पर्वती - पुण्याची शान

पुण्याची शान म्हणजे पर्वती नावाची विद्यमान पुणे शहराच्या मध्यभागी असणारी निसर्गरम्य टेकडी.

पर्वती - पुण्याची शान
पर्वती

एखादा मनुष्य पुण्यात राहतोय आणि त्याने पर्वती एकदाही पहिली नाही असे सहसा होत नाही आणि पुण्यात राहूनही पर्वती पाहिली नाही तर त्याने पुणे पाहिलेच नाही असेच समजले जाते. अशी ही पुण्याची शान म्हणजे पर्वती नावाची विद्यमान पुणे शहराच्या मध्यभागी असणारी निसर्गरम्य टेकडी.  पुण्यातील हे अतिशय रमणीय गिरिस्थान समुद्रसपाटीपासून अदमासे ६०० मीटर व पायथ्यापासून अदमासे २६० फूट इतक्या उंचीवर आहे. 

पर्वती हे गिरिस्थान आहेच याशिवाय ते एक धार्मिक स्थळ सुद्धा आहे. पार्वतीच्या माथ्यावर दाखल होण्याकरिता एकूण १०८ पायऱ्या चढावयास लागतात. या पायऱ्या अतिशय रुंद असून भक्कम अशा पाषाणाचा वापर करून बनवल्या आहेत. पूर्वी पायथ्याहून माथ्यावर थेट हत्ती जात असे त्यामुळे तो विचार करून या पायऱ्या बनवण्यात आल्या होत्या. एका जुन्या दंतकथेनुसार इंग्लडचा राजा सातवा एडवर्ड हत्तीवर बसून पर्वतीच्या माथ्यावर जात होता अशावेळी पायऱ्यांवरून जात असताना हत्ती घसरला होता मात्र सुदैवाने राजाला फारशी इजा झाली नाही.

भव्य अशा या टेकडीच्या माथ्यावर देवदेवेश्वर, गणपती, पार्वती, कार्तिक स्वामी, विष्णू खूप सुंदर अशी देवालये आहेत. येथील सर्वात मोठे देवालय म्हणजे देवदेवेश्वर मंदिर. या मंदिराच्या चारही बाजूंस सूर्य, गणेश, अंबा व विष्णू यांची लहानशी देवालयेसुद्धा आहेत. देवळाच्या पश्चिमेस कार्तिक स्वामींचे देवालय असून  पलीकडे विष्णूचे देवालय आहे. 

हे स्थळ बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांचे आवडीचे ठिकाण असून या स्थानाच्या विकासात त्यांचे खूप योगदान होते. या ठिकाणच्या माहात्म्याविषयी अनेक दंतकथा आहेत त्यापैकी एक म्हणजे बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई यांना वार्धक्यात पायाची पीडा झाली होती अशावेळी फार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या या टेकडीवरील पार्वती देवीस नानासाहेबांनी नवस केला व आपल्या आईची पीडा लवकर दूर व्हावी अशी प्रार्थना देवीकडे केली. याचा योग्य तो परिणाम होऊन काशीबाई बऱ्या झाल्या व यानंतर या स्थानाची महती नानासाहेब याना पटून त्यांनी पर्वती देवीचे फार भव्य देवालय या ठिकाणी बांधले. दर एकादशीस देवीच्या दर्शनास जाण्याचा नानासाहेब यांचा प्रघात होता. विरंगुळ्यासाठी त्यांनी याच टेकडीवर भव्य वाडा सुद्धा बांधला होता आणि पानिपताच्या दुर्दैवी घटनेनंतर याच वाड्यात शोक करून करून त्यांचा मृत्यू झाला. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या अंतिम समयी नानासाहेबांना बाजूस बसवले होते यावेळी नानासाहेबांनी त्यांच्या पादुका त्यांची स्मृती कायम सोबत रहावी यासाठी आपल्यासोबत पुणे येथे नेऊन पर्वतीस या पादुकांचे मंदिर बांधले. 

तर असे हे पर्वतीचे माहात्म्य. दररोज शेकडो पुणेकर पहाटे आरोग्य राखण्याकरिता पर्वतीस येत असतात. येथील हवा अतिशय शुध्द असल्याने अनेक विकार बरे होण्याची क्षमता या टेकडीच्या आसमंतात आहे असा अनेकांचा अनुभव आहे. पर्वतावरून चोहो बाजूंस पसरलेल्या विस्तीर्ण पुणे शहराचे खूप छान दर्शन होते. दिवाळीच्या रात्री या टेकडीवरून खाली शहरामधील दीपोत्सवाचा व रोषणाईचा आनंद घेण्याची मजा औरच असते. त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्वती ही पुण्याची शान आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.