वटपौर्णिमा - भारतीय कुटुंबसंस्थेचा उत्सव

महाराष्ट्रातील सुवासिनींचा एक प्रमुख सण म्हणजे वटसावित्री अथवा वटपौर्णिमा. हा सण ज्येष्ठ शुद्ध १५ या दिवशी साजरा केला जातो.

वटपौर्णिमा - भारतीय कुटुंबसंस्थेचा उत्सव

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाखाली एकत्र येऊन वडाची पूजा करतात व उपवास करून सती सावित्रीच्या आख्यानाचे पठण करितात.

वटपौर्णिमा या सणाची उत्पत्ती सावित्री व सत्यवान यांच्या चरित्रावर आधारित आहे. प्राचीन काली मद्र नामक देशात अश्वपती नावाचा एक राजा होता. सुरुवातीस त्यास मुलबाळ नव्हते मात्र ईश्वराच्या कृपेने पुढे त्यास एक कन्यारत्न प्राप्त झाले. या कन्येचे नाव त्याने सावित्री ठेवले. अश्वपतीने आपल्या कन्येचाच पुत्राप्रमाणे सांभाळ करून तिला सर्व प्रकारचे शिक्षण दिले. 

सावित्री ही सुशिक्षित होतीच मात्र धर्मपालक सुद्धा होती त्यामुळे राज्यातील सर्व प्रजा तिचा आदर करत असे व तिला तेजस्विनी या नावाने सुद्धा संबोधित असे. कालांतराने सावित्री उपवर झाली त्यामुळे राजाने तिचा विवाह करण्याचे ठरविले मात्र सावित्रीचे तेज पाहून कुणीही राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजावत नव्हता कारण प्रत्येकास सावित्रीविषयी नितांत आदर वाटे त्यामुळे सावित्रीसारख्या सद्गुणी, सदाचरणी व धार्मिक स्त्रीसोबत विवाह करण्याची आपली पात्रता नाही असेच प्रत्येकास वाटे.

या सर्व गोष्टींमुळे राजा अश्वपती चिंतातुर झाला व विचार करून त्याने शेवटी सावित्रीलाच आपल्या पतीची निवड करण्याची विनंती केली. पित्याच्या आदेशाप्रमाणे सावित्री आपल्या राज्यातील एका वृद्ध मंत्र्यांस सोबत घेऊन पतीचा शोध घेण्यासाठी निघाली. वर संशोधनासाठी तिने अनेक राज्ये व नगरे पालथी घातली मात्र तिला तिच्या अनुरूप असा एकही वर मिळाला नाही.

त्या काळी शाल्व या देशाचा राजा ध्युमत्सेन हा राज्यभ्रष्ट होऊन घनदाट अशा अरण्यात राहत होता. वृद्ध झाल्यामुळे त्यास आंधळेपण प्राप्त झाले होते मात्र तो या अरण्यात एक आश्रम बांधून त्यात ईश्वराची तपश्चर्या करीत दिवस कंठीत असे. ध्युमत्सेन राजाला सत्यवान नावाचा एक सद्गुणी व सदाचरणी पुत्र होता. एक दिवस सावित्री वराचा शोध घेत घेत ध्युमत्सेनच्या आश्रमात आली व सत्यवानाचे तेज पाहून भाळून गेली व हाच आपला होणारा पती हे तिने ओळखले.

यानंतर ती पुन्हा आपल्या राज्यात गेली व आपल्या वडिलांना सत्यवानाबद्दल सांगितले. राजास हे ऐकून खूप आनंद झाला व त्याने लग्नाची जय्यत तयारी सुरु केली.  लग्नाचे दिवस असताना नारदमुनी हे तेथे आले व त्यांनी राजास शुभेच्छा देऊन सावित्रीबद्दल विचारणा केली तेव्हा राजाने नारदमुनींना सत्यवानाविषयी सांगितले. मात्र हे ऐकून नारदमुनी खिन्न झाले व राजास म्हणाले की सत्यवान अतिशय गुणी व सदाचरणी आहे मात्र दुर्दैवाने तो अल्पायुषी असून त्याचे आयुष्य आणखी एक वर्षाचं उरले आहे त्यामुळे सावित्रीने त्याच्यासोबत विवाह करण्याचा विचार सोडून दुसरा पती शोधावा.

राजास हे ऐकून खूप दुःख झाले मात्र अल्पायुषी पुरुषाबरोबर एकुलत्या एक कन्येचे लग्न लावून देऊन तिला विधवा करणे त्याच्या मनास मानवेना म्हणून त्याने सर्व गोष्ट सावित्रीच्या कानावर घातली मात्र सावित्री आपल्या निश्चयाची पक्की होती तिने सत्यवान सोबतच विवाह करण्याचा निर्धार आपल्या पित्याकडे व्यक्त केला तेव्हा पित्याचा नाईलाज होऊन त्याने सावित्री व सत्यवानाचे लग्न थाटामाटाने लावून दिले.

पित्यास आनंद व्हावा म्हणून लग्नात सावित्रीने खूप सारे दागिने घातले होते मात्र लग्न समारंभ उरकल्यावर राजा व इतर मंडळी पुन्हा राजधानीस परतले तेव्हा सावित्रीने आपले सर्व अलंकार काढून ठेवले व ती एखाद्या योगीनेप्रमाणे अरण्यातील दिवस आनंदाने जगू लागली. पती व सासू सासऱ्यांची सेवा करणे व धार्मिक कार्यात मग्न राहणे यात तिचा वेळ खूप उत्तम रित्या जाऊ लागला आणि आपल्या सेवेने तिने पती व सासू सासरे यांची मर्जी सुद्धा संपादन केली.

याप्रमाणे दिवस आनंदात जात होते तरी नारदमुनींच्या म्हणण्यानुसार पतीचा अंतिमकाल समीप आला आहे या जाणिवेने ती चिंतेत होती मात्र तरीही ती न डगमगता संसारकार्य करीत होती. बघता बघता सत्यवानाच्या मृत्यूस फक्त चार दिवसच उरले, सावित्रीने मनाशी ठरवले आणि तिने कडकडीत उपवास सुरु केला. हे व्रत एवढे कडक होते की तिने झोपेचाही त्याग केल्याने तिच्या शरीरातील त्राण नाहीसे झाले. अखेरीस सावित्रीच्या व्रताचा चौथा दिवस उजाडला. 

रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात गेला मात्र त्याच्यासोबत सावित्रीही गेली. वनात लाकडे गोळा करता करता सत्यवानाची शुद्ध हरपली व तो जमिनीवर कोसळला. सावित्रीने त्यास मांडीवर घेतले व उठवण्याचा प्रयत्न करू लागली मात्र लवकरच तिला समजून चुकले की सत्यवानाचा मृत्यू झाला आहे. इतक्यात सावित्रीस समोरून एक दिव्य अशी व्यक्ती येताना दिसली. तो साक्षात यमराज होता. यमराजाने सत्यवानाचे प्राण ताब्यात घेतले व तो परत यमलोकात जाऊ लागला तेव्हा सावित्री यमराजाच्या मागे मागे जाऊ लागली. 

हे पाहून यमराज थांबला व सावित्रीस म्हणाला की सावित्री तू खूप सुशील व पतिव्रता आहे त्यामुळे तुझ्यावर मी प्रसन्न आहे मात्र सत्यवानाच्या प्राणांखेरीज तुला जे हवे ते माग, मी नक्की तुझी इच्छा पूर्ण करेन. 

सावित्रीने क्षणभरही विचार न करता आपल्या सासऱ्याची दृष्टी व राज्य परत मागितले व तिसरी व अत्यंत महत्वाची इच्छा म्हणजे तिने स्वतःस पुत्र व्हावा अशी इच्छा यमराजाकडे व्यक्त केली. यमराजाने तथास्तु म्हटले व तो यमलोकास निघून गेला.

सावित्रीच्या तिसऱ्या इच्छेनुसार जर तिला पुत्र हवा असेल तर त्यासाठी सत्यवानाचे जिवंत असणे आवश्यक होते त्यामुळे ती त्वरित सत्यवानाच्या मृत शरीराकडे गेली व त्याचे डोके मांडीवर घेतले. काही क्षणांतच सत्यवानाचे प्राण त्याच्या शरीरात परत आले व तो जिवंत झाला. सत्यवानास घेऊन ती आश्रमात गेली त्यावेळी तिच्या सासऱ्यास दृष्टी सुद्धा प्राप्त झाली होती. सासऱ्याने हे सर्व कसे झाले हे सावित्रीस विचारले तेव्हा सावित्रीने सासऱ्यास सर्व घटना सांगितली आणि दुसऱ्याच दिवशी शाल्व देशाचा मंत्री आश्रमात आला व त्याने राजास पुन्हा राज्याच्या सिंहासनावर स्थानापन्न व्हा अशी विनंती केली. या प्रमाणे सावित्रीने आपल्या पतीसाठी केलेले व्रत सफल झाले आणि यानंतर सावित्री आपला पती सत्यवान व सासू सासऱ्यांसहित शाल्व देशात जाऊन सुखाने नांदू लागली.

सती सावित्रीच्या या कथेपासून स्त्रीने ठरविले तर ती कुठलेही कठीण कार्य पार पडू शकते असा बोध घेता येतो. पातिव्रताधर्माची सावित्री ही आदर्श असल्याने प्रत्येक भारतीय कन्येस तू सावित्री हो असा आशीर्वाद दिला जातो. ज्यावेळी सत्यवानाचे प्राण गेले त्यावेळी सावित्री त्याचे शीर मांडीवर घेऊन वडाच्या झाडाखाली अर्थात वटवृक्षाखाली बसली होती त्यामुळे वटपौर्णिमेस वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. आपल्या धर्मशास्त्रात वड, पिंपळ, औदुंबर या वृक्षांना खूप महत्व आहे. प्राणवायू निर्मिती व निसर्गरक्षणाच्या बाबतीत ही झाडे खूप महत्वाची आहेत. वडाच्या पारंब्या जमिनीत मूळ धरून त्यापासून अनेक नव्या वृक्षांची निर्मिती होते त्यामुळे वटवृक्ष हा संसारवृक्षाचे प्रतीक आहे त्यामुळे वटपौर्णिमा हा उत्सव हा भारतीय कुटुंब पद्धतीचे प्रतीक आहे.