारी असते. रक्षाबंधनाचा हा दिवस फक्त हिंदू धर्मियांनाच नव्हे तर इतर धर्मातील नागरिकांना सुद्धा भुरळ घालतो कारण बहीण व भावांमधील पवित्र नात्याचा हा सण आहे. 

असे म्हणतात की फार पूर्वी गुजरातची राणी कर्मवती हिने हुमायून या राजास राखी पाठवली होती व हुमायूननेही ही राखी स्वीकारून एक बंधू म्हणून कर्मवतीच्या राज्याच्या रक्षणाची जबाबदारी आपल्याकडे घेतली. 

तर हे होते श्रावण पौर्णिमेचे अर्थात नारळी पौर्णिमा व राखी पौर्णिमेचे महत्व. नारळी पौर्णिमेस नागरिक हे आपला पाठीराखा असलेल्या समुद्रास नारळ वाहून आपले रक्षण करण्याची प्रार्थना करतात तर राखी पौर्णिमेस बहीण भावास राखी बांधून आपल्या रक्षणाची हमी घेते. त्यामुळे एकाच दिवशी असलेल्या या दोन्ही सणांचे महत्व समांतर असेच आहे.