काळकर्ते शिवराम महादेव परांजपे

स्वातंत्र्यपूर्व भारतात पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या कल्पनेचा पुरस्कार करणारे एक आद्य पुरस्कर्ते म्हणजे काळकर्ते शिवराम महादेव परांजपे.

काळकर्ते शिवराम महादेव परांजपे

शिवराम परांजपे हे पत्रकार होतेच मात्र याव्यतिरिक्त एक लेखक, वक्ता व राष्ट्रसेवक अशा भूमिकांमध्येही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सर्वत्र पाडली. शि. म. परांजपे यांचा जन्म १८६४ साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे झाला. लहानपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धी असल्याने शिवराम यांनी इंग्रजीत शिक्षण घ्यावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती मात्र महाडला तेव्हा इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती त्यामुळे शिवराम परांजपे यांच्या वडिलांनी त्यांना इंग्रजी शिक्षणाकरिता रत्नागिरीच्या शाळेत घातले.

शि. म. परांजपे हे मुळात हुशार असले तरी बालवयात त्यांचा स्वभाव थोडा अल्लड असल्याने शाळेला दांडी मारून भटकत बसणे व हुडपणा करणे याशिवाय पोहायला जाणे अथवा झाडावर चढून बसणे यातच ते जास्त रमत. 

शि. म. परांजपे लहान असताना विष्णुशास्त्री चिपळूणकर हे व्यक्तिमत्व प्रख्यात होते. पुण्यात त्यांनी सुरु केलेल्या न्यू इंग्लिश स्कुलची ख्याती रत्नागिरीत शि. म. परांजपे यांच्या व त्यांच्या मित्रांच्या कानावर आली आणि एक दिवस ते आपल्या मित्रांसोबत रत्नागिरीहून थेट पुण्यास पळाले व न्यू इंग्लिश स्कुल मध्ये प्रवेश करते झाले. 

शि. म. परांजपे यांच्या घरच्या मंडळींसाठी हा धक्का अनपेक्षित होता मात्र न्यू इंग्लिश स्कुल मध्ये प्रवेश घेतल्यावर शि. म. परांजपे यांच्यातील हुडपणा जाऊन तेथे त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण झाली. इंग्लिश शिकत असताना ते संस्कृत भाषेतही रस घेऊ लागले.

न्यू इंग्लिश स्कुल मध्ये शि. म. परांजपे यांची अभ्यासातील प्रगती पाहून त्यांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज सर्व शिक्षकांना आला व यामुळे त्यांची पाचवी इयत्तेतून थेट सातव्या इयत्तेत बढती करण्यात आली. १८८४ साली शि. म. परांजपे मॅट्रिक झाले व त्यांनी जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवली. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर असल्याने स्वातंत्र्य व राष्ट्रभक्तीचे बीज त्यांच्या मनात रुजले व पुढील आयुष्य राष्ट्रवादाचा प्रचार करण्यात व्यतीत करावे या ध्येयाने त्याना भारले.

मॅट्रिक झाल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व एक वर्षांनी डेक्कन विद्यापीठात त्यांनी बी.ए. व दोन वर्षांनी एम.ए. ची पदवी प्राप्त केली. घरची परिस्थिती गरीब असल्याने शिक्षण घेत असताना मिळालेली बक्षिसे व शिष्यवृत्त्या यावर त्यांनी आपले सर्व शिक्षण पूर्ण केले. बी.ए. च्या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि एम.ए. च्या परीक्षेत 'झाला वेदांत प्राईज' हे बक्षीस व अनेक शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या. 

शिक्षण पूर्ण झाल्यावर जे सरकार ब्रिटिशांचे आहे त्या सरकारी खात्यात काम करायचे नाही असे ठरवून त्यांनी महाराष्ट्र कॉलेज मध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम सुरु केले. दोन वर्षे प्राध्यापकाची नोकरी केल्यावर लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राष्ट्रीय चळवळीत प्रवेश केला.

सुरुवातीस व्याख्याने, लिखाण, प्रवचन इत्यादी कार्यातून त्यांनी राष्ट्रवादाचा विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला मात्र यापेक्षाही काहीतरी वेगळे माध्यम हवे असा विचार करून १८९८ साली त्यांनी काळ या वृत्तपत्राची निर्मिती केली. 

काळ वृत्तपत्राने १२ वर्षे स्वातंत्र्याचे जळजळीत विचार मांडून देशभक्तीचे अंजन जनतेच्या डोळ्यात घालून त्यांना जागे करण्याचे कार्य केले. मात्र १९०८ साली त्यांच्यावर ब्रिटिश सत्तेविरोधात लेख लिहिल्यामुळे राजद्रोहाचा खटला दाखल झाला व त्यामध्ये त्यांना १९ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

काळ या वृत्तपत्राची प्रसिद्धी एवढी होती की त्याचा खप हा त्याकाळी केसरीच्या बरोबरीने होत असे मात्र १९१० साली जामीनाकरिता लागणाऱ्या प्रचंड रकमेमुळे नाईलाजास्तव हे वृत्तपत्र बंद करावे लागले व खऱ्या अर्थी काळाचा दुर्दैवी अस्त झाला.

१८ महिन्यांच्या तुरुंगवासात झालेले हाल व काळ हे प्राणप्रिय दैनिक बंद पडल्याने शिवराम परांजपे यांची प्रकृती बिघडू लागली याशिवाय १९२० साली देशात अनेक गोष्टींमध्ये शैथिल्य निर्माण झाल्याने कुठली महत्वाची चळवळही सुरु नव्हती मात्र या काळातही शिवराम परांजपे यांनी काळाची पाऊले ओळखून राजकीय जागृती करण्याचा खूप प्रयत्न केला व याच काळात त्यांनी अनेक ग्रंथ सुद्धा लिहिले.

पुढे असहकार चळवळीचा उगम झाला व चळवळीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरु केले. याच काळात त्यांनी मुळशी सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला व दुसऱ्यांदा कारावासही भोगला. यावेळी त्यांना सहा महिन्याची शिक्षा झाली आणि तुरुंगात त्यांचे खूप हाल झाले. तुरुंगातून मुक्तता झाल्यावरही स्वस्थ न बसता नेहरू रिपोर्ट प्रचारकार्य, सायमन गो बॅक मोहीम इत्यादी कार्यांत भाग घेतला. 

१९२८ साली पुण्यास भरलेल्या महाराष्ट्र प्रांतिक परिषदेचे ते स्वागताध्यक्ष होते व त्याच वर्षी बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पुढे एकाच वर्षांनी म्हणजे २७ सप्टेंबर १९२९ साली शिवराम परांजपे यांचे निधन झाले व एका असामान्य पत्रकाराचा, लेखकाचा, वक्त्याचा, स्वातंत्र्यसैनिकांचा व खऱ्या अर्थाने काळकर्त्याचा अस्त झाला.