यमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान

उत्तर भारताची जीवनदायिनी आणि गंगा नदीची सहायक अशा या यमुना नदीस उत्तर भारतात जमुना या नावानेही ओळखले जाते व या नदीचे उगमस्थान हिमालयात समुद्रसपाटीपासून अदमासे १०८०४ फूट उंचावर आहे.

यमुनोत्री - यमुना नदीचे उगमस्थान
यमुनोत्री

भारत देशाच्या नदीमहात्यात गंगा नदीसहित यमुना नदीस अत्यंत महत्वाचे स्थान आहे. १३७६ किलोमीटर लांब अशी ही यमुना नदी पश्चिम हिमालयातून बाहेर निघते आणि उत्तर प्रदेश तसेच हरियाणाच्या सीमाप्रदेशावर ९५ मैलांचा प्रवास करते आणि उत्तर सहारनपूर या सपाट प्रदेशात पोहोचून दिल्ली, आग्रा मार्गे प्रयागराज येथे गंगा नदीला मिळते.

उत्तर भारताची जीवनदायिनी आणि गंगा नदीची सहायक अशा या यमुना नदीस उत्तर भारतात जमुना या नावानेही ओळखले जाते व या नदीचे उगमस्थान हिमालयात समुद्रसपाटीपासून अदमासे १०८०४ फूट उंचावर आहे. या लेखात आपण यमुना नदीच्या उगमस्थानाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

यमुनेचे उगमस्थान हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी या जिल्ह्यात असून या स्थानास जमनोत्री अथवा यमुनोत्री या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी हिमालय पर्वतातील बंदरपौच नावाचे एक शिखर असून त्याची उंची समुद्रपाटीपासून ६३१६ मीटर आहे. बंदरपौच येथून यमुना नदीचा उगम पूर्वी स्पष्ट दिसून येत असे. ब्रिटिश परकीय असले तरी त्यांना येथील संस्कृती जाणून घेण्याची आवड असल्याने त्यांच्या मार्फत विस्मृतीत गेलेली अनेक ठिकाणे प्रकाशझोतात आणली गेली.

यमुनोत्रीच्या वरील पर्वत अतिशय बर्फाच्छादित असून यमुनोत्रीच्या खाली एक डोंगर आहे व त्या डोंगराच्या कड्याच्या खाली एक छोटे गावं आहे. या कड्यावरून हिमालय पर्वतातील पाण्याचे असंख्य प्रवाह खाली कोसळत असतात आणि पायथ्याशी असलेल्या खेड्यातील एका मोठ्या कुंडात जमा होत असतात आणि हे कुंड म्हणजेच यमुना नदीचे उगमस्थान यमुनोत्री आहे. यमुनोत्री येथील यमुनेच्या उगमस्थानावर एकोणिसाव्या शतकात उभारले गेलेले एक सुंदर मंदिर दिसून येते व हे स्थान चारधाम यात्रेतील एक स्थान आहे.

कुडांच्या बाजूस एक पंचवीस हजार फूट उंच पर्वतशिखर आहे. यमुना नदीच्या उगमस्थानाचे वैशिट्य म्हणजे ज्या ठिकाणाहून यमुना नदी पुढे जाते त्या प्रवाहाच्या काठांवर मोठे पाषाण आहेत आणि त्या खडकांतून आणि यमुनेच्या आतील खोल डोहांतून गरम पाण्याचे जिवंत झरे आहेत. पूर्वी हे झरे बर्फाच्या थराखाली झाकलेले होते मात्र स्वातंत्र्यापूर्वी हा बर्फ हटवून ते पूर्ववत करण्यात आले.

हिमालय पर्वत क्षेत्रातील यमुना नदीचा प्रवाह हा बर्फाच्छादीत असतो मात्र यमुनेच्या डोहात गरम पाण्याचे झरे असल्याने खालील बर्फ त्या पाण्याने वितळतो आणि वरच्या भागात बर्फाचा पातळ थर शिल्लक राहिल्याने काचेसारख्या बर्फाच्या खाली वाहणाऱ्या निळाशार यमुना नदीचे दृश्य अवर्णनीय असते. भारताच्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घ्यावयाचा असेल तर एकदा तरी यमुनोत्रीचे दर्शन घ्यावयास हवे.