कोल्हापूरची अंबाबाई अर्थात महालक्ष्मी - साडे तीन शक्तिपीठांपैकी एक

अंबाबाईचे उर्फ महालक्ष्मीचे मंदिर हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असून जुन्या राजवाड्याच्या वायव्य दिशेस आहे व मंदिराच्या चोहोबाजूस भव्य तटबंदी असलेला कोट आहे.

कोल्हापूरची अंबाबाई अर्थात महालक्ष्मी - साडे तीन शक्तिपीठांपैकी एक
कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचे स्थान हे कोल्हापूर शहरात असून ते देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोल्हापूर शहराच्या उत्पत्तीचा काळ मुळात अंबाबाईच्या इतिहासापासून सुरु होतो. 

प्राचीन काळी कोल्हापूर हे शहर करवीर अथवा कुरवीर या नावाने प्रख्यात होते कारण या स्थानास खुद्द महालक्ष्मी देवीने आपल्या गदेने अर्थात कुराने महापुराच्या पाण्यापासून वाचवले त्यामुळेच या स्थानास कुरवीर अथवा करवीर असे नाव मिळाले. कालांतराने आसमंतातील एका टेकडीवर लोकांना उपद्रव देणाऱ्या कोलासुर नामक राक्षसाचा वध अंबाबाईने केल्याने या शहरास कोलापूर अथवा कोल्हापूर असे नामाभिमान प्राप्त झाले.

अंबाबाईच्या मंदिराचा जीर्णोद्धार सर्वप्रथम इसवी सनाच्या सातव्या शतकात चालुक्य राजा कर्णदेव याने केल्याचा उल्लेख आढळतो व या काळानंतर कोल्हापूरची भरभराट होऊ लागली व अल्पावधीत हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध झाले.

अंबाबाईचे उर्फ महालक्ष्मीचे मंदिर हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असून जुन्या राजवाड्याच्या वायव्य दिशेस आहे व मंदिराच्या चोहोबाजूस भव्य तटबंदी असलेला कोट आहे. 

मंदिराचा आकार त्रिशुळाच्या स्वरूपात असून मंदिराची भव्य दिव्यता आणि शिल्पसौंदर्य मन मोहून घेते. या ठिकाणी महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन देवता स्थानापन्न असून मंदिराच्या वरील भागात महालक्ष्मी स्थापन आहे.

मुख्य मंदिरातील तीन फूट शिलासनावर महालक्ष्मी देवीची मूर्ती असून  मूर्तीची उंची अदमासे अडीच फूट आहे. मूर्ती चतुर्भुज असून पहिल्या हाती गदा, दुसऱ्या हाती ढाल, तिसऱ्या हाती महाळुंग आणि चौथ्या हाती पानपात्र आहे.

देवीच्या मस्तकावरील मुकुटात शिवलिंग असून शिवलिंगाच्या मागील बाजूस फणाधारी नाग आहे. महालक्ष्मी देवीच्या या स्वरूपात त्रिमूर्तींचा समावेश असून ब्रह्मा नागाच्या स्वरूपात मूर्तीवर छत्र धरून आहेत, विष्णू हे लक्ष्मीचे पती असल्याने ते देवीच्या सर्वांगात सामावलेले आहेत तर शिव हे देवीच्या मुकुटी विराजमान झाले आहेत.

महालक्ष्मी देवीच्या मंदिराच्या वैभवात उत्तरोत्तर भर पडत गेल्याने विविध काळातील स्थापत्यशास्त्र या ठिकाणी विपुल प्रमाणात दिसून येतात आणि विष्णुरूप बालाजीचे दर्शन घेतल्यावर कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्याची चाल असल्याने अनेक भाविक हे बालाजी दर्शन करून महालक्ष्मी दर्शन घेण्यास कोल्हापूरला येत असतात.