कोपेश्वर मंदिर खिद्रापूर

भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने कोपेश्वर मंदिराला १९५४ साली महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

कोपेश्वर मंदिर खिद्रापूर
कोपेश्वर मंदिर खिद्रापूर

भारतीय मंदिरस्थापत्याच्या सर्वोत्कृष्ट उदाहरणांपैकी एक असे कोपेश्वर हे देवालय कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे आहे.

काळ्या पाषाणांनी निर्मिलेल्या या मंदिराचे दोन भव्य मंडप नक्षी खोदकामाची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.

मंदिरातील वर गोलाकार मोकळी जागा असलेला स्वर्गमंडप दुर्मिळ प्रकारात मोडतो.

पूर्वी या ठिकाणी यज्ञयाग केल्यावर त्यातील तत्वे ही थेट स्वर्गात जाण्यासाठी ही जागा मोकळी ठेवली गेली होती.

मंदिराचा अंतर्भाग व त्यातील स्तंभ, नगारखाना गर्भगृह हे सर्व भाग सुंदर अशा नक्षीकामाने युक्त आहेत.

या देवालयाची निर्मिती इसवी सनाच्या सातव्या शतकात म्हणजे चालुक्य काळात सुरु झाली व शिलाहार काळात हे काम सुरु होते आणि इसवी सनाच्या बाराव्या शतकात म्हणजे यादव काळात मंदिराचे काम पूर्ण झाले.

या ठिकाणी यादव नृपती सिंघणदेवाचा सन १२१३ सालचा देवनागरी शिलालेख सुद्धा आहे.

मंदिराच्या गर्भगृहात कोपेश्वर व धोपेश्वर ही दोन लिंग असून यातील धोपेश्वर लिंग हे विष्णुस्वरूप आहे व कोपेश्वर हे शिवस्वरूप आहे.

भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला १९५४ साली महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

तर असे हे महाराष्ट्राच्या धार्मिक वास्तूवैभवात भर घालणारे कोपेश्वर मंदिर एकदातरी पाहायलाच हवे.