आषाढी एकादशी चे महत्व

आषाढ शुद्ध ११ या दिवशी येणाऱ्या एकादशीस 'शयनी एकादशी' असेही म्हटले जाते कारण या दिवशी भगवान विष्णू शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीस ते शयनातून जागे होतात त्यामुळे कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी या नावाने ओळखले जाते.

आषाढी एकादशी चे महत्व
आषाढी एकादशी चे महत्व

शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीस एकादशी असे म्हटले जाते. सर्व एकादशींपैकी आषाढ व कार्तिक महिन्यांच्या शुक्ल पक्षातील एकादशी या अधिक महत्वाच्या मानल्या जातात. या दोन्ही एकादशी महाएकादशी या नावाने ओळखल्या जातात. आषाढ शुद्ध ११ या दिवशी येणाऱ्या एकादशीस 'शयनी एकादशी' असेही म्हटले जाते कारण या दिवशी भगवान विष्णू शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीस ते शयनातून जागे होतात त्यामुळे कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी या नावाने ओळखले जाते.

एकादशी महात्म्याची कथा प्रसिद्ध आहे त्यानुसार प्राचीन काळी मृदुमान्य नामक एक राक्षस होता ज्याने भगवान शंकरास प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरत्वाचा वर मागितला. त्यावेळी भगवान शंकराने त्यास असा वर दिला की एका स्त्री शिवाय तुला दुसऱ्या कुणाच्याही हातून मृत्यू येणार नाही. अमरत्वाचे वरदान मिळाल्याने मृदुमान्य राक्षस जनतेस छळू लागला. 

देव दानवांच्या लढाईत या वरामुळे दानवांचे पारडे जड झाले व देवांचा राक्षसांकडून पराभव होऊ लागला. सर्व देव भगवान विष्णूंना भेटावयास गेले व आपले गाऱ्हाणे सांगितले त्यानंतर भगवान विष्णू ही समस्या घेऊन भगवान शंकरांना भेटावयास गेले. 

मात्र भगवान शंकरानी स्वतःच अमरत्वाचा वर मृदुमान्यास दिल्याने त्यांनाही या संकटावर काही उपाय सुचेना. कालांतराने मृदुमान्याचा जोर एवढा वाढला की तो थेट ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्तींवरच चाल करून गेला. त्यावेळी तिन्ही देवता एका गुहेत मृदुमान्य राक्षसाच्या परिपत्याचा विचार करीत होत्या. या गुहेच्या बाहेर जाऊन मृदुमान्याने गुहेचे द्वार बंद करून तिन्ही देवतांना गुहेत बंद करून टाकले.

मृदुमान्य राक्षसाने तब्बल तीन दिवस त्रिमूर्तींना गुहेत बंद केल्याने त्यांना गुहेत तीन दिवस उपवास घडला व यानंतर त्रिमूर्तींच्या श्वासापासून एक स्त्री देवता निर्माण झाली जिचे नाव होते एकादशी. एकादशी प्रकट झाल्यावर भगवान शंकरांनी एका स्त्री कडूनच मृदुमान्याचा मृत्यू होईल असा वर दिल्याने तिने गुहेबाहेर पडून राक्षसाचा वध केला व देवतांना राक्षसांच्या कचाट्यातून मुक्त केले. 

त्यामुळे एकादशीच्या दिवशी उपवास करून ईश्वराचे चिंतन केल्यास दुःखाचे हरण होते असे म्हटले जाते. एकादशीचे महत्व पुराणांतरी अनेकदा वाचावयास मिळते. महाराष्ट्रात भागवत धर्माची स्थापना १३ व्या शतकात झाली, पूर्वी भागवत धर्मास वासुदेव धर्म असे म्हटले जायचे. भागवत धर्म हा एक धार्मिक क्रांती म्हणून ओळखला जातो कारण ईश्वरास सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या धर्माने केले. याच भागवतधर्माचे पालन करणाऱ्या जनतेस वारकरी म्हटले जाते.

महाएकादशीचा दिवस हा वारकरी संप्रदायाचा सर्वात महत्वाचा दिवस. संत ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम पंढरीच्या वारीची सुरुवात केली त्यानंतर ही परंपरा संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत जनाबाई, संत सेना महाराज, संत गोरा कुंभार, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत नरहरी सोनार, संत निवृत्तीनाथ, संत मीराबाई, संत मुक्ताई, संत सावता माळी, संत सोयराबाई यांनी जपली व आजही ही परंपरा अखंडित आहे.

महाएकादशीच्या दिवशी दिंड्या व पताके घेऊन टाळ व मृदूंगाच्या गजरात पांडुरंगाचे नाव घेत वारकरी भक्तगण पंढरीची पायी वारी करतात. महाराष्ट्राच्या विविध भागातून अदमासे ८० दिंड्या आषाढी एकादशीस पंढरपुरास जातात. 

चातुर्मासाच्या व्रतास आषाढी एकादशीपासून सुरुवात होते. काही भाविक या दिवसापासून कांदा, लसूण, वांगी इत्यादी पदार्थांचे सेवन पुढील चार महिने वर्ज्य करितात. आषाढी एकादशीच्या दिवशी गीतेच्या ९ व्या अध्यायाचे व कार्तिकी एकादशीच्या दिवशी गीतेच्या १५ व्या अध्यायाचे पठण केले जाते. आषाढी व कार्तिकी या दोन महाएकादशी या खऱ्या अर्थी महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचे स्मरण करण्यासाठी योग्य असे दिवस आहेत.