संगमेश्वर येथील शिवकालीन नौका बांधणी
आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच आहे. जैसे ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा. तद्वत ज्याचे आरमार त्याचा समुद्र. छत्रपती शिवरायांनी सांगितलेली आणि रामचंद्रपंत अमात्यांनी लिहून ठेवलेल्या आज्ञापत्रातली ही वाक्यं.
जाणता राजा हा किती दूरदृष्टीचा होता याचा प्रत्यय हे वाचताना पदोपदी जाणवते. अफजलखान वधानंतर पुढे महाराज कोकणात उतरले. त्यांना अफाट आणि अमर्याद अशा सिंधुसागराचे दर्शन झाले. या समुद्रावर तेव्हा राज्य होते सिद्द्यांचे, पोर्तुगीजांचे, डचांचे, फ्रेंचांचे आणि इंग्रजांचे. आपले स्वराज्य बळकट करायचे असेल तर या सागराला पालाण घालणारे तितकेच तोलामोलाचे आरमार आपल्याकडे असायला हवे याची जाणीव त्या थोर राजाला तेव्हा झाली. सागरी सुरक्षेचं महत्त्व या थोर राजाने जाणलं आणि सुरुवात केली एक बलाढ्य आरमार बांधायची. जवळ जवळ अडीचशे वर्ष हिंदू राजाचे आरमार समुद्रात आलेले नव्हते.
कदंबांचा राजा दुसरा जयकेशी याचे आरमार होते. त्यानंतर सिंधुसागरात मोठ्या डौलाने दाखल झाले ते छत्रपतींचे मराठी आरमार.
स्वराज्याच्या आरमारात विविध प्रकारच्या नौका, जहाजे होती. त्यातलाच एक नामांकित प्रकार म्हणजे संगमेश्वरी नौका. ह्या नौका ह्याच संगमेश्वर परिसरात बांधल्या जाऊ लागल्या. संगमेश्वर पासून जवळच असलेल्या ‘निढळेवाडी’ इथल्या सुतार समाजाची मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे नौका बांधणीचे पारंपारिक काम अगदी आजपर्यंत करत आहेत. रस्त्याला अगदी लागून असलेला हा उद्योग पर्यटकांच्या सोडाच पण आसपासच्या लोकांच्यासुद्धा लक्षात येत नाही ही परिस्थिती आहे.
संगमेश्वरकडून रत्नागिरीच्या दिशेला जाऊ लागले की जेमतेम ५ कि.मी. अंतरावर आहे निढळेवाडी. या गावाचे मूळचे नाव ‘वाडा निढळ’. छत्रपती शिवरायांनी हे गाव इथल्या सुतार समाजाला आंदण दिला. गुहागर जवळ असलेल्या जामसूद इथून ह्या मंडळींना महाराजांनी इथे बोलावून घेतले. निढळेवाडीला रस्त्याच्या उजव्या बाजूला रस्त्याला लागूनच मोठ्या आकाराच्या लाकडी नौका उभ्या केलेल्या दिसतात. त्यातल्या काहींचे काम सुरु असते तर काही नुसत्या बाजूला उभ्या असतात.
हाच तो संगमेश्वरी नौका बनवण्याचा पारंपारिक उद्योग आणि त्याचा कारखाना. सुतार समाजातील संजय वाडकर हे हा पारंपारिक व्यवसाय आजही तशाच पारंपारिक पद्धतीने करताना दिसतात. संगमेश्वरी नौका या संपूर्णपणे लाकडात बांधल्या जात असत. आणि त्यांना खिळा वगैरे तत्सम कुठलीही लोखंडी वस्तू वापरली जात नसे. सगळी नौका लाकडातच बांधण्याचे कौशल्य या समाजातील मंडळींकडे पूर्वापार चालत आलेले आहे. आपले पिढीजात ज्ञान वापरून आणि प्रत्येक खाचेत इंग्रजी ‘एन’ आकाराची खुंटी ठोकून ही सगळी नौका बांधली जाते. यासाठीची मापे गरजेनुसार बदलतात.
नौका बांधणीसाठी जे लाकूड लागतं ते नागपूर, गोंदिया, मध्यप्रदेश इथून आणलं जातं. गरज पडली तर कोकणातल्या शेतकऱ्याकडून लाकूड खरेदी केलं जातं, मात्र त्यासाठी त्याचा ७/१२ चा उतारा घेऊन त्याची वनविभागाकडे रीतसर नोंदणी करून त्यांची परवानगी घेऊन मगच ते विशिष्ट लाकूड तोडून आणलं जातं. संपूर्ण नौका बांधकामात कुठेही यंत्राचा वापर केला जात नाही. सगळं काम हे कुशल कारागीरांच्या हातानेच केलं जातं. संगमेश्वरी नौका ही पाण्यात चालणार, तुफानाला तोंड देणार म्हणून या नौकेला आतून विशिष्ट तेलाचा कोट दिला जातो. कडू तेल आणि चंद्रुस हे एकत्र करून ते उकळून त्याचं द्रावण तयार केलं जातं आणि ते सगळ्या नौकेला आतून लावलं जातं. फळीची मापे किती घ्यायची, कुठल्या प्रकारची फळी कुठे बसवायची, नौकेशी तिचा कोण कसा साधायचा हे किचकट वाटलं तरी अत्यंत गरजेचं असलेलं काम इथे विशेष लक्ष घालून केलं जातं.
बोट पाण्याच्या वर किती राहील हे लक्षात घेऊन फळीला पीळ दिला जातो. म्हणजे लाकडाची सलग फळी गरम करून विशिष्ट कोनात वाकवली जाते आणि ती पीळ दिलेली फळी या नौकेमध्ये बसवली जाते. कालमानानुसार आता बऱ्याचदा लाकडाऐवजी फायबर आणि स्टीलचा वापरदेखील नौका बांधणीमध्ये होऊ लागलेला आहे.
सन १६६७ साली समुद्रात दाखल झालेल्या स्वराज्याच्या आरमाराची पहिल्यांदा इंगाजांकडून चेष्टा केली गेली. मात्र नंतर याच आरमाराच्या जोरावर महाराजांनी समुद्रातल्या शत्रूंना सळो की पळो करून सोडले. पुढे तर कान्होजी आंग्रे यांच्या काळात मराठी नौदलाने संपूर्ण किनारपट्टीवर दहशतच निर्माण केली होती.
निढळेवाडीचे पारंपारी नौका निर्माण करणारे श्री. संजय वाडकर सांगतात की महाराजांनी आमच्या सुतार समाजावर विश्वास टाकला होता, आणि आमच्याकडून संगमेश्वरी जहाजांची निर्मिती करवून घेतली. आजही ही मंडळी आपला हा पिढीजात व्यवसाय त्याच पारंपारिक पद्धतीने करताना दिसतात. आजही छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पोसत आहेत ही भावना या वाडकर मंडळींची आहे. संगमेश्वरच्या अगदी उंबरठ्यावर शास्त्री नदीच्या काठी असलेला हा संगमेश्वरी नौका बांधणीचा प्रकल्प प्रत्येकाने तिथे थांबून मुद्दाम बघायला हवा. छत्रपतींनी दाखवून दिलेल्या मार्गावर आजही वाटचाल करणारी ही मंडळी आणि त्यांनी निर्माण केलेल्या नौका हे खरंतर सबंध कोकणाचे भूषण आहे. हा वारसा आजही तितक्याच कसोशीने जपणारी ही मंडळी खरोखर थोरच म्हणायला हवीत.
- आशुतोष बापट