कुंडलिनी शक्तीचे रहस्य

मनुष्याच्या नाभीच्या खाली एक सर्पाकार शक्ती वेटोळे घालून बसलेली असते तिलाच कुण्डलिनी शक्ती म्हणून ओळखले जाते. तीन पूर्ण व एक अर्ध अशी तिची साडेतीन वेटोळी असतात.

कुंडलिनी शक्तीचे रहस्य
कुंडलिनी शक्तीचे रहस्य

ही शक्ती सरळ रूपात प्रतिष्ठित झाल्यास शिवाशी अभिन्न बनते. शक्तीचे चित आणि अचित असे दोन भेद आहेत. चितशक्ती ही चित्स्वरूप असते व ती आत्म्याशी अभिन्न स्वरूपात राहते. अचित शक्ती ही विशुद्ध जगताची उपादान कारण आहे. या शक्तीला वैष्णव पंथीय शुद्ध सत्त्व व तांत्रिक लोक बिंदू अथवा महामाया म्हणतात.

ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा।
जया विश्वबीजाचिया कोंभा, साउली केली ॥

अशुद्ध अचित शक्तीमुळे अनंत ब्राहृांडे अर्थात सर्व मयिक जगत प्रकाशित होते, हिलाच कुण्डलिनी असे म्हणतात. जोपर्यंत क्रियारूप चितशक्तीची संमती मिळत नाही तोपर्यंत कुण्डलिनी शक्ती सुप्त पडलेल्या नागासारखी वेटोळे घालून राहाते. तिच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा क्षोभ उत्पन्न होत नाही. चितशक्तीच्या आघाताने ही सुप्त महामाया कुण्डलिनी नागीण जागृत होते. या कुण्डलिनीस जागृत करण्याचे व तिला उर्ध्वमुखी करण्याचे कार्य महत्त्वाचे आणि अतिशय कठीण आहे. कुण्डलिनी शक्तीचा प्रयोग हिंदू धर्मात प्रथम होऊन नंतर तो अनेक धर्मात अथवा पंथांमध्ये केला गेला, नाथपंथांमध्ये या कुण्डलिनीस हठयोग असे नामाभिमान प्राप्त झाले. कारण कुण्डलिनी शक्ती जागृत करण्यासाठी शरीरास अनेक कष्ट द्यावे लागतात.

मुल बंधपूर्वक आसन साधले म्हणजे गुदद्वारातून जाणारा अपान वायु खालून जाण्याचा बंद होतो व गुदस्थानाच्या ठिकाणी असलेल्या मुलाधार चक्राजवळून लिंग स्थानामधील स्वाधिष्ठान चक्राद्वारे जाऊन नाभिस्थानाखाली स्वस्थ झोप घेतलेल्या कुण्डलिनीच्या अंगावर जाऊन आदळतो. उडियान बंधाने खालचा वायु वर खेचण्यास तसेच कुंभक करून प्राणवायू नाभीच्या खाली ढकलण्यास प्रारंभ केला म्हणजे नाभिस्थानी असणाया मणिपूर चक्राच्या खाली व भूमध्यापासून नाभिस्थानापर्यंत गेलेल्या सुषुन्मा नाडीच्या द्वाराशी निजलेली नागारूपी कुंडली एकाएकी जागृत होऊन आपले वेटोळे हळूहळू सोडायला लागून काहीकाळाने सरळ होते. त्यावेळी सुषुन्मेचे द्वार मोकळे होऊन आजपर्यंत एकमेकांशी वैर करणाया पण आता सख्य झाल्याने एक झालेले प्राण व अप्राण (अपान) वायु सुषुन्मेत गेल्यामुळे व इडा पिंगळाशी त्यांचा वियोग झाल्यामुळे योग्यास मरणप्राय वेदना व दु:ख होते. कुण्डलिनी नागीण जागी झाली म्हणजे ती ह्मदयकमलाखाली असलेला वायु पिऊन अस्थी, शिरा व मांस यांचे स्वत्व शोषते. नासिकेबाहेर जाणाया प्राणवायुस अधोगामी करते व अधोगामी अपानाला उद्ध्र्वगामी करुन षटचक्रांचे भेद करते. अशाप्रकारे कुण्डलिनी जागृत करून योगी पुरुषाला आत्मसुखाचा लाभ घेता येतो. कुण्डलिनीला शेष असेही नाव आहे. कुण्डलिनी मेंदूपर्यंत पोहोचली म्हणजे मन आणि देह यांपासून योगी विभक्त होऊन त्याचा आत्मा मुक्त होतो. 

ज्याला ही योग विद्या प्राप्त होते. त्याच्या अंगी अद्भुत सामर्थ्य प्राप्त होते. ती व्यक्ती भूत, भविष्य, वर्तमान बसल्याजागी जाणू शकते. शरीराचा आकार लहान किंवा मोठा, हलका, परकाया प्रवेश, हवेत उडणे, अदृष्य होणे, हजारो मैलावरील गोष्टी श्रवण करणे इत्यादी सर्व सिद्धी त्यास प्राप्त होतात असे म्हटले जाते. अर्थात कुण्डलिनी शक्तीचा प्रयोग नागलोकांनी प्रथम अंमलात आणला असावा कारण नागलोक हे सर्व सिद्धींनी युक्त म्हणून ओळखले जात. कुण्ड नामक नागाचा महाभारतामध्ये उल्लेखसुद्धा आहे.