चौलचे रेवदंड्याचे रामेश्वर मंदिर
भव्य आणि रम्य परिसरात उभे असलेले रामेश्वर मंदिर बांधलं कोणी याचा उल्लेख सापडत नाही. मात्र मंदिराची दुरुस्ती अनेकदा झाल्याचे दाखले मिळतात.
चौल रेवदंड्याचा परिसर निसर्गरम्य परिसर म्हणून जसा ओळखला जातो तद्वतच भागाचे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्व आहे. ज्ञात इतिहासावरुन इ. स. १३ पासून १७८६ पर्यंत चौल हे सतत ऐतिहासिक घटनांचे केंद्र आणि आतंरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख बंदर होते.
चौलचे प्राचिनत्व इ.स. पूर्व १२०० पर्यंत नेता येते. त्याकाळी चौलला चंपावती आणि रेवदंड्यास रेवती क्षेत्र म्हणत असावेत. चंपावती हे नाव एखाद्या झाडावरुन, चंपा नावाच्या जाळ्यापासून किंवा चंपा नावाच्या राजापासून पडले असा निष्कर्ष काढण्यात येतो. श्रीकृष्णाचा भाऊ बलराम याची पत्नी रेवती या नावावरुन रेवदंडा असं नाव पडले असावं असं तज्ज्ञांचं मत आहे.
पुरातनकाळी या शहरात सोळा लक्ष इमारती, ३६० मंदिरं, ३६० तळी होती आणि ते १६ पाखाड्यात विभागलं गेलं होतं. मध्ययुगात या शहरानं अनेक राजवटी पाहिल्या. शिलाहार राजा, अनंत देव, देवगिरीकर यादव, विजयनगर, बहामनी, निजाम, पोर्तुगीज, विजापूरकर आदिलशहा, इंग्रज आदींच्या ताब्यात हे जुळे शहर होते. १६५७-५८ मध्ये शिवाजी महाराजांनी चौल जिंकले असावे.७ सप्टेंबर १७४० मध्ये इंग्रजांनी बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर तह करुन चौलरेवदंडा ही दोन्ही स्थळं मराठ्यांकडं दिली.
तत्पूर्वी १७४० मध्ये रशियन प्रवासी अफनासी निकीतीन याने चौलला भेट दिली होती. निकितीनने आपल्या प्रवासवर्णनात चौलचा उल्लेख 'चिवील' असा केला आहे. रेवदंडा येथे आता निकितीन याचे स्मारक उभारण्यात आलं आहे. फ्रेंच प्रवासी फ्रैंकॉईस पायरार्ड इटालियन प्रवासी पेटो डेलावेल्ल यांनीही चौल, रेवदंड्यास भेटी दिल्या होत्या. सर्वच परदेशी प्रवाशांनी रेवदंडा, चौलचे एक वैभवशाली नगर आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेले, संरक्षणदृष्ट्या मजबूत, व्यापारी केंद्र अशा शब्दांत उल्लेख केला आहे.
अशा प्रकारे राजकीयदृष्ट्या महत्व असलेल्या चौल-रेवदंड्यास धार्मिकदृष्ट्याही तेवढंच महत्व होतं. या परिसरात आजही अनेक मंदिरं उभी आहेत. एकविरा, भगवती देवी, शीतळादेवी, भोवाळेचे दत्त मंदिर, महाकाली मंदिर, हिंगुळजा देवी मंदिर आणि ‘भोरसी' पाखाडीत वसलेलं रामेश्वर मंदिर.
भव्य आणि रम्य परिसरात उभे असलेले रामेश्वर मंदिर बांधलं कोणी याचा उल्लेख सापडत नाही. मात्र मंदिराची दुरुस्ती अनेकदा झाल्याचे दाखले मिळतात. ऑक्टोबर १७४१ मध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर श्रीनिवास दीक्षितबाबा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी लागणारा निधी नानासाहेब पेशवे आणि मानाजी आंग्रे यांनी दिला. त्यानंतर विसाजीपंत सरसुभेदारांनी अपूर्ण काम पूर्ण केलं. नंदीजवळ दीपमाळ, तुळशीवृंदावन बांधले. १८१६ मध्ये मंदिराचा नगारखाना आणि १८३८ मध्ये पुष्करणीची दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी ५०० रुपये खर्च आला.
पूर्वी महाशिवरात्रीला पाच दिवसांची यात्रा भरे, आता केवळ एकच दिवस यात्रा भरते. श्रावणात सोमवारी भाविक येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. पूर्वाभिमुख असलेल्या रामेश्वर मंदिराचा गाभारा ४.४२ x ४.४२ मीटर एवढा आहे. येथे अन्यत्र दिसते तसे उंच लिंग नाही. चौकोनी खड्ड्यात स्वयंभू बांधलेले शिवस्वरुप आहे. गाभाऱ्याच्या जमिनीपासून शिखर ७.६२ मीटर उंच आहे. बांधकाम दगडी आहे. इथं अग्नीकुंड, वायुकुंड, पर्जन्यकुंड आहेत. चौलहून रेवदंड्याकडं जाताना रस्त्याला लागूनच हे मंदिर डाव्या बाजूस दिसून येते.
- एस. एम. देशमुख