वेबसाईटचे फायदे व ती कशी तयार करावी

माहीती तंत्रज्ञान, इंटरनेट हे विषय आता सर्वसामान्यांच्या तोंडी पोहोचलेले असल्याने त्याविषयी आणखी काही लिहीण्याची गरज नाही मात्र या माध्यमांचा आपल्या व्यवसायाच्या, उद्योगधंद्याच्या विकासासाठी आपण कशा पध्दतीने वापर करु शकतो यावर मात्र फारच कमी लिखाण झालेले दिसून येते.

वेबसाईटचे फायदे व ती कशी तयार करावी
वेबसाईटचे फायदे व ती कशी तयार करावी

साधारणतः ९० च्या दशकात भारतामध्ये प्रवेश केलेल्या माहिती तंत्रज्ञानाने उद्योगाची सर्व समिकरणेच बदलून टाकली. सुरुवातीस काही ठरावीक क्षेत्रांपुरताच मर्यादीत असलेल्या या विषयाने गेल्या काही वर्षात घराघरात प्रवेश केला.

आता तर इंटरनेट माहीत नसलेला माणूस म्हणजे अशिक्षीत असा समज रुढ होवू लागला आहे आणि काही अर्थी ते बरोबरही आहे कारण माहीतीचा अफाट स्त्रोत असलेल्या इंटरनेटचा वापर ज्यांना माहीत नसतो ते आपसूकच या आय्.टी. जमान्यात पिछाडीवर जातात.

स्वतःला हव्या असणार्‍या सुविधांचा तसेच उत्पादनांचा शोध घेण्यासाठी जगातले ८० टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात. गुगल या सर्च इंजिनवर फक्त 'कॅमेरा' हा शब्द टाकला की कॅमेरा कंपनीपासून ते दुकानांपर्यंत लाखो सर्च रिजल्टस एका सेकंदात तुमच्यासमोर येतात.

यातून लोकांना ज्या कंपनीची अथवा दुकानाची विश्वासाहर्ता पटते त्या दुकानातूनच पुढे ती वस्तू खरेदी केली जाते. मात्र ही दुकानांची वा कंपन्यांची माहीती अचानक या इंटरनेटवर कशी मिळते? ती थोडीच आकाशातून येते? तर ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या त्या दुकानांना अथवा कंपन्याना स्वतःची वेबसाईट तयार करावी लागते. या वेबसाईटवर ते स्वतःच्या दुकानाची माहीती, पत्ता, छायाचित्रे, उत्पादने यांची माहीती देऊ शकतात जेणेकरुन लोकांना या दुकानाची माहिती काढताना फारसे कष्ट करावे लागत नाहीत व आपसूकच ते या दुकानातून त्यांना हवी असलेली वस्तू खरेदी करतात.

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये यशस्वी असलेल्या कंपनीची वेबसाईट असलीच पाहिजे असा समज ग्राहकांचा असतो. मात्र आता वेबसाईट तयार करणे पूर्वीइतके महाग राहिलेले नाही. साधारणतः चार ते पाच पाने असलेली वेबसाईट तयार करण्यासाठीचा खर्च १०,००० रु. पर्यत येतो मात्र यापुढे पानांनूसार तसेच इतर तंत्रज्ञानानुसार ही किंमत वाढत जाऊ शकते मात्र छोट्या तसेच मध्यम आकाराच्या उद्योगधंद्यासाठी चार ते पाच पानांची वेबसाईट पुरेशी असते.

वेबसाईट तयार करण्याच्या चार मुख्य प्रक्रिया असतात १. डोमेन नेम रजिस्ट्रेशन (उदा. ) २. स्पेस रजिस्ट्रेशन ३. पेज डिजाईन आणि ४. पब्लिशिंग या चार प्रक्रियांतून पार पडल्यानंतर एक परिपुर्ण वेबसाईट ग्राहकांपर्यंत येते. या वेबसाईटचा आम्हाला फायदा काय असा प्रश्न तुमच्या आमच्यासारख्यांना पडू शकतो मात्र विचार केल्यास याचे एक दोन नाही तर अनेक फायदे दिसून येतात ते असे की, तुमची वेबसाईट ही तुमच्या कंपनीची जाहिरातच असते जी वर्षाचे ३६५ दिवस, १२ महिने, ४ आठवडे, २४ तास रंगित व आकर्षक रुपात लोकांच्या घराघरात जाऊन पोहोचते, तसेच इंटरनेट हे एकाच वेळी जगाच्या कानाकोपर्‍यातून हाताळता येणारे माध्यम असल्याने संपुर्ण जगभरात तुमची जाहिरात होते.

एखाद्या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्याचा दर दिवशीचा दर लाखो रुपये असताना केवळ काही हजारामध्ये वर्षभर चालणारी आणि जगभर पोहोचणारी रंगित जाहिरात नक्कीच परवडणारी आहे. अर्थात वर्तमानपत्राची स्वतःची अशी एक वेगळी ओळख व ग्राहकवर्ग आहे मात्र वेबसाईट हा पर्याय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.

वेबसाईटच्या माध्यमातून तुमचे ग्राहक तुमच्याशी संपर्क साधू शकतात तसेच तुम्ही देत असलेल्या सेवेची इत्यंभूत माहीती त्यांना घरबसल्या मिळू शकते यामुळे ग्राहकांना असलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना वेबसाईटवरच मिळून तुमचा आणि त्यांचाही वेळ वाचतो. वेबसाईट असल्यास तुमची सेवा घेतलेला ग्राहक त्याच्या मित्रांना किंवा नातेवाई़कांना रेफरन्स म्हणून तुमच्या वेबसाईटचा पत्ता देऊ शकतो ज्याने तुमचा कस्टमर बेस तयार होतो. हे झाले वेबसाईट असण्याचे काही मुख्य फायदे मात्र इतर अनेक दिसून न येणारे फायदेही वेबसाईट बनवल्यानंतर होतात.

एक इंग्रजी म्हण आहे 'go with wind' म्हणजे वार्‍याच्या दिशेनेच वाटचाल करा..उलट दिशेला जाण्याचा प्रयत्न केल्यास वारा तुम्हाला दुर फेकून देईल. माहीती तंत्रज्ञानाच्या युगातहि आपल्याला निसर्गाचा हाच नियम लगू पडतो अथवा जाहिरातींच्या पारंपारिक प्रकारांना चिटकून राहणारे उद्योग फारसे प्रगती करु शकत नाहीत हे सत्य आहे. आपण कुणीही असा एक कलाकार, खेळाडू, कंपनी मालक अथवा दुकान चालक आपल्या व्यवसायाची योग्य आणि वाजवी किमतीत जाहिरात करण्याचा हा पर्याय तुम्हास नक्कीच प्रगतीपथावर नेणारा आहे. काळाबरोबर चाललात तर यश तुमचेच असेल!